रामायणात ज्याप्रमाणे राम आणि लक्ष्मण वनवासात गेल्यानंतर, भरताने राज्यकारभाराची धुरा सांभाळली, तद्वत बाबाराव आणि तात्याराव अंदमानाच्या काळकोठडीत असताना, धाकल्या नारायणरावांनी सावरकर कुटुंबाचा कष्टपूर्वक सांभाळ केला. आपल्या क्रांतिकारी बंधूंच्या सुटकेसाठी चळवळी, आंदोलनांतून अपरिमित प्रयत्न करण्याबरोबरच, स्वातंत्र्यलढ्यातही नारायणरावांनी स्वत:ला झोकून दिले. एक उत्तम वक्ता, परखड विचार मांडणारा लेखक, दंतवैद्यक असलेल्या वीराग्रणी नारायणरावांची ही क्रांतिगाथा उलगडणारा लेख...
वीराग्रणी डॉ. नारायण सावरकर हे खरोखरच चाणाक्ष होते. प्रत्येक क्रांतीकार्यात, हत्येच्या वेळी, बाँबस्फोटांच्या घटनेत त्यांना पकडले जात होते. प्रत्येक वेळी सरकारला न्यायालयात त्यांनी पुरावे देऊन स्वतःची सुटका करून घेतली. अशा प्रकारे नारायणरावांनी ब्रिटीश सरकारने केलेल्या आरोपांवर प्रत्येक वेळी मात केली. अभिनव भारतची गुप्तकामे त्यांनी बुद्धीचातुर्याने तडीस नेली. आपल्या दोन मोठ्या भावांप्रमाणे तेही त्यांच्यासारखेच ज्वल-जहाल क्रांतीकारक होते. स्वातंत्र्यवीर सावरकर हेच डॉ. नारायणराव सावरकरांचे स्फूर्ती स्थान होते. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन ! ज्याप्रमाणे प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण वनवासात असताना बाळ भरताने राज्यकारभार सांभाळला, त्याचप्रमाणे बाबा नि तात्या अंदमानात काळे पाण्याची शिक्षा भोगत असताना बाळ नारायणरावांनी उद्ध्वस्त झालेला संसार मोठ्या कष्टाने सांभाळला. त्यांनी आपले शिक्षण प्रतिकूल, बिकट परिस्थितीत पूर्ण केले. शिक्षण होता होता कौटुंबिक दायित्व सांभाळणे, देशभक्तीचे गुप्त क्रांतिकार्य वाढवणे, तसेच आपले दोन्ही वडीलबंधू बाबाराव नि तात्याराव यांना सोडवून आणण्यासाठी जनआंदोलने केली. तसेच राष्ट्रीय चळवळी नि सामाजिक चळवळींमध्येही ते अग्रेसर होते.
“निःशस्त्र झालेल्या आपणाला आता चित्ररूपानेच तरवार दिसू शकणार! पण, ज्या तरवारीने हिंदूपदपातशाहीस्थापन केली, ती छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तरवार आज कोठे आहे? मेवाडच्या स्वातंत्र्यासाठी झगडणारी ती महाराणा प्रतापसिंहाची तरवार कोठे आहे? अटकेपार भगवा झेंडा फडकावणार्या राघोभरारीची तरवार आज कोठे आहे? पारतंत्र्यात असलेल्या आपणाला तरवार पेलली जाणारी सशक्त मनगटेतयार केली पाहिजेत.”वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी बाळ सावरकरांनी ‘तरवार’ या विषयावर दिलेल्या भाषणातला प्रत्येक शब्दत्यांच्या मुखातून अग्निबाणाप्रमाणे बाहेर पडत होता. आपल्या कर्तृत्व, समर्पण आणि बुद्धिमत्तेच्या जोरावरभारतीय स्वातंत्र्यलढ्यावर ठसा उमटवणारे आडनाव म्हणजे सावरकर. डॉ. नारायण तथा बाळ दामोदर
सावरकर हे क्रांतिकारक त्रिवर्ग सावरकर बंधूंपैकी सर्वांत धाकटे सावरकर. डॉ. सावरकर म्हणजे वक्ता दशहस्त्रेषु.
