"आज बाळासाहेब असते तर..."; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचे उबाठा गटाला खडेबोल

27 May 2025 12:16:05
 
Amit Shah
 
नांदेड : ऑपरेशन सिंदूरनंतर पाठवण्यात आलेल्या सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळावर उबाठा गटाचे एक नेते टीका करतात. पण आज बाळासाहेब असते तर त्यांनी ऑपरेशन सिंदूरसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची गळाभेट घेतली असती, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उबाठा गटाला खडेबोल सुनावले. सोमवार, २६ मे रोजी नांदेड येथे आयोजित शंखनाद सभेत ते बोलत होते.
 
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ विविध देशांत पाठविण्याचा निर्णय घेतला. हे खासदार पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर उघड करणार आहेत. परंतू, उबाठा गटाचे एक प्रमुख नेते ‘ही कुणाची वरात जात आहे,' असे म्हणाले. मला कळत नाही की, या उद्धव सेनेला नेमके झाले तरी काय? एकेकाळी हा बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष होता. आज बाळासाहेब ठाकरे असते तर ऑपरेशन सिंदूरसाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची गळाभेट घेतली असती. पण उद्धवसेना सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाला वरात म्हणतो. ज्यात त्यांचे देखील खासदार सहभागी झाले आहे," अशी टीका त्यांनी केली.
 
हे वाचलंत का? -  धक्कादायक! मृत्यूच्या दिवशीही वैष्णवी हगवणेला मारहाण; अंगावर मारहाणीच्या तब्बल २९ खुणा
 
३१ मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद संपणार!
 
ते पुढे म्हणाले की, "२२ एप्रिलला पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी पहलगाममध्ये आपल्या निर्दोष पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून त्यांच्या कुटुंबियांसमोर मारले. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाटणामध्ये सांगितले होते की, अतिरेकी कुठेही लपले असले तरी त्यांना शोधून संपवले जाईल. पाकिस्तान बहुधा विसरला असावा की, १० वर्षांपूर्वी इथे काँग्रेसचे सरकार होते. आता ते बदलले असून ११ वर्षांपासून इथे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार आहे. उरी हल्ल्याला आपण सर्जिकल स्ट्राईकने उत्तर दिले, पुलवामा हल्ल्याला एअर स्ट्राईकने प्रत्युत्तर दिले आणि आता पहलगाम हल्ल्यानंतर ‘ऑपरेशन’ सिंदूर राबवून पाकिस्तानातील दहशतवादी तळांना जमिनीत गाडून टाकले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भूमीत आज मी जाहीर करतो की, दि. ३१ मार्च २०२६ रोजी देशाच्या भूमीतून नक्षलवाद समाप्त झालेला असेल," असा विश्वासही अमित शाह यांनी यावेळी व्यक्त केला.
 
 
 
Powered By Sangraha 9.0