डोंबिवलीत उद्या अक्षता देशपांडे यांचे व्याख्यान; कालजयी सावरकर विशेषांकाचे प्रकाशन

27 May 2025 12:18:32
 
akshata deshpande lecture in dombivali
 
डोंबिवली : दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी ‘कालजयी सावरकर विशेषांक’ प्रकाशित केला जातो. यंदा ‘स्वातंत्र्यलढ्यात सावरकरांना लाभलेले सहकारी’ ही या विशेषांकाची मध्यवर्ती संकल्पना आहे. बुधवार, दि. २८ मे रोजी सायंकाळी ६: ४५ वाजता डोंबिवली पूर्वेतील टिळकनगर विद्यामंदिर येथे सदर विशेषांकाचे प्रकाशन आणि ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या विषयावर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
 
डोंबिवलीतील हुतात्मा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुनील कांबळे हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील. मुख्य अतिथी म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कल्याण जिल्हा माननीय संघचालक नितीन शिंत्रे असतील. नाशिक येथील सुप्रसिद्ध स्वा. सावरकर अभ्यासक अक्षता मानसी माधव देशपांडे यांचे व्याख्यान हे या कार्यक्रमाचे खास आकर्षण असणार आहे.
 
या कार्यक्रमास ‘टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ’, ‘अभ्युदय प्रतिष्ठान’ आणि ‘श्री लक्ष्मी नारायण संस्था’ सहयोगी संस्था म्हणून जोडल्या आहेत. तर कल्याण येथील सुरेश पटवर्धन, प्रवीण देशमुख, सौरभ सुरेश पटवर्धन, विवेक बिवलकर, वसंत काणे, श्रीधर पांडुरंग पटवर्धन, ‘श्री तिसाई रुग्णालया’चे डॉ. उमेश कापुसकर, ‘महाजन हार्ट क्लिनिक’चे डॉ. विवेक महाजन, अ‍ॅड. अनिरुद्ध गर्गे, अंबरनाथ येथील अनंत फार्माचे अजित गोडबोले, भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, भाजपचे डोंबिवली पूर्व मंडल अध्यक्ष मितेश पेणकर, भाजपचे माजी नगरसेवक शैलेश धात्रक, मनिषा धात्रक, ‘रिअल अ‍ॅकेडमी’चे अमोल पोतदार, ‘अश्वमेध ऑर्थो रुग्णालया’चे डॉ. राजू गीते, दुर्गेश परुळकर यांचे सहकार्य लाभले आहे.
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कल्याण जिल्हा कार्यकारिणीच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने कल्याण आणि डोंबिवलीकर नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन दै. ‘मुंबई तरुण भारत’चे रिजनल सेल्स हेड यशवंत मोर्ये यांनी केले आहे.
  
Powered By Sangraha 9.0