स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचे स्वातंत्र्यचळवळीतील उत्तुंग योगदान हे सर्वश्रुत. पण, सावरकरांना याकामी साथ लाभलेल्या त्यांच्या जीवाभावाच्या ‘मित्रमेळ्या’तील सहकार्यांच्या क्रांतिकार्याची दखल घेणेही क्रमप्राप्त. कारण, सावरकरांबरोबरच त्यांच्या सहकार्यांनाही आंदोलन, खटले, शिक्षा आणि ब्रिटिशांच्या मानसिक छळाला सामोरे जावे लागले. राष्ट्रप्रेमासाठी आणि सावरकरांच्या एका शब्दाखातर कित्येकांनी आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवले आणि स्वातंत्र्ययज्ञात आपल्या बलिदानाची आहुती दिली. तेव्हा, सावरकरांच्या अशाच काही शौर्यवान, पराक्रमी आणि देशभक्तीने ओतप्रोत भरलेल्या सहकार्यांचे वीरस्मरण करणारा हा लेख...
धन्य ते गाव, धन्य ते त्या गावांमधील इतिहासातील गाव जे अजरामर झाले.सावरकरांनी आपल्या वागणूक, वर्तणूक व स्नेहाने मिळवलेली, देशहितार्थ, राष्ट्रहितार्थकरिता उभी केलेली प्रभावळ तिचेही तेवढेच महत्त्व आणि अस्तित्व मान्य करावे लागेल.म्हसकर, रावजी पागे, सखारामपंत गोरे, विष्णु महादेव भट, श्रीधर वर्तक, नथू भिकू बर्वे, बाळूरावजी बापू, त्र्यंबक वर्तक, गंगाराम, रामभाऊ दातार बंधू, गणपत न्हावी, काशिनाथ वैशंपायन, गोविंद देसाई, दाते, नाना वर्तक, अनंत बर्वे, शंकर वाघ, परशुराम शिंपी, राजाराम शिंपी, गोपाळ देसाई, आठल्ये, खाडे बंधू, सरोदे, शंकर गोसावी, धनाप्पा चिवडेवाला, देवीसिंग परदेशी, खुशाल सिंग, गणपती, मगर, मायदेव, घनश्याम चिपळूणकर, जसवंत बंधू, बाबाराव सावरकर, दामोदर चंद्रात्रे, कृष्णाजी महाबळ, दुगुल गोगटे, रामभाऊ भाटे, मुकुंद मोघे, देशपांडे, सोमण, दांडेकर, व्यंकटेश नागपूरकर, त्रिंबक देशपांडे, वि. ना. देशपांडे, बि. ग. केळकर, कृष्णाजी खरे, वामन नारायण जोशी, बाळकृष्ण मराठे, गंगाधर चितळे, भास्कर रामचंद्र खरे, गणेश बाबाजी काथे, महादेव गाडगीळ, विठ्ठल बाळकृष्ण जोशी, वासुदेव आठल्ये, त्र्यंबक कृष्ण बुरकुले, जोगळेकर, विष्णुशास्त्री केळकर, वामन दातार, कवी गोविंद म्हणजेच आबा दरेकर, नाना गोखले, नाशिकचे घाणेकर, रावबहादूर वैद्य, कवी पारख, बापूराव केतकर, अण्णा पटेदार या सार्यांनी सावरकरांवर श्रद्धा, भक्ती, निष्ठा समर्पित केली होती. या सार्यांची साथसोबत व सहकार्याने काही कायमचे सहकारी झाले, तर काहींनी आपापल्या परीने देशसेवा, राष्ट्रसेवा केली. अनेक सहकार्यांनी देशहितार्थ स्वातंत्र्याकरिता अमानुष छळ, शिक्षा, कारागृहे असा अतिभयंकर त्रास सहन केला.
