तात्यारावांचे वडीलबंधू क्रांतिवीर बाबाराव सावरकर

27 May 2025 15:49:16

revolutionary Babarao Savarkar older brother Tatyarao


गणेश दामोदर सावरकर उपाख्य बाबाराव सावरकर हे स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांचे केवळ वडीलबंधूच नव्हे, तर त्यांनी अक्षरश: वडिलांप्रमाणेच तात्यारावांवर जीव ओवाळून टाकला. तात्यारावांच्या जडणघडणीत म्हणूनच बाबारावांचे योगदान हे अनन्यसाधारण असेच. कुशल हिंदू संघटक आणि शेकडो उद्बोधनपर पुस्तकांचे लेखक म्हणूनही बाबारावांनी आपल्या कार्याची अमीट छाप सोडली. राजद्रोहाच्या आरोपाखाली 12 वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा भोगून परत आल्यानंतरही, बाबारावांचा क्रांतिकारकांशी संपर्क सुरुच होता. अशा या क्रांतिवीराच्या स्वातंत्र्यसंग्रामातील शौर्याचे स्मरण करणारा हा लेख...


ज्या देशभक्ताचे जीवन क्रांतिप्रवण आणि विचार क्रांतिगर्भ होते, अशा गणेश दामोदर म्हणजेच बाबाराव सावरकर या नावाने इंग्रजांना थरकाप भरवणार्‍या प्रखर देशभक्ताचा जन्म दि. 13 जून 1879 रोजी भगूर, नाशिक येथे झाला. लहानपणापासूनच ते धार्मिक वृत्तीचे आणि संवेदनशील होते. लहानपणी मित्रांना जमवून अष्टभूजा देवीची पालखी, मिरवणूक काढत असत. घरातच ज्ञानसंग्रहण करण्यावर भर असल्यामुळे ग्रंथसंग्रह, चर्चा, कथा यांची लहानपणीच त्यांना सवय लागली. रामायण, महाभारत त्यांना खूप आवडे. त्यातील विशेषकरून भीम, अर्जुन यांचे त्यांना विशेष आकर्षण होते. घरी तलवार आणि बार काढायची बंदूकदेखील होती. या सर्वांत शस्त्रप्रेम उत्पन्न झाले नसते तरच नवल!

आधी आईच्या मृत्यूनंतर 1896-97 साली दुष्काळ आणि सप्टेंबर 1899 साली प्लेगच्या संकटामुळे त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यावेळी बाबाराव यांनी कुटुंबाची पूर्ण जबाबदारी घेतली. याच प्लेगमध्ये धाकटा भाऊ नारायणराव हे बाबारावांच्या सेवा आणि सुश्रुषेमुळे मृत्यूच्या दारातून परत आले. सावरकर कुटुंब रोगातून बाहेर आले. पण, दारिद्य्र आ वासून उभे होते. तात्यांच्या (म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर) शिक्षणात खंड पडणार नाही, याची बाबारावांनी पुरेपूर काळजी घेतली. स्वतः मॅट्ट्रिक न झालेल्या बाबारावांनी तात्यांच्या उज्ज्वल भविष्याकरिता स्वतःच्या शिक्षणाचा अभिमानाने त्याग केला. ते नुसते वडीलबंधू न होता, वडीलसुद्धा झाले. नंतरच्या काळात त्यांनी स्वतःला स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात झोकून दिले.

प्लेगच्या साथीमध्ये क्वारनटाईन परिसरात बाबारावांची म्हसकर आणि पागे यांच्याशी ओळख झाली. त्यांनी म्हसकर आणि पागे यांची तात्यारावांशी ओळख करून दिली. 1899 साली तात्याराव, त्र्यंबक म्हसकर, पागे यांनी ‘विद्यार्थी संघ’ स्थापन केला, जिचे लगेचच ‘राष्ट्रभक्त समूह’ या संघटनेत रूपांतर झाले. नंतर ‘मित्रमेळा संघटना’ स्थापन केली आणि शेवटी 1904 साली ‘अभिनव भारत’ ही क्रांतिकारक संघटना स्थापन केली. बाबाराव या सर्वांचा आत्मा होते. त्यांनी नंतर 1922-23 साली ‘तरुण हिंदू सभा’ संघटना स्थापन केली, जी 1931 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये विलीन केली.

