रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळेना : एका स्वातंत्र्यशाहिराची गाथा...

    27-May-2025
Total Views |
 
Without begging British rule poet Govinda darekar kept his pen his inspired by Savarkar revolutionary spirit
 
स्वातंत्र्यसंग्रामात केवळ हातातील शस्त्रास्त्रांनी नव्हे, तर आपल्या धारदार लेखणीनेही शेकडो लेखक, कवींनी ब्रिटिशांना अक्षरश: घायाळ गेले. ‘रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळेना’ ही कविता प्रकाशित केल्यामुळे सावरकरांचे बंधू बाबाराव सावरकरांना जन्मठेपेची शिक्षा झाली. ही क्रांतीची मशाल पेटवणारे कवी म्हणजे कवी गोविंद उपाख्य आबा त्र्यंबक दरेकर. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांचा परिसस्पर्श झालेल्या या कवीच्या अनेक कविता ब्रिटिशांनी जप्त केल्या. त्यांच्या लेखनावर निर्बंध आणण्याचा प्रयत्न केला. पण, ब्रिटिश राजवटीला भीक न घालता, कवी गोविंदांनी सावरकरांच्या क्रांतिप्रेरणेतून आपली लेखणी तळपती ठेवली. अशा या स्वातंत्र्यशाहिराची ही गाथा...
 
स्वातंत्र्यसंग्रामाच्या रणधुमाळीत अनेक तेजस्वी व्यक्तिमत्त्वांनी आपल्या वाणी आणि लेखणीने स्वातंत्र्यसैनिकांच्या मनात स्फुल्लिंग चेतवले. बंकिमचंद्रांच्या ‘वंदे मातरम्’ आणि विनायक दामोदर सावरकरांच्या ‘जयोस्तुते’ यांसारख्या गीतांनी हजारो स्वातंत्र्यवीरांना ऊर्जा दिली. याच काळात एक असेच ज्वलंत गीत गुंजले, ते म्हणजे ‘रणाविण कोणा स्वातंत्र्य मिळाले.’ या गीताने केवळ भारतातच नव्हे, तर लंडनमध्येही स्वातंत्र्यप्रेमींच्या मनात क्रांतीची मशाल पेटवली.
 
या गीताचे कर्ते कोण असतील, असा प्रश्न सहज कोणालाही पडू शकतो. प्रथमदर्शनी यातील ऊर्जा आणि राष्ट्रभक्ती पाहून हे गीत सावरकरांनीच लिहिले असावे, असे वाटते. मात्र, ही सावरकरी धार असलेली रचना एका वेगळ्याच कवीची आहे, ज्यांचे सावरकर बंधूंशी घनिष्ठ संबंध होते. विशेष म्हणजे, या गीताच्या केवळ मुद्रणासाठी बाबाराव सावरकरांना इंग्रजांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावून अंदमानच्या काळकोठडीत पाठवले. आज या लेखाच्या माध्यमातून आपण याच क्रांतिशाहिराची गाथा जाणून घेणार आहोत. त्यांचे नाव आहे कवी गोविंद उपाख्य आबा त्र्यंबक दरेकर.
 
कवी गोविंद यांचा जन्म दि. 9 फेब्रुवारी 1874 रोजी नगरमधील पारनेर येथे झाला. त्यांचे वडील त्र्यंबकजी नाशिकमध्ये गवंडीकामासाठी आले आणि तिथेच स्थायिक झाले. गरिबीमुळे गोविंद यांचे बालपण कष्टात गेले. गोविंद अवघ्या चार वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे आकस्मिक निधन झाले. संकटावर संकट कोसळावे, तसे गोविंद यांच्या आयुष्यात झाले. आठ वर्षांचे असताना त्यांना तीव्र ताप आला आणि त्यांच्या कमरेखालचे शरीर लुळे पडले. सहा महिने अंथरुणावर खिळल्यानंतर ते चमत्काराने वाचले, पण त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले. लहान वयात पितृछत्र हरपले आणि त्यात शारीरिक व्यंग आले. घरी अठराविश्वे दारिद्य्र होतेच. त्यांची आई धुणीभांडी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती. अपंगत्वामुळे त्यांची शाळा सुटली. मात्र, गोविंद यांच्यात उपजतच काव्यप्रतिभा होती. माता सरस्वतीचा त्यांना वरदहस्त लाभला होता. तमाशा आणि लावण्या ऐकता ऐकता ते स्वतः लावण्या रचू लागले आणि याच लावण्यांनी त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार दिला.
 
