‘मान्सूनचा वेग कमी होणार; पेरणीची घाई नको’

26 May 2025 15:21:32

Monsoon will bring dryness and heat

मुंबई : यावर्षी मान्सूनचा प्रवास वेगाने सुरू असल्यामुळे तो दि. 25 मे रोजी दक्षिण कोकणात दाखल झाला आहे, जे सामान्य तारखेपेक्षा दहा दिवस आधीच आहे. मात्र, मंगळवार, दि. 27 मे रोजीपासून मान्सूनच्या प्रवासाची वेग कमी होणार असल्यामुळे राज्यातील हवामानात लवकरच मोठे बदल दिसून येतील, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.

सध्याच्या अंदाजानुसार दि. 27 मे रोजीपासून राज्यातील हवामान हळूहळू कोरडे होईल आणि काही प्रमाणात तापमानात वाढदेखील होईल. मे महिन्याच्या शेवटपर्यंत कोकण वगळता बहुतांश भागात प्रामुख्याने कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे आणि किमान दि. 5 जून रोजीपर्यंत ही स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. यामुळे किमान दि. 5 जून रोजीपर्यंत तरी राज्यातील बहुतांश भागात मान्सून दाखल होण्याची आणि मान्सूनच्या पावसाची शक्यता दिसत नाही. या दरम्यान देशातील इतर भागातसुद्धा मान्सूनचा प्रवास तात्पुरता थांबू शकतो.

या वर्षी राज्यातील अनेक भागात मान्सूनपूर्वीचा वादळी पाऊस पडला आहे. आपल्या भागात मान्सून लवकरच दाखल होईल, अशी अपेक्षा करून अथवा खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवून शेतकर्‍यांनी (प्रामुख्याने कोरडवाहू) पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. हवामान कोरडे होणार असल्यामुळे जर पेरणीची घाई केली, तर शेतकर्‍यांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


मान्सून अखेर महाराष्ट्रात पोहोचला


गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेले नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनचे राज्यात रविवार, दि. 25 मे रोजी आगमन झाले आहे. हवामान खात्याकडून यासंदर्भातील अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. शनिवारी मान्सून केरळात दाखल झाला होता. त्यानंतर मान्सून महाराष्ट्रात पोहोचण्यासाठी एक ते दोन दिवस जातील, असा अंदाज होता. मात्र, महाराष्ट्रात मान्सूनसाठी अत्यंत पोषक स्थिती असल्याने अवघ्या काही तासांमध्ये मान्सून राज्यात दाखल झाला आहे.

दरवर्षी मान्सून साधारणपणे दि. 7 जून रोजीच्या आसपास राज्यात दाखल होतो. मात्र, यंदा मान्सून 12 दिवस आधीच महाराष्ट्रात दाखल झाला आहे. मान्सूनची एकूण आगेकूच पाहता पुढील काही तासांमध्ये मान्सून मुंबई आणि पुण्यात दाखल होईल, असा अंदाज आहे. दरम्यान, रविवारी सकाळपासून मुंबई, उपनगर आणि ठाणे परिसरात ढगाळ वातावरण होते. हवामान खात्याने मुंबई आणि ठाण्याला रविवारी यलो अलर्ट दिला होता. तर रायगडला ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून तळकोकणात मुसळधार पाऊस सुरू आहे.
Powered By Sangraha 9.0