1902 मध्ये तात्याराव पुण्याला गेल्यानंतर ‘मित्रमेळा’ची जबाबदारी बाबारावांनी स्वतःवर घेतली. ‘मित्रमेळ्या’चे मुख्य उद्दिष्ट हे स्वार्थ आणि कोत्या कल्पनांमध्ये कुजत पडलेल्या स्फूर्तिहीन, शक्तिहीन समाजामध्ये स्फूर्ती, तेज, ताकद आणि मुख्य म्हणजे समाजाला स्वातंत्र्याभिमुख करणे, हे होते. बाबारावांनी अनेक नामवंतांना व्याख्यानासाठी आमंत्रित केले. कार्यक्रमात देशभक्तिपर गीते, वेळेचे काटेकोर नियोजन आणि शिवजयंतीसारखे सण राजकीय दृष्टिकोनातून साजरे होत. घोषणांनी भारलेली मिरवणूक ही इंग्रज सत्तेविरुद्ध असंतोषाचा प्रतीक बनली. नाशिक लवकरच क्रांतीचा केंद्रबिंदू बनले. यामागे बाबारावांचा महत्त्वाचा सहभाग होता.

तात्यारावांनी पुण्यात ‘विदेशी’ कपड्याची होळी केली, तशीच नाशिकमध्येसुद्धा बाबारावांनी कपड्याची होळी केली. ‘स्वातंत्र्यदेवी की जय’ हे घोषवाक्य तेव्हा गाजत होते. मिरवणुका, सभा, संमेलने, उत्सव, भाषणे इत्यादीची मशाल बाबारावांनी नाशिकमध्ये सतत तेवत ठेवली; जेणेकरून देशाचा प्रश्न, स्वातंत्र्य हे विषय समाजमनातून बाजूला पडणार नाहीत. ‘अभिनव भारत’मधील बाबारावांचे मुख्य सहकारी म्हणजे कवी गोविंद, सखारामपंत गोरे, वामनराव खरे आणि नारायणराव हे होत.

1909 साली बाबाराव सावरकरांना अटक झाली. त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. या सर्व धुमश्चक्रीत बाबारावांच्या पत्नी येसूवहिनी या पूर्णपणे बाबारावांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. बाबारावांचे चरित्र येसूवहिनींशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. त्यांचे लग्न झाले तेव्हा घर सधन, समृद्ध, आनंदी आणि भरलेले होते. पण, दुष्काळानंतर, प्लेगच्या साथीनंतर आलेले दारिद्य्र या माऊलीने अश्रू न ढळता भोगले. त्यांनी स्वतःचे सर्व अलंकार दिले. तात्यारावांच्या वर्गशुल्कासाठी आईने दिलेली अत्यंत प्रिय नथसुद्धा दिली. किती वाईट वाटले असेल? गंगा सागरला मिळाली की तिचे स्वतःचे अस्तित्वच राहत नाही, येसूवहिनींचे असेच झाले. 1905 सालच्या स्वदेशी चळवळीत त्यांनी बाबारावांसोबत स्वदेशी व्रताची शपथ घेतली. बाबा ‘अभिनव भारत’चे काम बघत, त्याचप्रमाणे वहिनींनी ‘आत्मनिष्ठ युवतीसंघ’चे काम पाहायला सुरुवात केली. घर सांभाळून त्यांनी अनेक गृहिणींना देशभक्ती, स्वदेशीचे महत्त्व पटवून दिले. ‘आपण झिजावे आणि इतरांना सुगंध द्यावा’ हे चंदनाचे व्रत त्यांनी शेवटपर्यंत पळाले.