परंतु, नियतीने त्यांच्यासाठी वेगळेच काहीतरी योजले होते. गोविंद आणि त्यांची आई नाशिकमधील नगरकर गल्लीत विश्वामित्रांच्या वाड्यात राहण्यास आले. तिथे त्यांना चांगली संगत मिळाली आणि ज्या परिसस्पर्शासाठी नियतीने ही योजना आखली होती, तो क्षण 1897च्या जुलैमध्ये आला. विनायक दामोदर सावरकर, भगूरहून नाशिकला वास्तव्यासाठी आले आणि याच परिसरात वर्तकांच्या वाड्यात राहू लागले. खरे तर गोविंद ऊर्फ आबा हे सावरकरांपेक्षा 12-13 वर्षांनी मोठे होते. परंतु, सावरकरांचे व्यक्तिमत्त्वच असे होते की, लहानथोर सगळेच त्यांच्यासमोर नतमस्तक होत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होऊन आबाही भारले गेले, यात नवल ते काय? सावरकरांसोबतच त्यांची दातार आणि वर्तक इत्यादी मंडळींशी घनिष्ट मैत्री झाली.
सावरकरांसोबत आबा ‘मित्रमेळ्या’च्या बैठकांना जाऊ लागले.
 
या बैठकांमध्ये धर्म, समाज, शिक्षण आणि शारीरिक सामर्थ्य यांसारख्या अनेक विषयांवर चर्चा होत असत. याच काळात सावरकरांनी बाजीप्रभू देशपांडे यांच्यावर पोवाडा रचला. सावरकरांच्या या काव्याने आबांच्या काव्यप्रतिभेला एक नवी दिशा मिळाली. उपजत काव्यप्रतिभा लाभलेल्या गोविंदाने शिवजयंतीच्या मुहूर्तावर अफजलखान वधाचा पोवाडा रचला. त्यानंतर त्यांनी अनेक स्वातंत्र्यगीते, राष्ट्रभक्ती आणि देशभक्तीने ओतप्रोत असलेल्या कविता, गाणी आणि पोवाड्यांची रचना केली. ‘स्वातंत्र्याचा पाळणा’, ‘रावण बिभीषण संवाद’, ‘घनश्याम श्रीराम’, ‘शिवाजी व मावळे यांच्यातील संवाद’, ‘हेमाचा दरबार’, ‘कुठे बाळाराम’, ‘गीता मुरली नमने पाहुनी स्तवन उधळा’, ‘भारतात तार’,‘शिवबाचा दरबार’ यांसारख्या अनेक रचना त्यांनी केल्या.
 
गोविंद यांची ‘रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळेना’ ही कविता बाबाराव सावरकरांनी प्रकाशित केली. याचमुळे गणेश दामोदर सावरकर उपाख्य बाबाराव सावरकर यांच्यावर इंग्रजांनी देशद्रोहाचा खटला भरून 1909 मध्ये त्यांना अंदमानच्या काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली. आपल्या कवितेमुळे बाबारावांना इतके कठोर हाल सोसावे लागले, याचे दुःख आबांच्या मनात सतत सलत होते. गोविंद यांनी लिहिलेली ही कविता जणू काही अनंत कान्हेरेंच्या क्रोधाला धार देत होती. अनंत कान्हेरेंनी नाशिकमध्ये जॅक्सनचा वध केला. यानंतर अनेक क्रांतिकारकांची धरपकड झाली. त्यात आबाही होते. परंतु, त्यांची शारीरिक स्थिती पाहून पोलिसांना त्यांच्याबद्दल शंका वाटली नाही आणि पोलिसांनी त्यांना सोडून दिले. मात्र, जॅक्सन कटात अनेकांना कारावास झाला. अशा परिस्थितीत ‘अभिनव भारत’च्या नाशिक शाखेचा ध्वज कवी गोविंदांनी मात्र फडकावत ठेवला. ते अत्यंत दृढनिश्चयी होते. सावरकररूपी परिसाच्या स्पर्शाने त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले होते आणि त्यांच्या मनात देशभक्तीची भावना अधिक दृढ झाली होती.
 
