भारत बनला जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था

26 May 2025 15:06:17

India became the world


नवी दिल्ली : जगभरात पुन्हा एकदा भारताचा डंका वाजत आहे. जपानला मागे टाकत भारत जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनले आहे. भारताने जगातील चौथी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनून इतिहास रचला आहे. नीति आयोगाचे सीईओ बीव्हीआर सुब्रमण्यम यांनी ही माहिती दिली.


नीति आयोगाच्या गव्हर्निंग काऊन्सिलच्या दहाव्या बैठकीनंतर ते म्हणाले, “जागतिक आणि आर्थिक वातावरण देशासाठी अनुकूल आहे. आता आपण जगातील चौथी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था आहोत. आता आपण चार ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनलो आहोत.”


सुब्रमण्यम यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ)च्या आकडेवारीचा हवाला देत म्हटले आहे की, “आता भारतीय अर्थव्यवस्था जपानपेक्षा मोठी झाली आहे. आपण हा टप्पा गाठून इतिहास रचला आहे. आता फक्त अमेरिका, चीन आणि जर्मनी या देशांच्या अर्थव्यवस्था भारताच्या पुढे आहेत. आपण आपल्या योजनेवर ठाम राहिलो, तर पुढील अडीच ते तीन वर्षांत आपण जर्मनीला मागे टाकून तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.”


अमेरिकेच्या आयातशुल्कामुळे जगात अस्वस्थता असताना भारताने जगातील चौथी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था होण्याची कामगिरी केली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे शुल्कही भारताच्या विकासाला रोखू शकले नाही आणि पाकिस्तानसोबतच्या तणावाचाही आर्थिक विकासावर कोणताही परिणाम झाला नाही. भारत बर्‍याच काळापासून जगातील सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे आणि आता त्याने जपानला मागे टाकले आहे.
 
 
आम्ही निश्चितच उत्पादनासाठी स्वस्त ठिकाण असू


अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी ‘अ‍ॅपल’ आयफोनवर कर लादण्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर सुब्रमण्यम म्हणाले, “आम्हाला आशा आहे की, अमेरिकेत विकले जाणारे ‘अ‍ॅपल’आयफोन भारतात किंवा इतर कुठेही नव्हे, तर अमेरिकेतच तयार केले जातील. भविष्यातील कर काय असतील हे आताच सांगणे कठीण आहे. तथापि, आम्ही निश्चितच उत्पादनासाठी स्वस्त ठिकाण असू.”

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताची आर्थिक प्रगती : दरेकर


भारताची अर्थव्यवस्था चार ट्रिलियन डॉलर्सच्या टप्प्यावर पोहोचली असून, आपला देश आज जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वांत मोठी अर्थशक्ती बनली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे कुशल नेतृत्व आणि त्यांनी घेतलेल्या कठोर निर्णयामुळे ही झेप भारताने घेतली आहे. आजचा दिवस भारतीयांसाठी अभिमानाचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे त्रिवार अभिनंदन! अशी प्रतिक्रिया राज्याचे विधानपरिषद गटनेते प्रविण दरेकर यांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रदेखील देशाच्या विकासात आघाडी घेत राहील, याबद्दल शंका नसून भारताच्या प्रगतीमध्ये सर्वसामान्य जनतेची मेहनत आणि त्यांनी विश्वासाने निवडलेल्या पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वातील सरकारला आहे, यापुढेही भारत अशीच प्रगती करत राहील, असा विश्वासही दरेकर यांनी व्यक्त केला.

भारताची ऐतिहासिक घोडदौड : उपमुख्यमंत्री अजित पवार


भारताची अर्थव्यवस्था चार ट्रिलियन डॉलर्सच्या टप्प्यावर पोहोचली असून, आपला देश आज जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वांत मोठी अर्थशक्ती ठरला आहे, ही बाब प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची आणि आनंदाची आहे. हे यश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाचे आणि सातत्याने घेतलेल्या ठोस निर्णयांचे फलित आहे. त्यांनी दिलेल्या ‘विकसित भारत-2047’चे लक्ष्य गाठण्यासाठी महाराष्ट्र पूर्ण क्षमतेने सज्ज आहे. या ऐतिहासिक कामगिरीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

Powered By Sangraha 9.0