बाबारावांना अटक आणि अंदमानच्या काळ्यापाण्याची शिक्षा झाल्यावर, इंग्रजांनी त्यांची पूर्ण मालमत्ता जप्त केली. भांडी-कुंड्यांसकट सर्व जप्त झाले. त्यांच्या त्यात किती आठवणी गुंतल्या असतील? समाजाने केलेली अवहेलना, जन्मठेप झालेल्या माणसाची बायको म्हणजे मग त्या अनुषंगाने येणारे अपमान, अवहेलना आल्याच. त्यांनी हे सर्व मुकाट्याने सहन केले. देशभक्तांचा अपमान करणारा समाज तेव्हाही होता, आताही आहे.

कुटुंब कर्तव्यामुळे शिक्षण पूर्ण झाले नसले, तरी त्यांची ज्ञानलालसा प्रचंड होती. त्यांचा ग्रंथसंग्रह प्रचंड होता. त्यांच्या टिपणवहीत केलेल्या नोंदीनुसार त्यांच्याकडे 1 हजार, 119 पुस्तके होती. त्यांची वर्गवारी बघितली तर आपल्या लक्षात येईल की, त्यांचा व्यासंग किती मोठा होता. 227 पुस्तके धर्म, तत्त्वज्ञान यांवरील, 203 इतिहास व राजकारण, 221 चरित्रग्रंथ, 267 पुस्तके संघटनशास्त्र व कला, 150 पुस्तके फक्त शास्त्र विषयावर, 29 - भाषाशास्त्र विषयावर आणि 22 पुस्तके सैन्यव्यवहार यांवर होती. याशिवाय जप्त झालेला संग्रह वेगळा.


बाबारावांनी लिहिलेले ग्रंथ पुढे दिले आहेत,
1. राष्ट्रमीमांसा
2. हिंदूराष्ट्र-पूर्वी-आता-पुढे
3. श्री. शिवरायांची आग्र्यावरील गरुडझेप
4. वीरारत्नमंजुषा
5. धर्म हवा कशाला?
6. वीर बंदा बैरागी
7. ख्रिस्तांचे हिंदुत्व


‘राष्ट्रमीमांसा’ हे त्यांचे अग्रगण्य पुस्तक. हे त्यांनी 1931 साली काशीला औषधोपचारासाठी गेले असताना लिहिले आहे. पण, 1931 ते 1934 या काळात ते स्थलबद्ध असल्यामुळे ‘दुर्गातनय’ या टोपण नावाने हे पुस्तक प्रकाशित झाले. याव्यतिरिक्त बाबारावांनी स्फुटलेखनही बरेच केले. त्यांनी वेळोवेळी दैनिके, नियतकालिके यांमधून लेख लिहिले. त्याच्या लेखनाचा भर हा ‘हिंदू संघटन कार्य’ यावर अधिक होता. त्याकाळच्या ‘केसरी’, ‘लोकमान्य’, ‘महाराष्ट्र’, ‘सकाळ’, ‘आदेश’, ‘वंदे मातरम’, ‘मराठा’, ‘श्रद्धानंद’, ‘प्रजापक्ष’, ‘विक्रम’ इत्यादी वृत्तपत्रांमधून सतत लेखन केले.


जन्मठेपेतून सुटल्यानंतर मृत्यूपर्यंत बाबारावांनी हिंदुत्वाच्या कार्याला वाहून घेतले. गांधी आणि त्यांचे खिलाफत चळवळी बद्दलचे विचार यावर त्यांनी जोरदार आघात करायला सुरुवात केली. ‘गांधी-अमानुल्लाह करारा’ची जाणीव सर्वसामान्यांना व्हावी अशी बाबारावांची इच्छा होती. या प्रकरणातील तथ्ये लिहिण्याची आणि प्रसिद्ध करण्याची त्यांची उत्कट इच्छा होती. ही इच्छा पुण्यातील प्रसिद्ध विद्वान अनंत जनार्दन करंदीकर यांनी पूर्ण केली. बाबारावांनी ‘लिबरेटर’चे अंक आणि इतर संदर्भ साहित्य करंदीकरांना दिले. करंदीकरांना अधिक साहित्य उपलब्ध झाले आणि त्यांनी ‘केसरी’मध्ये लेखांची मालिका सुरू केली. या लेखांच्या प्रकाशनादरम्यान बाबाराव आणि करंदीकर सतत पत्रव्यवहार करत असत आणि बारकावे मांडत असत.

