‘गोली’ का जवाब ‘गोले’ से देंगे!

26 May 2025 19:56:35
‘गोली’ का जवाब ‘गोले’ से देंगे!
मुंबई, “पाकिस्तान बहुधा विसरला असावा, की भारतात आता काँग्रेस नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार आहे. उरी हल्ल्याला आम्ही सर्जिकल स्ट्राईकने उत्तर दिले, पुलवामा हल्ल्याला एअर स्ट्राईकने प्रत्युत्तर दिले आणि आता पहलगाम हल्ल्यानंतर ‘ऑपरेशन’ सिंदूर राबवून पाकिस्तानातील दहशतवादी तळांना जमिनीत गाडून टाकले. या मोहिमेमुळे जगभरात संदेश पोहोचला आहे, की भारत आणि या देशाच्या सीमांशी छेडछाड केल्यास अत्यंत वाईट परिणामांना सामोरे जावे लागेल. आम्ही गोळीचे उत्तर गोळ्यांनीच (मिसाईल) देऊ”, असा गर्भित इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवार, दि. २६ मे रोजी शत्रूराष्ट्रांना दिला.

नांदेड येथे आयोजित शंखनाद सभेत ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. अशोक चव्हाण यांच्यासह भाजप आणि महायुतीमधील वरिष्ठ नेते उपस्थित होते. दि. २२ एप्रिलला पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी आमच्या निर्दोष पर्यटकांवर धर्म विचारून गोळ्या डागल्या. पंतप्रधानांनी त्यावेळी पटनामध्ये सांगितले होते, की या अतिरेक्यांना शोधून मारू आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून त्यांनी ते कृतीत उतरवून दाखवले. पाकिस्तानची ‘एअर डिफेन्स सिस्टिम’ कशी ना-पाक आहे, हे आपण दाखवून दिले. आमच्या आया बहिणींच्या माथ्यावरील ‘सिंदूर’ स्वस्त नाही हे मोदीजींनी संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे. आपल्याला असा भारत बनवायचा आहे की, ज्याच्यासमोर कोणी डोळे वर करून बघणार नाही, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ विविध देशांत पाठविण्याचा निर्णय घेतला. हे खासदार पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा उघड करत आहेत. पण उबाठा गटाच्या एका नेत्याने म्हटले की, ‘ही कुणाची वरात जात आहे’. या उद्धव सेनेला नेमके झाले तरी काय? एकेकाळी हा बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष होता. आज बाळासाहेब ठाकरे असते, तर ऑपरेशन सिंदूरसाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची गळाभेट घेतली असती. पण उद्धवसेना सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाला वरात म्हणतो. ज्यात त्यांचे देखील खासदार सहभागी झाले आहे, असा हल्लाबोल अमित शाह यांनी केला.

३१ मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद हद्दपार


ऑपरेशन सिंदूरसह भारतात ‘ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट’ सुरू होते. छत्तीसगडमध्ये ५ हजार फूट उंचीवर असलेल्या नक्षलवाद्यांच्या तळांना सीआरपीएफ, छत्तीसगड पोलीस आणि बीएसएफने संयुक्तरित्या कारवाई करत उद्ध्वस्त केले. त्यात ३१ नक्षलवादी मारले गेले. त्यानंतर पुन्हा ३६ नक्षली मारले गेले. कैक नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली, काहींना अटक झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भूमीत आज मी जाहीर करतो की, दि. ३१ मार्च २०२६ रोजी देशाच्या भूमीतून नक्षलवाद समाप्त झालेला असेल”, असेही अमित शाह यांनी जाहीर केले.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कामाचे कौतुक


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचे कौतुक केले. पुढील पाच वर्षांत मुख्यमंत्री फडणवीस यांच्यामुळे मराठवाड्यातील प्रत्येक गावात पाणी पोहोचणार आहे. सम्राट अशोकाच्या काळापासून दुष्काळाने ग्रस्त असलेला हा प्रदेश पाणीदार होणार आहे. कोकण आणि कृष्णा खोऱ्यातील नद्यांचे पाणी मराठवाड्याच्या गाव आणि घरात पोहोचेल, असेही ते म्हणाले.


Powered By Sangraha 9.0