'ती' गाडी पेटवून टाकण्याची शशांक हगवणेची धमकी; वकीलांच्या आरोपावर काय म्हणाले वैष्णवीचे वडील?

29 May 2025 19:00:44
 
Anil Kaspate
 
मुंबई : मला फॉर्च्यूनर गाडीच पाहिजे, एमजी हेक्टर गाडी दिली तर मी ती पेटवून टाकेन, अशी धमकी शशांक हगवणे यांनी दिली असल्याचा धक्कादायक खुलासा वैष्णवी हगवणेचे वडील अनिल कस्पटे यांनी केला आहे. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, हगवणे कुटुंबाच्या वकीलांनी तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत अजब युक्तीवाद केला होता. या सगळ्यावर आता वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले. दरम्यान, वकीलांचे आरोप खोडून काढताना त्यांना अश्रू अनावर झाले.
 
अनिल कस्पटे म्हणाले की, "वैष्णवीने कुणाशी चॅट केले याबद्दल हगवणेंनी मला कुठलीही कल्पना दिली नाही. हगवणेंनी केलेले कृत्य आणि माझ्या मुलीचा घेतलेला बळी याला वेगळी कलाटणी देऊन त्यांना गुन्हा लपवायचा आहे. त्यामुळे त्यांच्या वकीलाने हे वक्तव्य केले आहे. त्यांनी वैष्णवीच्या कोणत्याही चॅटबद्दल मला पुसटशीही माहिती दिली नाही. त्या विषयावर कुठले भाष्यदेखील झाले नाही. ते सरळ सरळ माझ्या मुलीच्या चारित्र्यावर संशय घेत आहेत."
 
हे वाचलंत का? -  आनंदवार्ता! २०२४-२५ मध्ये राज्यात विक्रमी परकीय गुंतवणूक! गेल्यावर्षीपेक्षा ३२ टक्के अधिक; मुख्यमंत्र्यांनी दिली आकडेवारी
 
"हगवणेंचा आरोप आहे की, मी माझ्या मुलीचा मोबाईल मी काढून घेतला होता. पण माझ्या मुलीला तर मी आधी मोबाईल दिलाच आहे. पण आरोपीलासुद्धा मी २-३ महिन्यांपूर्वी १ लाख ५२ हजार रुपयांचा मोबाईल घेऊन दिला. माझी मुलगी माझ्या घरी असताना वाकडच्या क्रोमा येथे ते आले आणि त्यांनी वैष्णवीला बोलवून घेतले. तिथे त्यांनी तुझ्या पप्पाकडून मला मोबाईल घेऊन दे असे सांगितले. त्यानंतर वैष्णवीने मला फोन केला आणि मी त्यांना मोबाईल दिला. १८ सप्टेंबर २०२४ ला मी त्यांना मोबाईल घेऊन दिला आणि त्याच्या ईएमआयचे हप्ते मी आजही भरतो आहे," असे वैष्णवीच्या वडीलांनी सांगितले.
 
ते पुढे म्हणाले की, "त्यांच्याकडे पाच कोटीची गाडी आहे असे ते म्हणतात. पण मी फॉर्च्यूनर गाडी घेण्याच्या आधी त्यांच्यासाठी एमजी हेक्टर गाडी बुक केली होती. त्यासाठी ५० हजार रुपये डिपॉझिट केले. परंतू, त्यावरून त्यांनी माझ्याशी वादावादी केली. ही गाडी मला दिली तर मी ती सोडून देईन किंवा पेटवून देईल. मला फॉर्च्यूनर गाडीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर मी त्यांना लग्नात फॉर्च्युनर गाडी दिली. त्यांच्याकडे पाच गाड्या नाही तर ही एकच गाडी आहे. त्यांच्याकडे दुसरी कुठलीही गाडी नाही. ही एकच गाडी आहे आणि ही गाडी मी त्यांना दिली नसून त्यांनी माझ्याकडे मागितली गेलेली आहे," असेही अनिल कस्पटेंनी सांगितले.
 
याआधी वैष्णवीचे दोन लग्न मोडले!
 
"मी लग्नात उभा राहणार नाही, लग्न मोडून टाकीन, असे माझ्या मुलीला धमकावण्यात आले. आधीच माझ्या मुलीचे दोन लग्न मोडले होते. त्यात हे लग्न मला जबरदस्तीने करावे लागले. त्यातही मी लग्नाला तयार झालो तर त्यांनी अशी मानसिकता करून ठेवली. त्यांनी माझ्याकडे सोन्याची, चांदीची, चांदीच्या ताटाची, गौरीची मागणी केली. अधिक महिन्यात त्यांनी माझ्याकडे चांदीच्या ताटाची मागणी केली. तीदेखील मी पूर्ण केली," असेही त्यांनी सांगितले.
 
तेव्हा निलेश चव्हाण त्यांच्या घरी कसा?
 
"जर त्यांची सून मयत झालेली आहे. तर त्यांना बाळाला सांभाळायला दुसऱ्या एखाद्या व्यक्तीकडे द्यायचं, हे सगळं सुचलं कसं? जर आपली सून मयत आहे तेव्हा तो निलेश चव्हाण त्यावेळी तिथे कसा होता. निलेश चव्हाणसुद्धा या कटात सामील होता," असा आरोपही वैष्णवीच्या वडीलांनी केला आहे.
 
अनिल कस्पटेंना अश्रृ अनावर!
हगवणे कुटुंबाच्या वकीलांनी केलेल्या आरोपांनंतर अनिल कस्पटे म्हणाले की, "वकील साहेब तुम्ही सुज्ञ आहात. तुम्हालादेखील मुलंबाळं असतील. माझी मुलगी गेलीच आहे. पण ती मेल्यानंतर तिच्यावर असे वाईट शिंतोडे उडवू नका," अशी विनवणी अनिल कस्पटेंनी केली. यावेळी त्यांना अश्रृ अनावर झाले होते.
 
 
 
Powered By Sangraha 9.0