बाबारावांनी ‘तरुण हिंदूसभा’ची स्थापना केली. गावोगाव ते संघटनेच्या शाखा उभारण्यासाठी फिरत. वयवर्षे 16 ते 40 मधील कोणीही व्यक्ती या संघटनेचा सभासद होऊ शके. हिंदूजनांवरील सर्व प्रकारची आक्रमणे हटवून ते सुसंघटित, प्रबळ आणि स्वतंत्र व्हावेत, हा या तरुण सभेचा उद्देश होता. सभेचा असा आदेशच होता की, आपल्या भगिनींचे संरक्षण करावे, गावोगावी लाठीकाठीचे, सैनिक संचालनाचे वर्ग उघडावेत, स्वकीय व्यवसाय सुरू करावेत, अस्पृश्यता-निवारण्याचे काम करावे.
1929 सालची अकोला येथील सभेची परिषद चांगलीच गाजली. या परिषदेस पूजनीय डॉ. हेडगेवार, डॉ. मुंजे, लोकनायक अणे इत्यादी थोर मंडळी उपस्थित होती. 1931 सालापर्यंत बाबारावांनी या सभेचे कार्य नेटाने चालू ठेवले आणि नंतर तरुण सभेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये विलीन केले.


1925 सालच्या विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर डॉ. हेडगेवारांनी सुरू केलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य आणि तरुण हिंदूसभेचे कार्य हे हिंदुत्वाचे एकच कंकण घातलेली माणसे होती. त्यामुळे सभेचे सभासद हे संघाच्या एकाच झेंड्याखाली उभे राहायला काहीच अडचण आली नाही. संघ स्थापनेच्या दिवशी बाबाराव नागपुरातच होते. त्यांनी ही संघटना पाहिली, त्यामुळे हिंदूंच्या उत्कर्षासाठी स्थापन होणार्‍या संघाला तरुण सभेच्या सदस्यांनी साहाय्य केलेच पाहिजे, अशी बाबारावांची धारणा होती. बाबा दिवसरात्र संघाच्या उत्कर्षाची चिंता करत असत.

डॉ. हेडगेवार यांच्यासारख्या नवीन रक्ताचे कुशल संघटक मिळाल्याने बाबारावांनी ‘तरुण हिंदूसभा’ 1931 साली आनंदाने संघात विलीन केली. संघ चिरंजीव आणि यशस्वी होवो, असा आशीर्वाद दिला. संघात आपली संघटना विलीन करून बाबाराव थांबले नाहीत, त्यांनी संघाच्या कार्यात स्वतःला झोकून दिले. 1932 मध्ये बाबारावांनी संघकार्याच्या विस्तारासाठी महाराष्ट्राचा दौरा आखला. बाबारावांनी डॉ. हेडगेवार यांना पत्र लिहून पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करण्याचे आमंत्रण दिले. त्याला मान देऊन डॉक्टरांनी बाबारावांसोबत दौरा केला.

1933 सालापर्यंत हिंदू महासभेच्या घटनेत फक्त ‘हिंदू संघटना’ असे म्हटले होते. बाबाराव दूरदृष्टीचे होते, 1933 मध्ये त्यांनी सभेच्या संविधानात दुरुस्ती प्रस्तावित केली. बाबारावांच्या दुरुस्तीत ‘हिंदूराष्ट्र’ हा शब्द समाविष्ट होता. हिंदू महासभेचे उद्दिष्ट असे लिहिले की, “हिंदू महासभेचे उद्दिष्ट हे हिंदू संस्कृती आणि हिंदू सभ्यता यांचे संरक्षण आणि प्रसार करणे आहे आणि त्याचबरोबर हिंदूराष्ट्राच्या उन्नतीसाठी आणि वैभवासाठी त्यांचे जतन करणे आहे.” तुरुंगातून सुटल्यानंतरही बाबारावांचा क्रांतिकारकांशी संपर्क सुरूच होता.

