मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका! तिन्ही रेल्वे मार्गावरील लोकलसेवा विस्कळीत

26 May 2025 17:45:40

Mumbai Local 
 
मुंबई : सोमवारी सकाळपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा मुंबईतील रेल्वे सेवेला जोरदार फटका बसला आहे. विशेषत: मध्य रेल्वेवरील वाहतूक काही काळ खोळंबली असून लोकल रेल्वे गाड्या उशीराने धावत आहेत. पावसामुळे तिन्ही लाईन्सवरील रेल्वेसेवा प्रभावित झाली आहे.
 
 
राज्यभरात सध्या पावसाने हाहाकार माजला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषत: मुंबईत पावसाचा मोठा फटका बसला आहे. हवामान खात्याने मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईतील लोकलसेवा विस्कळीत झाली आहे.
हे वाचलंत का? -   पावसाळी पर्यटन करणाऱ्या युवराजांना आशिष शेलारांनी दाखवला आरसा!
 
मुंबईतील मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे चाकरमान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक रेल्वे स्थानकांवर पाणी साचल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. मुसळधार पावसामुळे अनेक चाकरमानी लवकरात लवकर घरी परतन्याच्या तयारीत आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी जमली असून अनेक गाड्या उशीराने धावत आहेत.
 
 
 
पावसामुळे मध्य रेल्वे २० ते २५ मिनिटे उशीराने धावत आहे. तर हार्बर मार्गावरील रेल्वे २० मिनिटे उशीराने सुरु आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनट वरून कल्याणकडे जाणाऱ्या मध्य रेल्वेवरील जलद लोकल गाड्या १५ ते २० मिनिटे उशीराने धावत आहेत. तर धीम्या गाड्या २२ मिनिटे उशीराने धावत आहेत.
 
 
 
तसेच चर्चगेटहून ते विरारकडे जाणाऱ्या गाड्या ४ ते ५ मिनिटे उशाराने धावत आहेत. दादर-सीएसएमटी दरम्यान पाणी साचल्याने लोकल गाड्या मोठ्या प्रमाणात उशिराने धावत आहेत. पावसामुळे हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलसेवा संथगतीने सुरु आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0