क्रीडा संस्कार शिकवणारा एक जागतिक डे...

25 May 2025 21:07:12
क्रीडा संस्कार शिकवणारा एक जागतिक डे...

जगामध्ये विविध खेळांच्या अनेक स्पर्धा होतात. खेळ म्हटले की संघर्ष आलाच. हा संघर्ष खेळ भावनेने होत असल्यास खेळातील मौज वाढते. खेळातील खिलाडूवृत्ती टिकावी, वृद्धिंगत व्हावी, यासाठी ‘फेअर प्ले’ दिनाची घोषणा संयुक्त राष्ट्रसंघाने केली आहे. निष्पक्ष खेळाची अनेक उदाहरणे जगात आहेत. त्याचा घेतलेला आढावा...



संयुक्त राष्ट्र संघ विशिष्ट दिवस, आठवडे, वर्षे आणि दशके एक संकल्पना किंवा विशिष्ट विषय साजरा करतो. हे सारे जनतेला विशेष जागतिक मुद्द्यांवर साक्षर करण्यासाठी, समस्या सोडवण्यासाठी, राजकीय इच्छाशक्ती आणि संसाधने एकत्रित करण्यासाठी, मानवतेचा उत्सव साजरा करण्यासाठी आणि त्यांना बळकटी देण्यासाठी साजरे केले जातात. आंतरराष्ट्रीय दिवसांचे अस्तित्व संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेपूर्वीपासून आहे. परंतु, संयुक्त राष्ट्रांनी त्यांचा प्रभावी उपयोग केला. आम्ही संयुक्त राष्ट्रांचे अनेक उत्सवदेखील साजरा करत असतो. सहसा एक किंवा अधिक सदस्य राष्ट्रे एखादा दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव देतात आणि महासभेतील ठरावाद्वारे त्यांची घोषणा होते. कधीकधी ‘युनेस्को’, ‘युनिसेफ’, ‘एफएओ’ या संयुक्त राष्ट्रांच्या एजन्सींद्वारे त्यांच्या कार्यक्षेत्रातील समस्यांशी संबधित उत्सव घोषित केले जातात. त्यापैकी काही नंतर महासभेद्वारे स्वीकारले जाऊ शकतात.


क्रीडा क्षेत्राचा विचार करता, संयुक्त राष्ट्रसंघाने मान्यता केलेले पुढील काही वर्षे आणि दिन साजरे होताना आपल्याला दिसतील. विकास आणि शांतीसाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन (दि. 6 एप्रिल), जागतिक फुटबॉल दिन (दि. 25 मे), जागतिक सायकल दिन (दि. 3 जून), आंतरराष्ट्रीय योग दिन (दि. 21 जून), जागतिक बुद्धिबळ दिन (दि. 20 जुलै), आंतरराष्ट्रीय युवा दिन (दि. 12 ऑगस्ट), जागतिक बास्केटबॉल दिन (दि. 21 डिसेंबर) तसेच आंतरराष्ट्रीय क्रीडा आणि शारीरिक शिक्षण वर्ष (2005). भारताच्या पुढाकाराने या वर्षीही साजरा झालेला आंतरराष्ट्रीय योग दिन जगभरात प्रसिद्ध आहे. त्यासारखे कमी-अधिक प्रसिद्ध असलेले दिवस आपण वर पाहिले. अशाच एका दिवसाची आज आपण ओळख करून घेणार आहोत आणि त्याचे नाव आहे, ‘जागतिक फेअर प्ले दिन’. ‘जागतिक फेअर प्ले दिन’ दरवर्षी दि. 19 मे रोजी साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस 2025 सालापासून खेळात निष्पक्षता, सहकार्य आणि सकारात्मकता वाढवण्यासाठी साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या दिवशी खेळांमध्ये ‘फेअर प्ले’चा अर्थ काय आहे, त्याचे महत्त्व काय आहे आणि ते कसे प्राप्त केले जाऊ शकते, यांवर लक्ष केंद्रित केले जाते.


