वॉशिंग्टन डीसी : (George Soros) डाव्या विचारसरणीचे अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांचा मुलगा तसेच ओपन सोसायटी फाउंडेशनचे (OSF) अध्यक्ष ॲलेक्स सोरोस (Alex Soros) सध्या सोशल मीडियावर तीव्र टीकेचा सामना करत आहेत. वॉशिंग्टन डीसीतील इस्रायली दूतावासातील दोन कर्मचाऱ्यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ त्यांनी पोस्टद्वारे केलेल्या विधानामुळे सोशल मीडियावर जोरदार टीकेची राळ उठली आहे.
ॲलेक्स सोरोस यांनी एक्स वरील पोस्टमध्ये सारा मिलग्रीम आणि यारॉन लिशिन्स्की यांच्या हत्येबद्दल तीव्र दुःख व्यक्त करताना हे कृत्य “सर्वात मूलभूत स्वरूपात वाईट” असल्याचे म्हटले. त्यांनी या “क्रूर यहूदीविरोधी कृत्याचा” कठोर शब्दांत निषेध केला. मात्र, ॲलेक्स सोरोस यांचा निषेध असला तरी सोशल मीडियावरील अनेकांनी त्यांच्यावर आणि त्यांचे वडिल जॉर्ज सोरोस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. सोरोस हे त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून इस्रायलविरोधी आणि यहूदीविरोधी गटांना आर्थिक पाठबळ देतात, असा आरोपही काहींनी केला आहे. इस्रायलविरोधी अजेंडा चालवणाऱ्या गटांना ते निधी पुरवतात असं सांगून काहींनी त्यांना ढोंगी म्हटले आहे.
“त्यांच्या खुन्यांइतकेच त्यांच्या रक्ताचे डाग तुमच्या हातावर आहेत”
एका एक्स वापरकर्त्याने लिहिले की, “ॲलेक्स , तू आणि तुझे वडील खुल्या सीमा धोरणांमुळे आणि विरोधकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर गप्प करत या समस्या निर्माण केल्या आहेत.” दुसऱ्या एका वापरकर्त्याने म्हटले, “त्यांच्या खुन्यांइतकेच त्यांच्या रक्ताचे डाग तुमच्या हातावर आहेत.” ओपन सोसायटी फाउंडेशनने यापूर्वीही अशा संघटनांना पाठिंबा दिला आहे, ज्या इस्रायल आणि ज्यू राष्ट्राच्या अस्तित्वाविरोधात भूमिका घेत आल्या आहेत. २०२३ मध्ये इस्रायलचे डायस्पोरा व्यवहार मंत्री अमिचाई चिकली यांनीही फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सोरोस कुटुंबाच्या इस्रायलविरोधी भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. ॲलेक्स सोरोस हे वडील जॉर्ज यांच्या इस्रायलविरोधी अजेंड्याचे प्रतिबिंब असल्याचेही त्यांनी म्हटले होते.
नेमकं काय घडलं?
अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी या शहरात कॅपिटल ज्यू संग्रहालयाच्या बाहेर असणाऱ्या इस्रायली दूतावासामध्ये काम करणाऱ्या २ कर्मचाऱ्यांची गोळी मारून हत्या करण्यात आली. वॉशिंग्टन पोलिसांनी ३१ वर्षीय एलियास रॉड्रिग्जला अटक केली. गोळीबारापूर्वी तो संग्रहालयाच्या बाहेर फिरताना दिसत होता. त्यानेच पीडितांवर गोळीबार केल्याचा आरोप आहे. रॉड्रिग्ज हा शिकागोचा रहिवासी आहे. हा हल्लेखोर 'मुक्त पॅलेस्टाईन' अशा घोषणा देत होता, अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, स्थानिक वेळेनुसार रात्री ९ वाजून ५ मिनिटांनी हा गोळीबार झाला. घटनाक्रम बघता हा एक सुनियोजित कट असल्याचंही पोलिसांनी सांगितले.
सध्या अटक करण्यात आलेल्या रॉड्रिग्जची कोणत्याही संघटनेशी थेट संलग्नता स्पष्ट झालेली नसली तरी, सोशल मीडियावर अॅलेक्स सोरोस यांना या हत्याकांडासाठी अप्रत्यक्षपणे जबाबदार धरलं जात आहे. अॅलेक्स सोरोस यांनी जरी इस्रायली कर्मचाऱ्यांच्या हत्येचा निषेध केला असला, तरी त्यांच्या फाउंडेशनच्या इस्रायलविरोधी गटांना दिल्या जाणाऱ्या निधीमुळे त्यांच्यावर ढोंगीपणाचे आरोप होत आहेत.