बाबारावांना त्यांच्या आयुष्यातील बराच काळ आजारपणाने ग्रासले. सेल्युलर जेलमधील त्यांच्या आयुष्यातील अनेक वर्षे त्यांना शारीरिकदृष्ट्या हानी पोहोचवत होती. जेव्हा त्यांना मायग्रेनचा झटका येत असे, तेव्हा ते तासन्तास डोक्यावर दगड आपटत असत.

बाबाराव अखेर मे-जून 1943 साली सांगलीला आले. ते अंथरुणाला खिळले होते. बाबाराव मृत्युशय्येवरही हिंदूंच्या कार्याचे समर्थन करत राहिले. त्यांच्या शेवटच्या काळात त्यांनी ख्रिस्ताच्या हिंदुत्वाचे पुस्तक पूर्ण केले. बाबाराव दिवसभर असंख्य अभ्यागतांना भेटत असत. सर्व वयोगटातील लोक त्यांच्याकडे सल्ल्यासाठी येत असत. तथापि, बाबारावांची तब्येत आता बिकट टप्प्यावर पोहोचली होती. जुलै 1944 साली त्यांचा अशक्तपणा इतका तीव्र झाला की, त्यांच्या पायांमध्ये वेदनादायक पेटके येऊ लागले. बाबारावांचे हृदय त्यांच्या सहकार्‍यांबद्दल कृतज्ञतेने भरून आले होते. ते म्हणायचे की, “त्यांची राष्ट्रसेवा ही इतरांनी केलेल्या सेवेचे फळ आहे.” दि. 8 फेब्रुवारी 1945 रोजी तात्याराव आपल्या मोठ्या भावाला भेटण्यासाठी मुंबईहून सांगलीला आले, ही या राष्ट्रप्रेमी बंधूंची शेवटची भेट. दि. 16 मार्च 1945 रोजी राष्ट्र आणि हिंदू कारणासाठी झटणारा हा अवलिया त्यांचे जाज्वल्य विचार सोडून अनंतात विलीन झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भगवाध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आला आणि संघाची प्रार्थना म्हणण्यात आली.
बाबाराव आणि विनायक सावरकर यांचं नातं केवळ रक्ताचं नव्हतं, तर विचारांचं होतं. दोघेही एकमेकांचे प्रेरणास्थान होते. बाबारावांनी तुरुंगात भोगलेली अमानुष शिक्षा पाहून विनायक सावरकरांच्या मनात राजबंद्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवण्याची प्रेरणा मिळाली. त्यांनी पुढे अनेक लेखनांतून ही व्यथा मांडली.

विनायक सावरकर नेहमी बाबारावांना आपले मार्गदर्शक मानत. त्यांच्या विचारांनी प्रेरणा घेऊन त्यांनी क्रांतीचा मार्ग अधिक प्रभावीपणे पुढे नेला. सेल्युलर जेलमध्ये दोघांनीही अत्यंत कठोर शिक्षा भोगल्या, पण त्यांच्या राष्ट्रनिष्ठेवर याचा परिणाम झाला नाही. एकूणच बाबाराव आणि विनायक सावरकर यांचं नातं हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील एक उज्ज्वल अध्याय आहे. त्यांच्या एकत्रित कार्यामुळे भारतीय क्रांतीच्या विचारधारेस चालना मिळाली आणि भावी पिढ्यांना स्वातंत्र्यासाठी प्रेरणा मिळाली.

तात्यारावांनी त्यांच्या मोठ्या भावाला दिलेल्या श्रद्धांजलीचा उल्लेख करून शेवट करणे योग्य ठरेल. ‘आपण पहिल्यांदा पेटविलेल्या स्वातंत्र्याच्या यज्ञाने संपूर्ण राष्ट्र व्यापून टाकले आहे. जेव्हा तुमच्यासारख्या शूर योद्ध्याचे शरीर, जे 60 वर्षे सतत लढत आहे, ते पडले तर केवळ नश्वर शरीर नसून, तर ते एका महान प्रवाहात अर्पण केलेले आहे. मित्र म्हणून भेटायला आलेल्या मृत्यूचे आपण स्वागत करूया.”
- ओंकार ठोसर
Powered By Sangraha 9.0