धक्कादायक! मृत्यूच्या दिवशीही वैष्णवी हगवणेला मारहाण; अंगावर मारहाणीच्या तब्बल २९ खुणा

27 May 2025 11:10:52

Vaishnavi Hagvane
 
मुंबई : सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या सततच्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मृत्यूच्या दिवशीसुद्धा वैष्णवीला मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
 
पुण्यातील मुळशी तालुक्यातील राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येमुळे राज्यभरात संतापाचे वातावरण आहे. सासरच्या लोकांकडून हुंड्यासाठी वैष्णवी हगवणे हिचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केली असून याप्रकरणात आतापर्यंत वैष्णवीचे सासरे, सासू, नवरा, दीर आणि नणंद यांना अटक करण्यात आली आहे. 
 
दरम्यान, वैष्णवीला आत्महत्येच्या दिवसापर्यंत मारहाण केल्याची माहिती पुढे आली आहे. तिच्या अंगावर मारहाणीचे २९ व्रण आढळले असून त्यातील ५ ते ६ व्रण ताजे असल्याचे शवविच्छेदन अहवालातून पुढे आले आहे. मृत्यूच्या दिवसापर्यंत सासरच्यांकडून तिचा छळ करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
 
हगवणे कुटुंबियांची बँक खाती गोठवली!
 
हगवणे कुटुंबियांची सर्व बँक खाती गोठवण्यात आली असून या बँकेतील व्यवहारांची चौकशी करण्यात येणार आहे. दुसरीकडे, लता हगवणे, करीश्मा हगवणे आणि शशांक हगवणे यांच्या पोलिस कोठडीत २ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. तर आरोपी निलेश चव्हाण अद्याप फरार असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0