गांधीनगर : (PM Narendra Modi Holds Roadshow in Vadodara) ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोमवारी (२६ मे) दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आले आहेत. वडोदरा येथे झालेल्या रोड शोमध्ये पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत करण्यात आले. पंतप्रधान मोदींच्या वडोदरा रोड शोमध्ये भारतीय लष्करी अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांच्या कुटुंबातील सदस्यांनीही भाग घेतला. पंतप्रधानांचे स्वागत करताना कुरेशी कुटुंबियांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली आणि आपल्या भावना व्यक्त केल्या.
वडोदरा येथील पंतप्रधान मोदींच्या रोड शोमध्ये कर्नल सोफिया कुरेशी यांची जुळी बहीण शायना सुनसारा यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या, "पंतप्रधान मोदींना भेटून आम्हाला छान वाटलं. पंतप्रधान मोदींनी महिला सक्षमीकरणासाठी खूप काही केले आहे. सोफिया माझी जुळी बहीण आहे. जेव्हा तुमची बहीण देशासाठी काही करते तेव्हा ती केवळ माझ्यासाठीच नव्हे तर इतरांसाठीही प्रेरणादायी ठरते. ती आता फक्त माझी बहीण राहिली नाही तर ती सर्व देशवासियांची बहीण झाली आहे."
कर्नल सोफिया कुरेशी यांचे भाऊ मोहम्मद संजय कुरेशी यांनीही माध्यमांशी बोलताना सांगितले, "पंतप्रधानांना समोरासमोर पाहणे हा खूप अभिमानाचा क्षण होता." त्यांची बहीण सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले, "सोफियाला ही संधी दिल्याबद्दल मी आमच्या संरक्षण दलाचे आभार मानतो. जेव्हा एखादी महिला महिलांवर झालेल्या अन्यायाचा बदला घेते तेव्हा यापेक्षा चांगला क्षण दुसरा नाही. आपण शत्रूला दाखवून दिलंय की आमच्या महिला कोणत्याही पुरुषांपेक्षा कमी नाहीत."
दरम्यान, कर्नल सोफिया कुरेशींचे वडील ताज मोहम्मद कुरेशी म्हणाले की, "आमच्यासाठी देश आधी येतो, नंतर धर्म आणि जात. ते म्हणाले, "पंतप्रधान मोदींनी आम्हाला ओळखले आणि नंतर आमचे स्वागत केले. आम्हीही त्यांचे आदरपूर्वक स्वागत केले." त्यांची आई हलिमा बीबी म्हणाल्या, की "आमच्यासाठी देश प्रथम येतो. त्या पुढे म्हणाल्या, 'ऑपरेशन सिंदूर'मुळे देशातील महिला आणि भगिनी आनंदी आहेत."