जागतिक ‘फेअर प्ले डे’चे महत्त्व :

 
निष्पक्षता : खेळांमध्ये नियमांचे पालन करणे आणि प्रतिस्पर्ध्यांचा आदर करणे यावर भर दिला जातो.

 
सहकार्य : खेळाडूंमध्ये चांगले संबंध आणि मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करणे, हे या दिवसाचे एक उद्दिष्ट आहे.

 
सकारात्मकता : खेळात सकारात्मक दृष्टिकोन आणि ‘फेअर प्ले’ची भावना वाढवणे, यावर भर दिला जातो.

 
वाद आणि गैरवर्तनावर नियंत्रण: खेळाडूंमध्ये गैरवर्तन आणि वाद टाळण्याची प्रेरणा देणे.


आंतरराष्ट्रीय सहकार्य: जगभरातील क्रीडा संस्था आणि खेळाडू एकत्र येऊन ‘फेअर प्ले’चा संदेश देण्यास मदत करतात.

दि. 19 मे 2025 रोजी मैत्री, एकता, सहिष्णुता, समावेशकता आणि भेदभाव न करण्याच्या भावनेने खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी समर्पित असलेला ‘जागतिक फेअर प्ले डे’ साजरा झाला. ‘फेअर प्ले’ सहभागींमध्ये परस्पर आदरभाव वाढवतो. आपल्याला एकमेकांना महत्त्व देण्यास आणि त्यांचा आदर करण्यास शिकवतो. समानतेला प्रोत्साहन देतानाच, सांस्कृतिक दरीही कमी करतो. खेळ सामाजिक बदल घडवून आणू शकतात आणि अधिक संघटित समुदाय कसे निर्माण होतात, हे दाखवून तरुणांना सक्षम बनवतो. ‘फेअर प्ले’ची तत्त्वे स्वीकारून नियमांचे पालन करणे, विरोधकांचा आदर करणे आणि हिंसाचार आणि डोपिंगविरुद्ध लढा याचा सर्वांनाच फायदा होतो. खेळांमधला सहभाग वाढवण्यासाठी एक शक्तिशाली व्यासपीठ म्हणून काम करणारा हा जागतिक दिन, शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यातही अमूल्य योगदान देतो.


पार्श्वभूमी : दि. 1 जुलै 2024 रोजी महासभेने ठराव -/ठएड/78/310 स्वीकारला. ज्यामध्ये दि. 19 मे हा दिवस जागतिक निष्पक्ष खेळ दिन म्हणून घोषित करण्यात आला. निष्पक्ष खेळाची भावना, खेळ आणि दैनंदिन जीवनात त्याचे मूर्त स्वरूप असलेल्या मूल्यांना ओळखून हा ठराव शांतता, विकास, सामुदायिक एकता, लिंग समानता, महिला सक्षमीकरण आणि अपंग व्यक्तींना समान वागणूक मिळण्याच्या भूमिकेवर भर देतो. हा ठराव खेळ स्वातंत्र्याची आणि संबंधित आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक समित्यांच्या नेतृत्वाच्या भूमिकेचीही पुष्टी करतो. जागतिक समुदायाला जागतिक ’फेअर प्ले’ दिनाचे महत्त्व पटवून जागरूकता वाढविण्याचे आवाहन करतो.



‘फेअर प्ले’ आणि त्याचे महत्त्व समजून घेणे :


‘फेअर प्ले’ ही एक जटिल संकल्पना आहे, यामध्ये खेळ आणि दैनंदिन जीवनात अविभाज्य असलेल्या मूलभूत मूल्यांचा समावेश होतो. यामध्ये निष्पक्ष स्पर्धा, आदर, मैत्री, सांघिक भावना, समानता आणि सचोटी यांचाही समावेश आहे. ‘फेअर प्ले’ची संकल्पना केवळ लिखित नियमांचे पालन करण्यापलीकडे विस्तारते. त्यात अलिखित नियमांचे पालन आणि विरोधक, सहकारी खेळाडू, पंच आणि चाहत्यांसाठी बिनशर्त आदर दाखवणेदेखील अभिप्रेत आहे. ऑलिम्पिक मूल्ये आणि स्वतः ‘फेअर प्ले’ दाखवूनच साध्य होतात. ‘फेअर प्ले’ खेळाच्या क्षेत्राबाहेर शांततापूर्ण आणि चांगले जग निर्माण करण्यास हातभार लावतो.