‘मित्रमेळ्या’चे ध्येय ‘संपूर्ण स्वातंत्र्य’ हेच होते. ते सावरकरांनी सर्व सहकार्यांच्या गळी उतरवले होते. नाना वर्तक हा सहकारी मिरवणुकीमध्ये वयस्कर माणसाप्रमाणे डोक्यावर पागोटे घालून मिरवणुकीत पुढे चालण्याचा मान अतिशय ममत्वपूर्वक करीत असे. आबा दरेकर काव्यपदे लिहीत, सारे सहकारी त्याचे गायन करीत. या बालगोपालांच्या त्या रणघोषणा, ते काव्यगायन बघून सगळ्यांना भारी कौतुक वाटे. सारेच बालसवंगडी ‘प्रथम राष्ट्रभक्त समूह संस्थे’चा सांकेतिक शब्द ‘रामहरी’ शब्दांनी एकमेकांना अभिवादन करीत. राष्ट्र उपयोगी पडलेल्यांमध्ये शंकर वाघ यांची गणना केली पाहिजे. म्हसकर हे सावरकरांचे अगदी प्रथमपासूनचे एकनिष्ठ सहकारी. वयाने सावरकरांपेक्षा मोठे. सरकारी नोकरीतले. राष्ट्रभक्त समूहापासून ते ‘मित्रमेळ्या’पर्यंतचे अतिशय विश्वासातले. ‘मित्रमेळ्या’चा व्याप व छाप नाशिककरांवर पडत असताच 1901 साली म्हसकर प्लेगने एकाएकी गेले. ‘म्हसकर म्हणजे एक प्लेगकवच’ अशी त्यांची खाती होती. वर्षानुवर्षे त्यांनी प्लेगच्या रोगात दिवस-रात्र काम केले होते. अखेर त्यांना भ्रम पडला, त्या भ्रमात ते इंग्रजांशी लढाया लढू लागले. स्वातंत्र्यलक्ष्मीचा जयघोष करीत धावपळ करीत.
सावरकर म्हसकर यांच्यासंबंधी लिहितात, “इंग्रजांशी लढून स्वदेश स्वातंत्र्यासाठी प्रत्यक्ष सम्राट मारीत मारीत मरणाची त्यांची हाक निदान त्यांच्यापुरती तरी त्यांनी पुरवून घेतली. त्यांनी घेतलेलीशपथ पाळली आणि परशत्रूशी लढत त्यांनी देशस्वातंत्र्यर्थ प्राणाचे बलिदान दिले. स्वातंत्र्याच्या ध्यासातच देह ठेवला.”
भगूरचा बालसवंगडी, सहकारी राजाराम शिंपीची तात्यारावांवरची भक्ती काय सांगू. राजाराम व परशुराम शिंपी भगूरच्या बाजारात घासलेटचे दुकान चालवीत. त्यातून ते रेवडी घेत असत. प्रथम तात्यांच्या मुखी घातल्याशिवाय स्वतः खात नसत. त्याकाळी जातिवादाचे स्तोम होते, ब्राह्मण विटाळला वगैरे. परंतु, तात्यारावांना त्याही बालवयात जातिभेदाचा तिरस्कार, तिटकारा वाटे.ज्यावेळी तात्यांनी भगूर सोडले, तेव्हा सावरकर कुटुंबीयांचे त्यांनी छायाचित्र काढून घेतले. त्या छायाचित्राच्या रूपात तात्या राजारामजवळ सदैव राहिले. ते छायाचित्र पुढे सरकारच्या रोषाला बळी पडणार या भयाने राजारामाने पोथीत घालून वर-खाली लाकडी फळ्यात लपेटून 14 वर्षे गंध, फुल वाहत ठेवले. तात्यांचे हे छायाचित्र तात्याराव सुटून आल्यावर राजारामाने दाखवले आणि “मी तुम्हाला नवीन प्रत काढून देतो, ही माझ्या पूजेची प्रत आहे,” असे सांगितले. दुर्दैवाने हे छायाचित्र आता उपलब्ध नाही.
