पश्चिम रेल्वे मार्गावर दोन दिवस मेगाब्लॉक! जाणून घ्या वेळापत्रक...

24 May 2025 19:02:42

पश्चिम रेल्वे मार्गावर दोन दिवस मेगाब्लॉक! जाणून घ्या वेळापत्रक...

मुंबई : पश्चिम रेल्वेने भाईंदर आणि बोरिवली स्थानकांदरम्यान आवश्यक देखभालीसाठी रात्रीचा ब्लॉक जाहीर केला आहे. हा ब्लॉक शनिवार, २४ मे आणि रविवार, २५ मे रोजी पहाटे घेण्यात येईल. ट्रॅक, ओव्हरहेड वायर आणि सिग्नलिंग सिस्टमची स्थिती सुधारण्यासाठी देखभाल महत्त्वाची असून ब्लॉकच्या वेळेत जलद गाड्या त्यांच्या नेहमीच्या ट्रॅकवरून धावणार नाहीत, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

मुंबई लोकल ट्रेनच्या अप आणि डाऊन फास्ट लाईन ब्लॉकच्या वेळापत्रकानुसार, अप फास्ट लाईनवर रात्री ११.३० ते पहाटे ३ वाजेपर्यंत ब्लॉक राहील. तर डाऊन फास्ट लाईनवर पहाटे १.१५ ते पहाटे ४.४५ पर्यंतब्लॉक राहील. याकाळात जलद लोकल ट्रेन विरार किंवा वसई रोड आणि बोरिवली दरम्यानच्या धीम्या मार्गांचा वापर करतील. तर काही लोकल ट्रेन रद्द करण्यात येतील.

प्रवाशांना ट्रेनच्या वेळेबद्दल आणि वेळापत्रकात कोणत्याही बदलांबद्दल अपडेटसाठी त्यांच्या स्थानकांवरील स्टेशन मास्टरच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचा देण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितले की, "ही देखभालीची कामे नियमित पायाभूत सुविधांच्या सुधारणेचा एक भाग आहेत. रविवार, २५ मे रोजी दिवसा कोणताही ब्लॉक राहणार नाही आणि दिवसभर लोकल सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहतील."



Powered By Sangraha 9.0