ब्रिटिश सत्ताधार्यांनी तयार केलेला जातीय निर्णय (कम्युनल अॅवॉर्ड) या नावाने ओळखल्या जाणार्या एकाराष्ट्रघातक गोष्टीवर आधारलेली होती. प्रत्यक्ष लोकसंख्येत शेकडा 25 टक्के असणार्यांना जाती निर्णयाने राजकीयदृष्ट्या शेकडा 33 टक्के आणि हिंदू शेकडा 75 टक्के असताना अवघे 42 टक्के करण्यात आले होते. याच्यानिषेध सभेला मुंबईहून नारायणरावांना मुद्दाम प्रमुख वक्ते म्हणून पुण्याला आमंत्रित करण्यात आले होते.डॉ. सावरकरांच्या दणदणीत आणि प्रभावशाली भाषणाचा विषय होता, ‘आगामी निवडणुका व हिंदूंचे कर्तव्य.’ त्यातील काही वाक्ये ही हिंदूंनी आजतागायत लक्षात ठेवावीत, अशी आहेत. ते म्हणतात, “या राष्ट्रात
सर्व मतांना मान आहे. परंतु, ज्याच्या त्याच्या परमेश्वरविषयक भावना व कल्पना त्याला योग्य रितीने प्रतिपालन करता येणे, हेच लोकशाहीचे आद्य तत्त्व आहे, हे जितके खरे आहे, तितकेच त्या राष्ट्रातील बहुमतवाल्यांचे त्या राज्यावर राज्य असणे, हेही खरे आहे. देश थोर असला तरी त्याची ती थोरवी ज्या कल्पनेवर किंवा ज्या संस्कृतीवर अवलंबून असते, ती अधिक थोर होय आणि तिचे संरक्षण व संवर्धन केले, तरच देशाचे संरक्षण व संवर्धन होत असते. जपान हे ज्याप्रमाणे जपान्यांचे, इंग्लंड इंग्रजांचे, फ्रान्स फ्रेंचांचे, अमेरिका अमेरिकनांची, त्याप्रमाणे हिंदुस्थान हा हिंदूंचा-हिंदूंचा-हिंदूंचा.” पुढे ते म्हणतात, “हिंदू हा काही हिंदुस्थानात कोणी चोर नाही. हिंदू हा या भारतवर्षाचा मालक आहे. दुर्दैवाने गेल्या 15 वर्षांत अशी एक भ्रामक समजूत येथे पसरवण्यात आली आहे की, हिंदूंनी स्वतःस ‘हिंदू’ म्हणविणे, हे अराष्ट्रीय आहे. त्यामुळे कित्येकांना स्वतःस ‘हिंदू’ म्हणविण्यास लाज वाटते. ही मात्र अत्यंत लाजेची गोष्ट आहे.” नारायण सावरकरांचे भाषणातील विचार असे परखड आणि सुस्पष्ट होते.
ओघवत्या वक्तृत्वाबरोबरच डॉ. सावरकर यांच्या काही अत्यंतिक महत्त्वाच्या व अभ्यासपूर्ण लेखनाच्यासुद्धा नोंदी उपलब्ध आहेत. डॉ. सावरकरांनी प्राचीन हिंदूंच्या तेजस्वी इतिहासावर ‘दैनिक प्रभात’मध्ये सलग 20-25 लेख लिहून सन 1949 मध्ये प्रसिद्ध केले होते. तेव्हाचा कालखंड हा हिंदुत्वाचा अभिमान जाहीरपणे बाळगण्यास व प्रकट करण्यास तितकासा अनुकूल नव्हता. तरीही, डॉ. सावरकर यांनी हिंदूंचा इतिहास ज्या व्यापक भावनेने लिहिला, ती भावना तेव्हाच्या विचारप्रवाहालासुद्धा पोषक ठरण्याची आशा ‘दैनिक प्रभात’ने व्यक्त केली होती. भारताचा सुवर्णमय इतिहास उजेडात आणण्याचे मोलाचे काम त्यांनी ‘हिंदूंचा विश्वविजयी इतिहास’ या ग्रंथाद्वारे केले. यासाठी त्यांनी संदर्भासाठी एकूण 14 इंग्रजी-मराठी ऐतिहासिक ग्रंथांचे वाचन केले होते. डॉ. सावरकर लिहितात, “हिंदूंचे आत्मतेज, आत्मविश्वास, अंतःस्फूर्ती नष्ट करण्याकरिता, इतिहास क्षेत्रामध्ये जो भयंकर कट परकीय इतिहासकारांनी रचला, त्याचे भयंकर दुष्परिणाम नंतरच्या सर्व पिढ्यांवर झाले आणि ‘हिंदूंचा इतिहास म्हणजे पराभवाचा इतिहास’ असा लाचारीचा समज हिंदू सुशिक्षितांमध्ये रूढ झाला. हिंदू गबाळे, भेकड. ‘हिंदू’ हा