भाऊचा धक्का हे काही कराचीमधलं बंदर नाही! इथे हिरव्या सापांची वळवळ सहन करणार नाही : मंत्री नितेश राणे

28 May 2025 12:29:51
 
Nitesh Rane
 
मुंबई : भाऊचा धक्का हे काही कराचीमधलं बंदर नाही तर हे आमच्या हिंदू राष्ट्रात असलेले बंदर आहे. त्यामुळे इथे हिरव्या सापांची वळवळ सहन करणार नाही, असा इशारा मंत्री नितेश राणे यांनी दिला आहे. बुधवार, २८ मे रोजी त्यांनी भाऊचा धक्का येथे भेट देऊन स्थानिक मच्छीमार बांधवांशी संवाद साधला.
 
त्यानंतर माध्यमांशी बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले की, "काही दिवसांपूर्वी भाऊचा धक्का येथील कोळी समाजाच्या हिंदू भगिनींनी हिंदूत्ववादी संघटनांना पत्र लिहिले होते. याठिकाणी अवैध पद्धतीने काही बांग्लादेशी आणि रोहिंगे कोळी बांधवांना मासे विक्री करू देत नाहीत. त्यांनी आमच्या एका भगिनीवर हात उचलण्याचीही हिंमत केली, अशी तक्रार कोळी बांधवांनी केली होती. त्यांच्या समर्थनार्थ आज आम्ही सगळे हिंदूत्ववादी कार्यकर्ते जमलो होतो."
 
हे वाचलंत का? -  "महिला आयोग असो किंवा पोलिस, हलगर्जीपणा करणाऱ्या...;" कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर काय म्हणाल्या चित्रा वाघ?
 
"केंद्र आणि राज्य सरकारने देशात बांग्लादेशी आणि रोहिंग्यांसंदर्भात कडक नियम लावले आहेत. कुठलाही बांग्लादेशी आणि रोहिंग्या आमच्या देशात राहता कामा नये, अशी स्पष्ट भूमिका सरकारची असल्याने या हिरव्या सापांची वळवळ भाऊच्या धक्क्याकडे सहन करणार नाही. हाच इशारा वजा धमकी देण्यासाठी आम्ही इथे आलो होतो," असे त्यांनी सांगितले.
 
इथे कुणी हिंदूंना त्रास दिला तर...
 
"स्थानिक हिंदू समाजाच्या कोळी बंधू भगिनींकडे कुणीही वाकड्या नजरेने बघितल्यास त्याचा पुढचा कार्यक्रम काय करायचा आहे याची माहिती देण्यासाठी मी इथे आलो होतो. यापुढे भाऊचा धक्क्यावर होणाऱ्या प्रत्येक बारीक गोष्टीवर लक्ष असेल. हे काही कराचीमध्ये असलेले बंदर नाही तर हे आमच्या हिंदू राष्ट्रात असलेले बंदर आहे. त्यामुळे इथे कुणी हिंदूंना त्रास देत असल्यास त्यांना कराची, पाकिस्तान आणि बांग्लादेशमध्ये कसे पाठवायचे हे आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. त्यामुळे अशी घटना यापुढे खपवून घेणार नाही," असा इशाराही मंत्री नितेश राणे यांनी यावेळी दिला.
 
 
 
Powered By Sangraha 9.0