खेळ,शाश्वत विकास, शांतता आणि विकास उद्दिष्टांना चालना देण्यासाठी खेळ हे एक उत्तम माध्यम आहे. शाश्वत विकास 2030 सालच्या अजेंडामध्ये सामाजिक प्रगतीसाठी खेळाची भूमिका विशद केली आहे. शाश्वत विकासासाठी खेळ हा एक महत्त्वाचा घटक आहे. विकास आणि शांततेसाठी खेळाचे वाढते योगदान, सहिष्णुता आणि आदर वाढवणे, व्यक्ती आणि समुदायांच्या तसेच आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक उद्दिष्टांना सक्षमीकरण करण्यासाठी खेळाचे योगदान विशेष आहे.


डोपिंगशी लढा: ’फेअर प्ले‘ भावना आणि अभिमानाच्या माध्यमातून लोकांना एकत्र आणतो. आंतरराष्ट्रीय डोपिंग विरोधी करार खेळाच्या सार्वत्रिक मूल्यांचे रक्षण, जागतिक स्तरावर निष्पक्षतेचे रक्षण आणि खेळाडूंसाठी सचोटी, समान संधीसाठी सरकारांना पाठिंबा देतात.

 
ऑलिम्पिकमध्ये विशेष : ऑलिम्पिकमध्ये खेळणे म्हणजे केवळ पदके पटकवणे एवढेच नव्हे, तर ते त्यापेक्षाही बरेच काही असते. यावर्षी दि. 19 मे रोजी साजरा केला जाणारा पहिला ‘जागतिक फेअर प्ले डे’ सारे जग साजरा करत असताना, ‘आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती’ ने निष्पक्ष खेळ आणि खेळवृत्तीची मूल्ये ऑलिम्पिक खेळांचा भाग कशी राहिली आहेत, यावर प्रकाश टाकला.


1920 च्या अ‍ॅण्टवर्प ऑलिम्पिक खेळांपासूनच खेळाडूंनी खर्‍या क्रीडा भावनेने स्पर्धा करण्याची शपथ घेतली. या वचनबद्धतेने ऑलिम्पियन्सच्या पिढ्यांना विजय आणि पराभव या दोन्ही गोष्टींकडे कसे बघितले पाहिजे, याचे मार्गदर्शन केले. संपूर्ण ऑलिम्पिक इतिहासात खेळाडूंनी हे दाखवून दिले आहे की, ’फेअर प्ले’ हे नुसतेचए एक मूल्य नाही, ते ऑलिम्पिकच्या आत्म्याशी जोडलेलेे आहे.


 
कॅनेडियन जिम्नॅस्टचे उदाहरण : ‘पॅरिस 2024 कॅनेडियन जिम्नॅस्ट एली ब्लॅक’ने खर्‍या खिलाडूवृत्तीचे दर्शन घडवले. 2024च्या पॅरिस ऑलिम्पिक गेम्समध्ये महिलांच्या कलात्मक जिम्नॅस्टिक्स पात्रता फेरीत एका भावनिक क्षणानंतर, कॅनेडियन जिम्नॅस्ट एली ब्लॅकला ‘फेअर प्ले पुरस्कार’ मिळाला. फ्रेंच प्रसिद्ध खेळाडू मेलानी डी जीझस डोस सँटोस मैदानात पडल्यानंतर अस्वस्थ झाली होती. त्यावेळी ब्लॅक तिचे सांत्वन करत तिला प्रोत्साहन देत असल्याचे दिसून आले. तिची ही कृती जगभरातील चाहत्यांना भावली. “माझ्यासाठी जिम्नॅस्टिक्स आणि खेळभावना अंतिम निकालापेक्षा जास्त आहे,” असे ब्लॅक म्हणाली. “आम्ही स्पर्धक आहोत आणि आम्हाला स्पर्धा करायची आहे. परंतु, तुम्हाला प्रत्येकालाच सर्वोत्तम प्रदर्शन करत उत्तम स्पर्धा करताना पाहायचे आहे. खेळ म्हणजे फक्त कामगिरी आणि स्पर्धात्मकता असण्यापेक्षा खूप काही आहे. म्हणून मला वाटते की, तो एक अविश्वसनीय क्षण होता. डी जीसस डोस सँटोससह मला असे वाटते की, ऑलिम्पिकमध्ये आपल्याला असे बरेच क्रीडा भावना जपतानाचे क्षण दिसतात.” असेही ब्लॅक म्हणाली.


