मुंबई : राज्यातील विविध भागांत मुसळधार पाऊस सुरू असून मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पुढील काही तास जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्कता ठेवून मदत कार्य करावे. तसेच नागरिकांनीही खबरदारी बाळगावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
ठाणे आणि नाशिकचे जिल्हाधिकारी तसेच ठाणे आणि मुंबई महानगरपालिका आयुक्तांशी बोलून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यासंदर्भात सूचना दिल्या. यासोबतच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर आणि रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून परिस्थितीची माहिती घेतली. या सर्व जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन केंद्रे २४ तास सुरू राहतील. पक्षातल्या अधिकाऱ्यांनी अतिशय काळजीपूर्वक आणि दक्ष राहून काम करावे असे निर्देश त्यांनी दिले. पावसामुळे जनजीवन विस्कळीत होऊ नये, तसेच कोणतीही जीवित किंवा वित्तहानी होऊ नये, यासाठी प्रशासनाने वेळेवर आणि प्रभावी पावले उचलावी, असेही त्यांनी सांगितले.
राज्यात सध्या मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि नाशिक या जिल्ह्यांत पावसाचा सर्वाधिक जोर दिसून येत आहे. राज्य सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व उपाययोजना राबविण्यात येत आहेत, असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.
संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवण्यात यावी. तसेच आवश्यकतेनुसार मदत आणि बचाव कार्य तत्परतेने पार पाडावे. पाण्याने भरलेले रस्ते, पुलांची स्थिती, विजेच्या तारा यावर विशेष लक्ष ठेवावे. मोडकळीस झालेल्या आणि धोकादायक इमारतींसंदर्भात काळजी घ्यावी. मुंबई आणि ठाण्यासारख्या ठिकाणी उपनगरीय रेल्वे वाहतूक सुरळीतपणे कशी सुरू राहील किंवा जिथे मोठी अडचण येईल तिथे प्रवाशांना त्रास कसा होणार नाही यासाठी सतर्क राहावे, असेही निर्देश त्यांनी प्रशासनाला सांगितले.
आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नका!
"हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, आवश्यक नसल्यास घराबाहेर पडू नये. तसेच सखल भागांमध्ये राहणाऱ्यांनी विशेष सावधगिरी बाळगावी. प्रशासन तुमच्या मदतीसाठी तत्पर आहे. मात्र, नागरिकांनीदेखील सहकार्य करणे गरजेचे आहे," असेही त्यांनी स्पष्ट केले.