रोजच्या देशभक्तीची गोष्ट

26 May 2025 21:24:09
रोजच्या देशभक्तीची गोष्ट

आजच्या काळात देशप्रेम ही कृतीतून दिसणारी ती भावना दुर्मिळ होत चालली आहे. मोबाईलच्या स्क्रीनवर तिरंगा लावणारे अनेकजण प्रत्यक्षात देशासाठी काय करतात? हा विचार दुर्लक्षित केला जातो. राष्ट्र ही संकल्पनाच धूसर होत आहे. म्हणूनच आज नव्या पिढीला देशभक्ती ही वर्तमानातही का आवश्यक आहे, हे शिकवण्याची गरज निर्माण झाली आहे. देशप्रेम म्हणजे युद्धाच्या वेळची घोषणा नाही, तर प्रत्येक नागरिकाच्या रोजच्या वागणुकीतील जबाबदारी आहे.


मागील पिढ्यांना स्वातंत्र्यलढा, युद्धे, आणीबाणी अशा घटनांचा प्रत्यक्ष अनुभव होता. त्या संघर्षांतून देशप्रेमाची भावना तरुणांमध्ये नैसर्गिकरित्या तयार होत असे, वृद्धिंगत होत असे. पण, आजच्या पिढीला अशा एकत्रित संघर्षाचा अनुभव नाही. त्यामुळे देशाशी असलेली भावनिक नाळ अनेकदा तोकडी वाटते. आजची पिढी स्पर्धात्मक आणि तंत्रज्ञानाधिष्ठित जगात वावरते आहे. करिअर, पैसा, यश या गोष्टींसाठी धावपळ करताना ‘देशासाठी काहीतरी’ करणे, ही भावना मागे पडली की काय? असे वाटते. परदेशी जाणे, तिथे स्थायिक होणे, हेच ऐहिक यशाचे मोजमाप बनले आहे. देशप्रेम मुलांना शिकवणे आवश्यक आहे का?



आजच्या वेगाने बदलणार्‍या जागतिक परिस्थितीत जिथे सीमा झपाट्याने नष्ट होत आहेत आणि विविध संस्कृती एकमेकांशी मिसळत आहेत, अशा काळात ‘देशप्रेम’ ही संकल्पना काही लोकांना जुनाट वाटू शकते. पण, कोणताही देश सशक्त, सुसंगत आणि प्रगत राहण्यासाठी, त्याच्या नागरिकांनी विशेषतः लहान वयातच देशाबद्दल आत्मीयता आणि जबाबदारीची भावना अंगीकारणे अत्यंत आवश्यक आहे. देशप्रेम म्हणजे फक्त राष्ट्रध्वज फडकवणे किंवा राष्ट्रगीत म्हणणे एवढेच मर्यादित नसते. ते एक खोल भावनिक नाते असते. आपल्या देशाच्या वाटचालीबद्दल आदर, त्याच्या मूल्यांबद्दल निष्ठा आणि त्याच्या प्रगतीसाठी योगदान देण्याची इच्छा अंतर्मनात दृढ होयला लागते. त्यामुळे मूलभूत प्रश्न हाच आहे की, मुलांना देशप्रेम कसे आणि का शिकवले पाहिजे.


देशप्रेम म्हणजे काय?


देशप्रेम म्हणजे आपल्या देशाबद्दलची प्रेमभावना आणि निष्ठा. यात देशाच्या यशाबद्दल अभिमान, देशबांधवांबद्दल आपुलकी आणि सांविधानिक मूल्यांबद्दल आदर यांचा समावेश होतो. देशप्रेम हे समावेशक आणि बांधिलकीची भावना देणारे असते. ते नागरिकांना सामाजिक सुधारणा, न्यायासाठी लढा आणि देशाच्या हिताचे कार्य करण्यासाठी प्रेरित करते.


मुलांसाठी देशप्रेम हे फक्त ऐतिहासिक घटना किंवा औपचारिक गोष्टी नसाव्यात. त्याऐवजी आदर, सहिष्णुता, विविधतेतील एकता, सामाजिक जबाबदारी आणि नैतिक अभिमान हे मूल्य त्यांना देशप्रेमातून शिकवायला हवे.



मुलांना देशप्रेम शिकवणे का गरजेचे आहे?


