नवी दिल्ली : राष्ट्र ही एक अमर संकल्पना असून ती देशवासीयांमध्ये रुजविण्याचे कार्य स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केले, असे प्रतिपादन केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी मंगळवारी केले.
माय होम इंडिया या संस्थेतर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती कार्यक्रम नवी दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात आयोजित करण्यात आली होती. यावेळी केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह म्हणाले, सेल्युलर जेलला ज्यावेळी भेट देतो, त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपल्या मातृभूमीसाठी काय आणि किती त्याग केला हे समजते. राष्ट्राची कल्पना आणि देशाची संकल्पना वेगवेगळी. राष्ट्र ही एक भावना आहे, तर देश ही भौगोलिक संकल्पना आहे. सावरकरांनी राष्ट्र ही संकल्पना देशातील नागरिकांमध्ये रुजवली. राहुल गांधी आणि काँग्रेसने सावरकरांना शिव्या दिल्या, तरीही त्यांच्या आजीने ७० च्या दशकात त्यांचा सन्मान केला होता; हे विसरू नये. सावरकरांनी जे जे काही सांगितले, ते ते पालन करण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असतात. सामाजिक समरसता हे मूल्य पंतप्रधान मोदी यांच्या धोरणात आहे, असेही ते म्हणाले.
माय होम इंडियाचे संस्थापक सुनील देवधर म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम दिल्लीतील महाराष्ट्र सदनात होणे हा विशेष योगायोग आहे. यंदाच्या वर्षीपासून 'हिंदूकेसरी' पुरस्कार सुरू करण्यात येत असून सुदर्शन टीव्हीचे संपादक सुरेश चव्हाणके यांना पहिला पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. देशात अनेक महापुरुष होऊन गेले, मात्र स्वातंत्र्यानंतरही देशाच्या शत्रूंनी ज्याच्यावर आघात केले; ते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर होय. सावरकर लक्ष्य होण्याचे कारण म्हणजे देशविरोधी राजकीय नीतीचा काळ हा सावरकर विचारांमध्ये आहे. सावरकरांचे विचार हे कालातीत आहेत. त्यामुळेच कोट्यवधी रुपयांचे घोटाळे करणारे ज्यावेळी सावरकरांचा अपमान करतात, त्यावरून काँग्रेसची नीती स्पष्ट होते.
सुरेश चव्हाणके म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाने पुरस्कार मिळणे हे माझ्यासाठी भाग्याचे आहे. हा पुरस्कार मिळाल्यानंतर आमची जबाबदारी अधिक वाढली आहे. हिंदुत्वाची भूमिका अधिक प्रखरतेने मांडण्यासाठी सुदर्शन टीव्ही कटिबद्ध आहे. लहानपणापासून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे चरित्र वाचून हिंदुत्वाचे संस्कार झाले, असेही चव्हाणके यांनी नमूद केले.