‘प्रारब्ध’ या लघुपटासह विचारांची निर्मिती होणारा सांस्कृतिक सोहळा!

27 May 2025 16:19:12


a cultural event that creates ideas with the short film prarabdh



मुंबई : संस्कार भारती कोकण प्रांत चित्रपट विधा यांच्या वतीने आयोजित 'सिनेटॉकीज' हा विशेष कार्यक्रम ३१ मे रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत अंधेरीतील एम ए ए, वर्सोवा येथे पार पडणार आहे. या वेळी 'प्रारब्ध' हा भावस्पर्शी लघुपट प्रेक्षकांसमोर सादर होणार असून, त्यानंतर त्या लघुपटाच्या निर्मात्यांसोबत विचारमंथनात्मक चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.


'सिनेटॉकीज' हा केवळ एक फिल्म स्क्रीनिंग शो नसून तो एक सर्जनशील व्यासपीठ आहे. इथे केवळ कथा सांगितल्या जात नाहीत, तर त्या कथांच्या मागील विचारांवर, संवेदनांवर आणि त्या माध्यमातून होऊ शकणाऱ्या सकारात्मक परिवर्तनावरही सखोल चर्चा होते.

यंदाच्या सत्रात सादर होणारा 'प्रारब्ध' हा लघुपट, एका तरुणाच्या जीवनातील मूल्यं, कर्तव्य आणि त्याचा व्यवसाय या तिघांमधील संघर्ष मांडतो. जेंव्हा व्यावसायिक गरजांपुढे वैयक्तिक मूल्यं उभी राहतात, तेंव्हा व्यक्तीसमोर काय निवड असते? आणि ती निवड त्याच्या आयुष्याला कशी दिशा देते? अशा गुंतागुंतीच्या विषयावर भाष्य करणाऱ्या या लघुपटाची संकल्पना आणि सादरीकरण, नक्कीच प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी ठरणार आहे.


कार्यक्रमाची संकल्पना आणि रचना अशी आहे की, एखादी कलाकृती फक्त दाखवून संपवायची नसून तिच्यावर विचारविनिमय करणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळेच 'सिनेटॉकीज' मध्ये प्रत्येक स्क्रिनिंगनंतर संवादाचा एक खास टप्पा ठेवण्यात येतो. या चर्चेच्या माध्यमातून केवळ कलाकारांनाच नव्हे, तर उपस्थित प्रेक्षकांनाही आपले विचार मांडण्याची संधी मिळते.


संस्कार भारती ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून विविध कलाविषयक उपक्रमांच्या माध्यमातून संस्कार, सृजन आणि समाजजागृती यामध्ये सातत्याने काम करत आहे. चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून, ते समाजात विचारांचं प्रतिबिंब उमटवू शकतं, ही श्रद्धा बाळगणाऱ्या संस्थेचा 'सिनेटॉकीज' हा एक महत्त्वाचा उपक्रम ठरतो आहे. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कोणतीही फी नाही, मात्र उपस्थित राहून कलाकारांचा सन्मान करणे आणि विचारांचे आदान-प्रदान करणे हीच खरी देणगी असे आयोजकांचे मत आहे. तर आपल्या सर्वांचा ‘ 'सिनेटॉकीज'  मध्ये मनःपूर्वक स्वागत आहे. या विचारशील सत्राचा भाग व्हा, ‘प्रारब्ध’ अनुभवायला या आणि संवादातून सर्जनशीलतेची नवी दिशा मिळवा.


Powered By Sangraha 9.0