टोकियो 2020 : महिला स्केटबार्डिंग अंतिम स्पर्धकांनीही या खेळात परस्पर आदराची भावना दाखवली. महिला स्केटबोर्डिंगच्या अंतिम फेरीत जपानी खेळाडू अंतिम टप्प्यात धावताना पडल्यानंतर सहकारी स्केटर मिसुगु ओकामोतोला हिने तिला खांद्यावर उचलून घेत प्रोत्साहन दिले. खेळामध्ये एकता दाखवल्याबद्दल त्यांना एकत्रितपणे ‘फेअर प्ले पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.


रिओ 2016 : न्यूझीलंडची निक्की हॅम्बलिन शर्यतीतच थांबली आणि दुसर्‍या स्पर्धकाला मदत केली. 2016 सालच्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत महिलांच्या पाच हजार मीटर शर्यतीदरम्यान दोघांची टक्कर झाल्यानंतर, न्यूझीलंडच्या निक्की हॅम्बलिनने अमेरिकन अ‍ॅबे डी अ‍ॅगोस्टिनोला मदत करण्यासाठी शर्यत थांबवली. दुखापती असूनही दोघांनी अंतिम रेषेपर्यंत एकमेकांना आधार दिला आणि खेळांमधील सर्वांत संस्मरणीय क्षणांपैकी एक क्षण अनेकांच्या कॅमेरामध्ये कैद झाला.


 
ट्यूरिन 2000 : नॉर्वेजियन क्रॉस-कंट्री प्रशिक्षक यु ऑलिम्पिक स्पिरिटचे उदाहरण देतात. 2006 सालच्या ट्यूरिन ऑलिम्पिक हिवाळी खेळांमध्ये नॉर्वेजियन क्रॉस-कंट्री प्रशिक्षक ब्योर्नार हाकेन्समोएन यांनी, महिला संघाच्या स्प्रिंट दरम्यान कॅनडाच्या सारा रेनरचा पोल तुटल्यानंतर तिला एक अतिरिक्त पोल दिला. या स्पर्धेमध्ये बदली खेळाडूसह रेनर आणि तिच्या सहकार्‍याने रौप्यपदक जिंकले, तर नॉर्वेने चौथे स्थान मिळवले. हाकेन्समोएनच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक झाले आणि ऑलिम्पिक भावनेचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून त्याकडे पाहिले गेले.

 
इन्सब्रुक 1964 : इटालियन बॉबस्लेडर युजेनियो मोंटी यांची कृती ‘फेअर प्ले’च्या सर्वांत जुन्या आणि टिकाऊ उदाहरणांपैकी एक आहे. 1964 सालच्या इन्सब्रुक हिवाळी ऑलिम्पिकमध्ये इटालियन बॉबस्लेडर युजेनियो मोंटीने दोन वेगवेगळ्या प्रसंगी प्रतिस्पर्धी संघांना मदत केली. प्रथम टोनी नॅश आणि रॉबिन डिक्सन या ब्रिटिश जोडीच्या स्लेजमध्ये यांत्रिक बिघाड झाल्यानंतर, त्याने त्यांना बदली बोल्ट दिला. ब्रिटिश जोडीने सुवर्णपदक जिंकले आणि मोंटीने कौतुक करत म्हटले की, “नॅश मी त्याला बोल्ट दिल्यामुळे जिंकला नाही. तो जिंकला कारण त्याने सर्वांत वेगवान धाव घेतली.” काही दिवसांनंतर चारजणांच्या बॉबस्ले स्पर्धेत मोंटी आणि त्याच्या मेकॅनिक्सने, कॅनेडियन स्लेजचा खराब झालेला एक्सल दुरुस्त करण्यास मदत केली. याशिवाय कॅनेडियन संघ अपात्र ठरला असता. पुढे त्यांनी सुवर्णपदक जिंकले, तर मोंटी आणि इटालियन संघाने कांस्यपदक जिंकले. या क्रीडाभावनेमुळे मोंटीला ’फेअर प्ले’साठी पहिला ’पियरे डी कुबर्टिन वर्ल्ड ट्रॉफी’ पुरस्कार मिळाला आणि ऑलिम्पियनच्या भावी पिढ्यांसाठी एक मानक स्थापित केले.