राजाराम सारखाच बालमित्र गोपाळ देसाई. हा तर क्रांतिकार्यात लाभलेला सहकारी. ‘मित्रमेळा’ ही गुप्त संस्था होती. तरी नवीन सभासदांसाठी किशोर मंडळाची शाखा ‘मित्रसमाज’ या नावाने उघडण्यात आली. त्याचे चालकत्व डॉ. नारायणराव सावरकर, श्रीधर वर्तक, दत्तू केतकर यांच्यावर सोपवले होते. त्याच किशोर मंडळात नारायण सावरकरांच्या वयाचे कृष्णाजी कर्वे सहभागी झाले. पुढे चालून ‘अभिनव भारत’च्या क्रांतिकार्याशी जुळले.
जॅक्सन कटात नंतर त्यांना फाशी झाली. त्र्यंबक शाखेचा सहकारी महादेव फडके ‘अभिनव भारत’ संस्थेतून नि इतर यथाशक्ती बरीच सार्वजनिक कार्य करीत असे. त्यांच्या मनात देशभक्तीची ज्योत पेरली नि धाडसी कार्यक्रमात सहकारी झाला. या सार्यात अधिक एक नाव उल्लेखनीय आहे ते म्हणजे विष्णु महादेव भट. हे सावरकरांचे दूरचे मावस भाऊ. त्यांची नि सावरकरांची प्रथम भेट 1901 साली सावरकरांच्या विवाहात झाली. त्यांचे टोपण नाव ‘भाऊ.’ हे सावरकरांनीच ठेवले. पुढे तेच नाव घरीदारी, मित्रमंडळीत रुढ झाले. सावरकर म्हणतात, “भाऊ हा माझा चौथा भाऊ झाला. ‘मित्रमेळ्या’त त्यांचा प्रवेश झाला आणि अगदी अल्पावधीतच आम्हा दोघांची मने एकजीव झाली.” सावरकर पुढे लिहितात, “आम्ही राहू एकत्र, जेवू एकत्र, वाचू एकत्र, एवढेच काय वेशदेखील आम्ही एकसारखे घालीत असू.” भाऊ सावरकरांना गुरू मानत, पालक मानत. भाऊ आपले ज्ञान, वक्तृत्व आणि तत्परतेमुळे ‘मित्रमेळ्या’चे एक विश्वासू, प्रामाणिक, धुरंधर असे नेते म्हणून गणले जाऊ लागले. त्यांच्याकडूनच अनेक प्रकारचे इतिहास सावरकरांनी वाचून घेतले. पुढे अनेक संकटांना भाऊंनी तोंड दिले आणि त्याचे भीषण परिणाम मोठ्या धैर्याने सोसले. आठल्ये हे एक भगूरचे सहकारी. ‘मित्रमेळ्या’वर जिवलग प्रेम करणारे. पुढे सातारच्या ‘अभिनव भारत’ची शाखा काढण्यासाठी आठल्येंवर खटला होऊन क्रांतिकारक कटासाठी शिक्षाही झाली.
