मुंबईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव! ठाण्यात एका तरुणाचा मृत्यू
24 May 2025 18:50:11
मुंबई : भारतात परत कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. मुंबईमध्ये एकूण ९५ कोविड-१९ रूग्णांची नोंद झाली असून सर्वाधिक रूग्ण महाराष्ट्रात आहेत. दरम्यान, कोरोनाची लागण झाल्याने ठाण्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे.
गेल्या तीन दिवसांत ठाणे जिल्ह्यात एकूण १० कोविड-१९ रुग्ण आढळून आले आहेत. ठाण्यातील मुंब्रा येथील वसीम सय्यद नावाच्या २१ वर्षीय तरुणाचा शनिवारी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात कोविड-१९ ची लागण झाल्यामुळे मृत्यू झाला आहे.
भारतात कोविड-१९चा पहिला रूग्ण २०२० साली केरळमध्ये आढळला. पण चार वर्षानंतर पुन्हा एकदा कोरोनाचे रूग्न भारतात आढळल्याचं दिसतंय. महाराष्ट्रातही कोविड-१९ च्या रुग्णांची संख्या वाढली आहे. मे महिन्यात आतापर्यंत एकूण १०५ रुग्णांची नोंद झाली असून मुंबईमध्ये ९५ रूग्ण आढळल्याचे कळते. आरोग्य अधिकारी परिस्थितीवर बारकाइने लक्ष ठेऊन आहेत.
कोविड-१९च्या रुग्णांमध्ये सर्दी, ताप, खोकला आणि अंगदुखीसारखी लक्षणं दिसत असून दुसरी काही वेगळी लक्षणं नसल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. सर्व स्थानिक आरोग्य केंद्रांमध्ये औषधे आणि वैद्यकीय साहित्यांच्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत. कोविड-१९ रूग्णांची वाढ फक्त महाराष्ट्रात नाही तर इतर ठिकाणीदेखील होत आहे. त्यामुळे सर्वानी शांत राहून आरोग्य अधिकाऱ्यांना साथ द्यावी, असे आवाहन आरोग्य अधिकाऱ्यांनी नागरिकांना केले आहे.