कवी गोविंदांचे राष्ट्रकार्य
 
कारावासाची शिक्षा झालेल्या तुरुंगातील आपल्या सहकारी मित्रांच्या कुटुंबीयांना आधार देणे, त्यांच्या अडचणींना मदत करणे आणि त्यांना आर्थिक साहाय्य करणे, हे अत्यंत महत्त्वाचे काम आबांनी केले. एवढेच नव्हे, तर ज्या वेळेस सावरकर बंधू अंदमानमध्ये काळ्या पाण्याची शिक्षा भोगत होते, त्या वेळेस येसूवहिनी आणि माईंना धीर देऊन त्यांच्याबरोबर ते खंबीरपणे उभे होते.
 
गोविंद दरेकर यांनी अनेक देशभक्तीपर कविता लिहिल्या, ज्या ब्रिटिश सरकारने जप्त केल्या होत्या. त्यांच्या कवितांमध्ये राष्ट्रभक्तीची तीव्र भावना आणि स्वातंत्र्याची उत्कट आकांक्षा दिसून येते. आबांनी एकूण 52 कविता रचल्या. शारीरिक अडचणींमुळे ते स्वतः लिहू शकत नव्हते, तेव्हा महाबळ गुरुजींनी त्यांचे लेखनिक म्हणून काम केले. पुढे आबांच्या इच्छेनुसार महाबळ गुरुजींनी 1930 मध्ये आबांच्या कवितांचे पुस्तक प्रसिद्ध केले.
 
- ‘रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले? : या कवितेत आबांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी संघर्षाची आवश्यकता सांगितली आहे. ते म्हणतात की, कोणालाही स्वातंत्र्य लढल्याविना मिळत नाही. ही कविता देशभक्ती आणि स्वातंत्र्याच्या तीव्र इच्छेची भावना व्यक्त करते.
 
- सुंदर मी होणार : या कवितेत आबांनी मृत्यूचे स्वागत केले आहे. ते मृत्यूला नव्या शरीराचे आणि नव्या शक्तीचे पंख देणारा म्हणून पाहतात. ही कविता आत्मिक आणि उदात्त विचारांची आहे, ज्यात मृत्यूला नवीन जीवनाची सुरुवात मानले आहे.
 
- टिळकांची भूपाळी : या कवितेत लोकमान्य टिळकांवरील आदर आणि निष्ठा व्यक्त केली आहे. टिळकांच्या कार्याचे आणि विचारांचे महत्त्व सांगितले आहे. ही कविता टिळकांच्या योगदानाला आदराने स्मरण करते.
 
- शिवबाचा दरबार : या कवितेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे वर्णन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना धर्मरक्षक आणि देशाचे पालनकर्ता म्हणून गौरवले आहे. ही कविता छत्रपती शिवाजी महाराजांच्या महानतेचे आणि त्यांच्या कार्याचे गुणगान करते.
 
- मुरली : या कवितेत आबांनी अध्यात्म आणि वेदांताचे तत्त्वज्ञान व्यक्त केले आहे. ‘मुरली’ आणि ‘वेदांताचा पराक्रम’ या कवितांमधून त्यांनी जीवनातील खोल तत्त्वज्ञान मांडले आहे.
 
