वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी ५ जणांना अटक! हगवणे पिता-पुत्रांना केली होती मदत; कर्नाटकच्या माजी मंत्र्यांचा मुलाचा समावेश

27 May 2025 12:47:35
 
Vaishnavi Hagawane
 
मुंबई : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात एक मोठी अपडेट पुढे आली आहे. वैष्णवीॉच्या मृत्यूनंतर फरार असलेले तिचे सासरे आणि दीराला मदत करणाऱ्या ५ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. फरार आरोपींनी कुणाचा आणि कसा आसरा घेतला याबद्दल पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.
 
पुण्यातील मुळशी तालुक्यातील राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने सासरच्या छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर तिची सासू लता हगवणे, नणंद करीश्मा हगवणे आणि पती शशांक हगवणे यांना तात्काळ पोलिसांनी अटक केली. मात्र, वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे फरार झाले होते.
 
हे वाचलंत का? -  "आज बाळासाहेब असते तर..."; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचे उबाठा गटाला खडेबोल
 
राजेंद्र आणि सुशील हगवणे या दोघांच्या शोधासाठी पोलिसांची सहा पथके तैनात करण्यात आली होती. अखेर सात दिवसांनंतर २३ मे रोजी बावधन पोलिसांनी त्या दोघांनाही स्वारगेट परिसरातून अटक केली. याकाळात त्यांनी विविध रिसॉर्ट आणि फार्महाऊसवर आसरा घेत पोलिसांना चकवा दिला. दरम्यान, ज्यांनी ज्यांनी या फरार आरोपींना लपून बसण्यात मदत केली आणि त्यांना आश्रय दिला अशा पाच जणांना आता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
 
यामध्ये कर्नाटकचे माजी मंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम वीरकुमार पाटील (वय ४७, रा. कोगनोळी, ता. चिकोडी, जि. बेळगाव, कर्नाटक), मोहन उर्फ बंडू उत्तम भेगडे (वय ६०, रा. वडगाव मावळ), बंडू लक्ष्मण फाटक (वय ५५, रा. लोणावळा), अमोल विजय जाधव (वय ३५, रा. पुसेगाव, ता. खटाव, जि. सातारा), राहुल दशरथ जाधव (वय ४५, रा. पुसेगाव, ता. खटाव, जि. सातारा) यांचा समावेश आहे. या पाचही जणांना न्यायालयात हजर करून त्यांच्या पोलिस कोठडी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0