या संपूर्ण ध्येयवेड्या सहकार्यांपैकी सखारामपंत गोरे. अतिशय चैनी, खट्याळ, धीट. मॅट्ट्रिक परीक्षेत वर्गातील विद्यार्थ्यांत सर्वांत अधिक वेळा नापास होण्याचा मान त्यांचाच. डोळ्याने थोडे तिरके. सावरकरांच्या संपर्कात येताच ‘मित्रमेळ्या’ची शपथ घेतली असली, तरी बैठकीचे गांभीर्य नसे. येथेही सदैव बेशिस्तपणा, माकडचेष्टा करायचे. परंतु, सावरकरांच्या दबावाखाली थोडे गंभीर होत गेले. सावरकरांच्या संगतीमुळे ध्येयशून्य सखाराम ‘देशभक्त सखाराम’ झाले. त्यांनी कापड दुकान सुरू केले. परंतु, संपूर्ण वेळ त्यांचे मन, मेंदू देशकार्यातच रमत असे. त्यांच्या दुकानाच्या भिंतीवर ‘देशासाठी मरा’ असे लिहिलेले असे व जमाखर्चाच्या दुकानाच्या हिशोबी चोपड्यांवर ‘स्वातंत्र्यलक्ष्मीचा जयजयकार’ असे. सावरकर कुटुंबीयांवर प्रेम करणार्या या सहकार्याने आपल्या पत्नीच्या अंगावरचे सगळे दागिने गहाण टाकून बाबाराव सावरकरांना साहाय्य केले होते. दुकानाच्या नफ्यातून क्रांतिपक्षाला साहाय्य करीत असे. स्वदेशाच्या स्वातंत्र्याकरिता अनन्वित शारीरिक छळ सोसावे लागले, तरी प्राण जाईपर्यंत विश्वासघाताचा शब्द न उच्चारता त्यासाठी अखेर प्राण सोडणारे सखारामपंत हुतात्मा ठरले. त्यांच्या मृत्यूचे रहस्य इतिहासाला उलगडता आले नाही. त्यांच्या देशभक्तीचा खरा कस नाशिक कटामध्ये लागला. त्यांना कोंडून ठेवले तेथे नवीन कैदी येत. त्यांना ओरडून ओरडून सांगत असे की, “खोटे जबाब देऊ नका. काही झाले तरी फितूर होऊ नका.” असे सांगताच सखाराम यांना पोलिसांनी मॅग्नेशियमचे पाणी बळजबरीने पाजले तरी ते झुकले नाहीत. भयंकर शिक्षा झाली त्यात ते गेले असे कोणी सांगतात, तर कोणी सांगतात की, पिसाळल्याचे इंजेक्शन त्यांना देण्यात येऊन मग ते पिसाळले म्हणून त्यांना गोळी घालण्यात आली. सत्य काय ते इतिहासाला कळू शकले नाही हेच खरं.
असे कितीतरी सहकारी होते. त्यात मायदेव हे अतिशय विनोदी. ते उनाड नव्हते, परंतु देशकार्यात पडले ते सावरकरांच्या संगतीने. सावरकरांचा पुढचा प्रवास सुरू झाला, तेव्हा यांचा प्रवास थांबला. पुढे एक विनोदी नट म्हणून एका नाटक मंडळात प्रसिद्धी पावले, असे सावरकरांना अंदमानात कळाले. असाच एकनिष्ठ सहकारी धर्मवीर आणि क्रांतिकारी विश्वासराव डावरे. 17-18 वयात जॅक्सन कटात अडकलेले. सार्या सहकार्यांचे कार्यकर्तृत्व अफाट. त्यांची देशभक्ती, राष्ट्रभक्ती नि सावरकर प्रेम, ‘मित्रमेळा’ संस्थेवरच प्रेम, सार्या सहकार्यांनी वेळप्रसंगी चळवळी, आंदोलन, कट, खटले, शिक्षा, छळ, मानसिक त्रास सोसला. घरादारांवर तुळशीपत्र ठेवले आणि अनेक जोखमीची कामे देशस्वातंत्र्यासाठी केली. पिस्तुलाच्या अफरातफरीपासून तर बॉम्ब बनवण्यापर्यंत.
शब्दमर्यादा अभावी काहींचा केवळ नामोल्लेख केला तरी सिद्रामप्पा वाळवे, विष्णु रहाळकर, दामोदर रावजी रानडे, भागन नारळी, आप्पा भाई जोगळेकर अशी कितीतरी नावे विस्मरणाच्या उदरात गडप झालीत. देश स्वातंत्र्यांकरिता प्राणपणाला लावणार्या सार्या सहकार्यांना वीर सावरकर जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
भगूर गावाचे प्रेम केवढे विनायकावरती
जणू अयोध्या नगर भाळले श्रीरामावरती
- वीरेंद्र देशपांडे