देशप्रेम मुलांमध्ये लहानपणापासूनच शिकवणे आवश्यक आहे. कारण, ते त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या आणि राष्ट्राच्या विकासाचा मूलभूत पाया विकसीत करते. सर्वप्रथम देशप्रेमामुळे मुलांमध्ये राष्ट्रीय ओळख आणि आत्मीयता निर्माण होते. आपल्या इतिहासाची, परंपरांची आणि देशाच्या वाटचालीची माहिती मिळाल्याने, त्यांच्यात मानसिक स्थैर्य आणि आत्मविश्वास वाढतो. दुसरे महत्त्वाचे म्हणजे, देशप्रेम मुलांना त्यांच्या नागरिक कर्तव्यांची जाणीव करून देते. लहानपणीच जबाबदार्‍या समजलेल्या मुलांमधूनच जबाबदार नागरिक तयार होतात जे मतदान करतात, कायद्याचा आदर करतात आणि समाजासाठी काहीतरी सकारात्मक योगदान देतात. तिसरे म्हणजे, भारतासारख्या बहुभाषिक आणि बहुजातीय देशात देशप्रेम सामाजिक ऐक्याचे बळ देते. ‘विविधतेतील एकता’ ही संकल्पना समजून घेतल्याने मुलांमध्ये परस्पर सन्मान, समतेची जाणीव आणि समावेशाची भावना निर्माण होते. चौथ्या मुद्द्याच्या दृष्टीने देशप्रेम हे संस्कृतीच्या जतनाचे प्रभावी साधन आहे. आपल्या भाषा, कला, परंपरा यांचा आदर करण्याची जाणीव देशप्रेमातूनच येते. शेवटी देशप्रेम मुलांमध्ये राष्ट्रनिर्माणासाठीची आवश्यक प्रेरणा निर्माण करते. ही मुले पुढे वैज्ञानिक, शिक्षक, समाजसेवक, उद्योजक, नेते होऊन देशाच्या प्रगतीसाठी झटतात. त्यांच्यातील देशप्रेमच त्यांना ‘देवभूमी ही अजिंक्य दाखवू जगा चला, उठा उठा, चला चला’ अशी उत्स्फूर्त प्रेरणा देत राहते. अशा प्रकारे देशप्रेम हे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि राष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यावश्यक आहे.


देशप्रेम कसे शिकवावे?


देशप्रेम शिकवताना अंधश्रद्धा किंवा अंधभक्ती टाळणे आवश्यक आहे. त्याऐवजी त्यामध्ये सत्य, न्याय आणि समजून घेतलेली भावना असावी. साने गुरुजींची ‘प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी, कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे,’ ही विश्वप्रेमाची निरागस भावना, देशप्रेमात ओतप्रोत भरलेली दिसते.


1. शालेय शिक्षणातून



शाळा हे मुलांचे पहिले शिक्षण केंद्र असते. इतिहासाचे धडे, स्वातंत्र्यलढ्याच्या कथा, संविधानातील मूल्ये आणि समाजसुधारकांची माहिती हे सर्व देशप्रेम जागवणारे घटक आहेत. चर्चा, प्रकल्प आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांचा उपयोग करून, ही शिकवण अधिक प्रभावी होऊ शकते.

2. राष्ट्रीय सण आणि महान व्यक्तिमत्त्वांचे स्मरण


स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, गांधी जयंती यांसारखे दिवस साजरे करताना, त्यामागचा अर्थ समजावणे आवश्यक आहे. केवळ भाषणे न करता, त्या प्रसंगांची प्रेरणा आत्मसात करणे महत्त्वाचे आहे.



3. कुटुंब व समाजाची भूमिका



घर हे पहिले शिक्षण केंद्र आहे. पालकांनी मुलांशी देशाच्या परिस्थितीवर, प्रगतीवर आणि आव्हानांवर चर्चा करावी. त्यांना ऐतिहासिक ठिकाणी घेऊन जावे, समाजकार्य करताना सहभागी करून घ्यावे. साध्या कृती, जसे परिसर स्वच्छ ठेवणे, वृद्धांना मदत करणे, यालाही देशसेवा म्हणता येते.

 
4. चिंतनशील देशप्रेम



देशाची अंधभक्ती नव्हे तर विचारपूर्वक, वास्तव जाणून आणि चुका स्वीकारून त्यात सुधारणा करणारे प्रेम हे खरे देशप्रेम आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे, पर्यावरणाचे रक्षण करणे, समानतेसाठी लढणे, हा सुद्धा देशप्रेमाचाच भाग.



5. साहित्य आणि माध्यमांचा वापर



मुलांसाठी असलेली पुस्तके, चित्रपट, आणि कार्यक्रम यांमध्ये देशप्रेमाची प्रभावी पद्धतीने मांडणी होऊ शकते. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेल, कल्पना चावला यांसारख्या व्यक्तींच्या कथा प्रेरणादायीच असतात. कधी देशप्रेम हे केवळ प्रतीकात्मक कृतींमध्ये मर्यादित राहते. जसे की, समाजमाध्यमांवर तिरंगा पोस्ट करणे किंवा देशभक्तीपर गाणी शेअर करणे. अशा कृतींमागे खरा विचार आणि कृती असेल, तरच त्याला अर्थ असतो.
 
मुलांना देशप्रेम शिकवणे अत्यावश्यक आहे. कारण, ही केवळ एक भावना नसून, त्यांचे व्यक्तिमत्त्व घडवणारे एक महत्त्वाचे मूल्य आहे. देशप्रेमी मूल हे फक्त झेंडा फडकवत नाही, तर अन्यायाविरुद्ध लढते, निसर्गाचे रक्षण करते, सामाजिक एकता जपते, माणुसकी जपते आणि समाजोन्नतीसाठी प्रयत्न करते. जेव्हा देशप्रेम योग्य पद्धतीने शिकवले जाते, तेव्हा ती मुले भविष्यात आपल्या देशाचे आधारस्तंभ बनतात. अशा भावनेने घडलेली पिढी केवळ देशाच्या प्रगतीत योगदान देत नाही, तर एक सुसंस्कृत, शांतताप्रिय आणि विवेकी समाज घडवते.
Powered By Sangraha 9.0