या कवितांमधून आबांच्या काव्यप्रतिभेची आणि त्यांच्या विचारांची खोली दिसून येते. त्यांच्या कवितांमध्ये राष्ट्रभक्ती, अध्यात्म आणि जीवनाचे तत्त्वज्ञान यांचा सुंदर समन्वय आढळतो. दिव्यांग असूनही आबांनी सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला. त्यांचे मित्र त्यांना पाठीवर घेऊन विविध ठिकाणी नेत असत, जिथे ते आपल्या कवितांचे गायन करून लोकांच्या मनात राष्ट्रभक्तीची भावना जागृत करत आणि त्यांना स्वातंत्र्यासाठी लढण्याची प्रेरणा देत. आबांच्या शब्दांमधील क्रांतिकारी विचार ब्रिटिश सत्तेला धोकादायक वाटले, म्हणूनच ब्रिटिशांनी त्यांच्या अनेक कविता जप्त केल्या आणि त्यांच्या लेखनावर निर्बंध आणण्याचा प्रयत्न केला, पण आबा थांबले नाहीत. त्यांच्या कवितांमध्ये हिंदुत्वाचा अभिमान स्पष्टपणे दिसतो. त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून हिंदू धर्माच्या गौरवशाली परंपरांचे संरक्षण केले आणि समाजालाही जागृत करण्याचे कार्य केले. आबांच्या कार्यामुळे महाराष्ट्रात एक अनमोल ठेवा निर्माण झाला आहे. त्यांच्या कवितांमधून आणि कार्यातून त्यांनी समाजाला सतत प्रेरणा दिली आहे.
 
1921 मध्ये बाबाराव आणि तात्यारावांची अंदमानच्या जन्मठेपेतून सुटका झाली. आबांना या दोघांनाही भेटण्याची तीव्र इच्छा होती. परंतु, सावरकरांना रत्नागिरीच्या तुरुंगात ठेवले, तर बाबारावांना विजापूर आणि साबरमतीच्या तुरुंगात ठेवले. त्यानंतर तात्यारावांना रत्नागिरीतच स्थानबद्ध करण्यात आले. मात्र, देवाला कदाचित आबा आणि तात्यांची भेट घडवून आणायची होती. रत्नागिरीत ग्रंथज्वराची साथ पसरल्यामुळे सावरकरांना नाशिक येथे राहण्याची अनुमती मिळाली आणि नाशिकमध्येच त्यांची भेट झाली.
 
आबांचे आरोग्य दिवसेंदिवस खालावत चालले होते. शारीरिक वेदना असह्य होत होत्या. त्यामुळे त्यांना हातात लेखणी धरणेही शक्य नव्हते. अशा परिस्थितीतही त्यांची काव्यप्रतिभा मात्र ओतप्रोत ओथंबत होती. आबांच्या नवीन कविता महाबळ गुरुजी लिहीत असत. अक्षरशः मृत्यूपूर्वी 15 दिवस आधी ‘सुंदर मी होणार हो मरणाने मी जगणार’ ही 21 कडव्यांची कविता आबांनी महाबळ गुरुजींकडून लिहून घेतली आणि दोन दिवस आधी ‘गोविंदाची करुणागाण’ ही कविता पूर्ण झाली.
 
आपल्या भावना व्यक्त करताना आबा म्हणाले होते, “मला माझ्या मातृभूमीसाठी, माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी खूप काही करायची इच्छा आहे. परंतु, व्याधीने आणि माझ्या पांगळ्या शरीरामुळे मी काही करू शकलो नाही. माझ्या या पांगळ्या शरीराला मृत्यू येईल, परंतु पुन्हा एकदा सुंदर देह घेऊन मी माझ्या मातृभूमीसाठी वारंवार जन्म घेईन.” अशा प्रकारे आपल्या कवितेतून इच्छा व्यक्त करून दि. 28 फेब्रुवारी 1926 रोजी श्रीयुत गोविंद उपाख्य आबा त्र्यंबक दरेकर यांनी आपली जीवनयात्रा संपवली.
अशा या स्वातंत्र्यशाहीर, क्रांतिकारकांचे प्रेरणास्रोत आणि सावरकरांचा परिसस्पर्श लाभलेल्या कवी गोविंदांना या लेखनाच्या माध्यमातून विनम्र अभिवादन!
 
- डॉ. अजित चौधरी