मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Army Chief with Rambhadracharya) भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी नुकतीच चित्रकूटला सपत्निक भेट दिली. तेथे त्यांची जगद्गुरू रामभद्राचार्य महाराजांशी भेट झाली. त्यांनी संत आणि विद्यार्थ्यांसमोर भारतीय सैन्याच्या शौर्याबद्दल सांगितले. यावेळी लष्करप्रमुखांनी रामभद्राचार्यंना गुरुदक्षिणा देण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा रामभद्राचार्य म्हणाले, "ना रत्ने ना कपडे, मला दक्षिणा म्हणून पाकव्याप्त काश्मीर (पीओके) हवे आहे."
भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी त्यांच्या पत्नी सुनीता द्विवेदी यांच्यासह चित्रकूटला पोहोचले, जिथे त्यांनी जगद्गुरू रामभद्राचार्य यांच्याकडून राम मंत्राची दीक्षा घेतली. हा तोच मंत्र आहे जो सीते मातेने हनुमानजींना लंका जिंकण्यासाठी दिला होता. दीक्षा घेतल्यानंतर, जनरल द्विवेदी यांनी गुरु दक्षिणा देण्याची इच्छा व्यक्त केली. यावर रामभद्राचार्य म्हणाले, "ना रत्ने ना कपडे, मला दक्षिणा म्हणून पाकव्याप्त काश्मीर (पीओके) हवे आहे."
वास्तविक भारतीय लष्कराचे सामर्थ्य ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून साऱ्या जगाने पाहिले. भारताने पीओकेच नाही तर पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. यापूर्वी झालेल्या पुलवामा हल्ल्याचा बदला, भारताने एअर स्ट्राईकने घेतला. तेव्हाही भारताच्या प्रत्युत्तराचे प्रचंड कौतुक झाले होते. आता तर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने थेट पाकिस्तानच्या सीमारेशेत घुसून वार केला. त्यामुळे भारताचे लष्कर पाकव्याप्त काश्मीर सहजासहजी घेऊ शकतो, असा विश्वास भारतीयांमध्ये तयार झालाय. याचाच एक भाग म्हणून जगद्गुरू रामभद्राचार्यंनी गुरुदक्षिणा म्हणून लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्याकडे पीओकेची मागणी केली.