थरूर यांची पाकविरोधात, तर काँग्रेसची थरूरविरोधात आघाडी

29 May 2025 19:42:05
थरूर यांची पाकविरोधात, तर काँग्रेसची थरूरविरोधात आघाडी

नवी दिल्ली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर पाकिस्तानचा बुरखा फाडत आहेत, त्याचवेळी काँग्रेस पक्षाने थरूर यांच्याविरोधात आघाडी उघडली आहे.


काँग्रेस खासदार शशी थरूर यांना ऑपरेशन सिंदूरवर भाजप सरकारला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांकडून सतत टीकेचा सामना करावा लागत आहे. गुरुवारी त्यांनी यावर स्पष्टीकरण दिले आणि म्हटले की टीकाकार आणि ट्रोल त्यांचे विचार विकृत करत आहेत. तथापि, त्यांनी कोणाचेही नाव घेतले नाही.


थरूर यांनी एक्स वरील पोस्टमध्ये लिहिले आहे- नियंत्रण रेषेपलीकडे भारतीय शौर्याबद्दल माझ्या कथित अज्ञानावर संतापलेल्या कट्टरपंथीयांना मी सांगू इच्छितो की मी स्पष्टपणे फक्त दहशतवादी हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याबद्दल बोलत होतो, भूतकाळातील युद्धांबद्दल नाही. परंतु नेहमीप्रमाणे माझे शब्द आणि विचार विकृत केले गेले. मंगळवारी थरूर यांनी २०१६ च्या उरी सर्जिकल स्ट्राईक, २०१९ च्या बालाकोट एअर स्ट्राईक आणि ऑपरेशन सिंदूरसाठी पनामामध्ये भारत सरकारचे कौतुक केले. ते म्हणाले की अलिकडच्या वर्षांत दहशतवादाविरुद्ध भारताची भूमिका बदलली आहे. हे यापूर्वी घडले नव्हते.


काँग्रेस नेते आणि माजी खासदार उदित राज यांनी थरूर यांच्या विधानावर आक्षेप घेतला होता. त्यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये लिहिले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थरूर यांना भाजपचे सुपर प्रवक्ते म्हणून घोषित करावे. त्यानंतर उदित राज यांची ही पोस्ट काँग्रेसचे माध्यमप्रमुख जयराम रमेश यांनी उदित राज यांची पोस्ट रिपोस्ट करून काँग्रेसचा त्यास पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले होते.


Powered By Sangraha 9.0