मुंबईतील खोदकाम केलेल्या १३८५ रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण

29 May 2025 20:31:51
मुंबईतील खोदकाम केलेल्या १३८५ रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण


मुंबई, रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या प्रकल्प अंतर्गत संपूर्ण मुंबई महानगरातील विविध रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण नियोजित कालावधीत पूर्ण होत आहे. पावसाळापूर्व नियोजनानुसार, खोदकाम केलेल्या एकूण १३८५ रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. सोमवार दि. २ जून २०२५ पर्यंत काँक्रिट क्यूरिंग पूर्ण होत असून गुरुवार, दि. ५ जूनपर्यंत रस्त्यावरील सर्व रस्तारोधक हटविले जातील व रस्ते वाहतुकीस खुले होतील, याचे पालन करावे, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले.


मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्प अंतर्गत, पूर्व उपनगरात पूर्णत्‍वास येत असलेल्या रस्ते कामांची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी बुधवार, दि.२८ मे रोजी रात्री ठिकठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. चेंबूर येथे संत कक्‍कया मार्ग, साकीविहार रस्ता, घाटकोपर (पश्चिम) येथील सिकोवा औद्योगिक मार्ग, भांडूप (पश्चिम) येथील सुभाष नगर मार्ग, विक्रोळी (पश्चिम) येथील सूर्या नगर मार्ग, मुलुंड (पश्चिम) येथील मॅरेथॉन गॅलेक्‍सी मार्ग आणि बाबा पदमसिंह छेद मार्ग क्रमांक ५ आदींचा त्यात समावेश होता. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी या रस्ते काँक्रिट कामांचा गुरुवार, दि. २९ मे रोजी महानगरपालिका मुख्यालयात आढावा घेतला.


यावेळी बांगर म्हणाले की, या हंगामात हाती घेण्यात आलेली रस्ते काँक्रिटीकरणाची नियोजित कामे पूर्णत्वास येत आहेत. काँक्रिट ओतण्याची कामे दिनांक २० मेपर्यंत पूर्ण करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला होता. मात्र, मान्सूनपूर्व पाऊस झाल्याने ही मुदत दिनांक २३ मेपर्यंत वाढविण्यात आली होती. त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली आहे. ‘पीक्यूसी’ची कामे पूर्ण झाल्यामुळे आता रस्ते बांधणीतील अखेरची कामे प्रगतिपथावर आहेत. पावसाची उघडीप मिळताच रस्ते बांधणीतील अखेरची कामे जसे की, थर्मोप्लास्ट, कॅट आईज, दिशादर्शक फलक, वाहतूक सुरक्षा चिन्हे, जंक्शन ग्रीड आदी कामे दि. ५ जूनपर्यंत पूर्ण केली जातील. वाहतुकीस अडथळा होऊ नये म्हणून ही कामे रात्रीच्यावेळी करावीत. रस्तारोधक हटवावेत, असे निर्देश बांगर यांनी दिले आहेत.


Powered By Sangraha 9.0