ऑलिम्पिकमध्ये निष्पक्ष खेळाच्या कृत्यांचा सन्मान करणे : अशा प्रकारच्या निष्पक्ष खेळाचे प्रात्यक्षिक पिढ्यानपिढ्या आणि विविध खेळांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण राहिले आहे. या क्षणांना सन्मानित करण्यासाठी ‘फेअर प्ले’ पुरस्कारांची निर्मिती करण्यात आली. ‘आंतरराष्ट्रीय फेअर प्ले समिती’च्या सहकार्याने ‘आयओसी’कडून खेळांदरम्यान उत्कृष्ट क्रीडाभावना दाखविणार्‍या खेळाडू, प्रशिक्षक आणि अधिकार्‍यांना हे पुरस्कार प्रदान केले जातात. ‘फेअर प्ले’ हा आपल्या ऑलिम्पिक मोहिमेचा केंद्रबिंदू आहे. जेव्हा पियरे डी कुबर्टिन यांनी ‘आयओसी’ची स्थापना केली, तेव्हा त्यांनी ‘फेअर प्ले’ हा सर्व खेळांचा मूलभूत घटक मानला. म्हणूनच ‘फेअर प्ले’ हे आपल्या सर्वांत प्रिय ऑलिम्पिक मूल्यांपैकी एक आहे. ‘जागतिक फेअर प्ले दिना’ची स्थापना ज्याला आता संयुक्त राष्ट्रांनी अधिकृतपणे मान्यता दिली आहे, ती आपल्या ऑलिम्पिक मोहिमेप्रति असलेल्या आपल्या वचनबद्धतेचा पुरावा आहे.



 
थॉमस बाख ‘आयओसी’ अध्यक्ष

 
जग पहिल्या ‘जागतिक फेअर प्ले डे’चे औचित्य साधत असताना खिलाडूवृत्तीचे कृत्य हे ऑलिम्पिक खेळांचे एक वैशिष्ट्य आहे. ऑलिम्पिक चळवळीच्या आधारभूत मूल्यांचे प्रतिबिंब असल्याची एक आठवण करून यानिमित्ताने करुन देतात. उद्घाटन समारंभातील शपथेपासून ते खेळाच्या मैदानावर उत्स्फूर्त दयाळूपणाच्या कृतींपर्यंत, ऑलिम्पिक खेळ आदर, मैत्री आणि उत्कृष्ट खेळाद्वारे एका चांगल्या जगाला प्रेरणा देतात.

 
दि. 23 मे 1904 रोजी ऑस्ट्रियातील व्हिएन्ना येथे पहिल्या जागतिक कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मल्लविद्येच्या या दिवसाची आठवण म्हणून दि. 23 मे हा दिवस ‘जागतिक कुस्ती दिवस’ म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाने जरी घोषित केला नसला, तरी जागतिक स्तरावर साजरा होणारा ‘जागतिक कुस्ती दिवस’ (दि. 23 मे) तसेच अनेक खेळांशी संबंधित असलेले अन्य दिवस किंवा ‘डे’ आपण साजरे करत राहिले पाहिजे. अशाने स्पोर्ट्सबरोबर स्पोर्ट्समन स्पिरिट वृद्धिंगत होत राहील आणि खेळात खरी मजा येईल, होय ना!


 
इति ।
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)
9422031704
Powered By Sangraha 9.0