ऑपरेशन सिंदूरचे धाडसी पाऊल सुवर्णाक्षरांनी कोरले जाईल

28 May 2025 19:07:18
ऑपरेशन सिंदूरचे धाडसी पाऊल सुवर्णाक्षरांनी कोरले जाईल

मुंबई : आज जगाची नजर भारतावर आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरचे जे धाडसी पाऊल उचलले ते सुवर्णाक्षरांनी कोरले जाईल. मात्र दहशतवाद पाकिस्तानच्या डीएनए मध्ये खोलवर रुजलेला आहे, काही तुरळक कारवायांनी तो संपवता येणार नाही, असे मत मानवाधिकार संरक्षक, पत्रकार आणि बलुच देशभक्त मीर यार बलुच यांनी व्यक्त केले. बुधवारी त्यांनी या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिले, त्यातून त्यांनी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याविषयी आवाहन केले आहे.

भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरवर बोलताना त्यांनी पत्रात म्हटले की, जर ऑपरेशन सिंदूर आणखी एक आठवडा चालू राहिले असते, तर आज आम्ही भारत आणि आंतरराष्ट्रीय समुदायासोबत एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून चर्चा करत असतो. तरीही, आम्हाला आशा आहे की हे ऑपरेशन अधिक व्यापक स्वरूपात पुन्हा सुरू होईल आणि बलुचिस्तान, सिंधुदेश, गिलगिट, पाकिस्तान-व्याप्त काश्मीर मधील देशभक्त नागरिकांच्या समन्वयाने पार पाडले जाईल.

पुढे ते म्हणाले की, फ्री बलुचिस्तान मूव्हमेंट आणि बलुचिस्तानमधील देशभक्त नागरिक पाकिस्तानने केलेल्या अणुचाचण्यांच्या निषेधार्थ उभे आहेत. आम्ही आंतरराष्ट्रीय समुदायाला आवाहन करतो की त्यांनी तात्काळ कारवाई करून पाकिस्तानचे असुरक्षित अण्वस्त्र ताब्यात घ्यावेत, जेणेकरून बलुचिस्तानला आणखी विनाशापासून वाचवता येईल. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी नुकताच इराणचा दौरा केला. त्या भेटीत त्यांनी इराणच्या अण्वस्त्र धोरणाला पाठिंबा दर्शविला. यात भीती अशी आहे, जर पाकिस्ताननंतर इराणलाही अण्वस्त्र प्राप्त झाली, तर ती जागतिक शांतता आणि सुरक्षेसाठी आणखी मोठा धोका निर्माण करू शकते.

पाकिस्तान लष्कराची जिहादी मानसिकता


पाकिस्तानचे लष्कर एक अतिरेकी, जिहादी मानसिकतेने चालवले जाते. इस्लामचा ढाल म्हणून उपयोग करून, इस्लामाबाद आणि रावळपिंडीतील जनरल्स नेहमीच वैयक्तिक लाभासाठी प्रयत्नशील राहिले आहेत आणि धर्माचा आड वापर करून त्यांनी आपली बँक खाती फुगवली आहेत. पाकिस्तानच्या इतिहासाचा अभ्यास केला तर सतत फसवणूक आणि फसवेगिरीची एक ठरलेली पद्धत दिसून येते, ज्याद्वारे त्यांनी जगाला दिशाभूल केल्याचे मीर यार बलुच यांनी म्हटलेय.

बलुचिस्तानच्या दूतावासाला दिल्लीत परवानगी द्यावी


भारताला आवाहन करत मीर यार बलुच पुढे म्हणाले, बलुचिस्तानच्या जनतेला चीनबद्दल कोणतेही प्रेम नाही, कारण तो बलुच जनतेच्या इच्छेविरुद्ध आणि संमतीशिवाय पाकिस्तानच्या कब्जातील लष्कराला आर्थिक, राजनैतिक, राजकीय आणि वित्तीय सहाय्य देत आहे. दुसरीकडे, बलुच राष्ट्राला कोणत्याही मैत्रीपूर्ण देशाकडून मदत मिळत नाही. बलुच लोकांची इच्छा आहे की भारताने दिल्लीत बलुचिस्तानच्या दूतावासाला परवानगी द्यावी आणि या प्रदेशातील आपल्या संयुक्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय हितसंबंधांवर चर्चा करण्यासाठी आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी आपल्या दोन्ही देशांमध्ये योग्य संवाद व्हावा.


Powered By Sangraha 9.0