शब्द उपयोजिताना लज्जा वाटावयास लागली. त्यामुळे आज ऐतिहासिक सत्य घटनांवर सहसा विश्वास न ठेवणारे, त्यांना भाकडकथा म्हणणारे लोकच अधिक दिसून येतील. आज ख्रिश्चन मिशनरी ख्रिश्चन धर्माचा प्रसार करत जगभर हिंडत आहेत; त्यांचे कितीतरी कौतुक आपणास वाटते. परंतु, आपले पूर्वजही अशाच धाडसाने, धर्मप्रचाराच्या स्वर्गीय स्फूर्तीने, स्वतःची सुखमय घरेदारे, राजसिंहासनेही तृणवत् मानून देशोदेशी, शतकानुशतके हिंडले. त्यांची स्मृतीही आपणास नसावी?” भ्रांत मनस्थितीने पछाडलेल्या हिंदू समाजाला आपल्या सामर्थ्याची स्पष्ट कल्पना देणारा हा ऐतिहासिक ग्रंथ लिहून डॉ. सावरकरांनी हिंदू समाजासाठी फार मोठे काम केले मराठीच्या ऐतिहासिक वाङ्मयात फार मोलाची भर घातली.
डॉ. नारायण दामोदर सावरकर यांचा जन्म दि. 25 मे 1888 रोजी नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे झाला. 1892 साली नारायणराव अवघे चार वर्षांच्या असताना त्यांच्या मातोश्रींनी त्यांच्यासमोरच प्राण सोडले. या मुलांची पितृछायासुद्धा पुढच्या काही वर्षांत हरवली व मुले पोरकी झाली. 1899 सालच्या प्लेगच्या आजाराने दामोदर सावरकरांचे निधन झाले. नारायणराव व बाबारावांनासुद्धा या दुर्धर आजाराने ग्रासले, परंतु सुदैवाने ते यातून वाचले. सन 1900 मध्ये लोकमान्य टिळकांच्या चळवळीच्या बातम्यांनी प्रेरित होऊन दामूअण्णांच्या तीन मुलांनी राष्ट्रीय चळवळी घरातच करण्यास सुरुवात केली व सावरकरांच्या ‘मित्रमेळा
1907 सालचे सुरत काँग्रेस अधिवेशन, नारायणराव सावरकर यांच्या मनाची घडण, सिद्धता आणि प्रहारक्षमता वाढवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरले. लोकमान्यांच्या राष्ट्रीय चळवळी, तात्याराव सावरकरांच्या विलायतीतील घडामोडी व स्वतःवरील अभियोग, या सर्व घटनांचा आणि वैचारिक प्रबोधनाचा परिणाम ‘मित्रमेळ्या’चे युवा नेते नारायणराव सावरकरांवर फार मोठ्या प्रमाणात त्यांच्या तरुणपणी झाला. तात्याराव लंडनमध्ये उच्च शिक्षण घेत असताना बाबाराव व नारायणरावांनी भारतात ‘मित्रमेळ्या’चे काम चालू ठेवले. एका साध्या भांडणात ‘मित्रमेळ्या’तील म्होरक्या आयता हाती सापडल्याने इंग्रजांनी बाबारावांना अटक केली. त्यावेळी नारायणरावांनी मोलाचे प्रसंगावधान दाखवले. त्यांनी एकाला तातडीने नाशिक येथे पाठवून येसूवहिनींच्या मदतीने गुप्त कागदपत्रे घरातून हलविली. त्यामुळे पोलीसझडतीत काही मिळू शकले नाही. या प्रसंगावधानामुळे बाबारावांना फक्त एक महिना सश्रम कारावासाची शिक्षा झाली. असेच प्रसंगावधान नारायणरावांनी पिस्तुले लपवण्यातही दाखवले. तात्यारावांनी हिंदुस्थानात पाठवलेली 20 पिस्तुले, इंग्रजांनी घरावर घातलेल्या छाप्यातूनसुद्धा नारायणरावांनी खूप धैर्याने वाचविली. पुढे याच पिस्तुलांचा कलेक्टर जॅक्सनच्या वधासाठी उपयोग झाला. शस्त्रे जमविणे, गुप्त स्थळी ठेवणे, शिकविणे, त्यांची वाहतूक करणे, नंतर त्याचा वापर करणे इत्यादी धैर्याची, चातुर्याची कामे नारायणराव सावरकर करीत असत. नारायणरावांची कार्यक्षमता अशा स्फोटकजन्य परिस्थितीत वाढत गेली.
नारायणराव सावरकरांना आपले थोरले बंधू तात्याराव सावरकरांप्रमाणे ‘बॅरिस्टर’च व्हायचे होते. परंतु, हे होऊ शकले नाहीत. कारण, 1908 साली बाबाराव सावरकर यांच्या ‘वंदे मातरम’ खटल्याची आणि घरची व्यवस्था पाहणे नारायणरावांना भाग पडले. नारायणराव सावरकरांवर राजद्रोही सशस्त्र क्रांतिकारकाचा ठसा उमटल्यामुळे, त्यांना कोणत्याही ब्रिटिश महाविद्यालयात प्रवेश मिळू शकला नाही. ‘कोलकाता कॉलेज ऑफ फिजिशियनस अॅण्ड सर्जन्स’ या वैद्यकीय महाविद्यालयात फ्रेंच प्राचार्याने त्यांना प्रवेश दिला. त्यांच्या शिक्षणात त्यांना आईसमान मादाम कामांचीदेखील खूप मदत झाली. 1915 मध्ये डॉ. नारायणराव यांचा शांताबाई यांच्याशी विवाह झाला व 1916 साली नारायणराव सावरकर दंतविशारद झाले. डॉ. सावरकरांचा वैद्यकीय व्यवसायात जम बसूनसुद्धा क्रांतिकार्याचा व्याप न झेपण्याइतका अफाट होता. उत्पन्नापेक्षा देणेकर्यांची संख्या जास्त. दोन्ही वहिनींना अंदमानात बाबा आणि तात्यांची भेट घडवण्यासाठी नारायणरावांनी घरादारावर कर्ज काढले आणि जीवाचे रान केले. 1919 साली त्यांना भेटीचा परवाना मिळाला, परंतु तोपर्यंत येसूवहिनी इहलोक सोडून गेल्या होत्या. त्यानंतर बाबा आणि तात्यांच्या प्रत्यक्ष मुक्ततेसाठी डॉ. सावरकरांनी देशात आंदोलन सुरू केले. काही प्रभावी पुढार्यांना, वृत्तपत्रांच्या संपादकांना, ब्रिटिश सरकारवर वजन आणण्यासाठी विनंती केली. चार महिन्यांत सुमारे 80 हजार स्वाक्षर्या गोळा केल्या. महात्मा गांधींनी ‘यंग इंडिया’मध्ये सावरकर बंधूंवर 1920 मध्ये लेख लिहिला. डॉ. सावरकरांच्या भगीरथ प्रयत्नांमुळे सावरकर बंधूंच्या सुटकेला भारतीय स्वरूप प्राप्त झाले. गांधीवधानंतर गुंडांनी कपाळात दगड घातल्यामुळे डॉ. नारायण सावरकर जबर जखमी झाले. या हल्ल्यातून डॉ. सावरकर पूर्ण बरे कधीच झाले नाहीत, तरीही त्यांचे लेखन आणि औषधालय चालूच होते. पुढे दि. 19 ऑक्टोबर 1949 रोजी डॉ. नारायणराव सावरकरांचे निधन झाले. थोर देशभक्ताचा अंत झाला. संसारापेक्षा राष्ट्राचा संसार प्रिय असणारे डॉ. सावरकर अखेरपर्यंत निस्वार्थी जीवन जगले.