मुंबई : एक महिन्याच्या आत इतिहासात पहिल्यांदा मुंबई भोंगेमुक्त होणार असल्याचा निर्धार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला. शनिवार, २४ मे रोजी ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी बांग्लादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळ्यावरही भाष्य केले.
किरीट सोमय्या म्हणाले की, "मुंबईत फडणवीस सरकारने मशिदीवरील अनधिकृत भोंगे बंद करण्याचे आवाहन केले आहे. मुंबई उच्च न्यायालयानेसुद्धा याबाबतीत आदेश दिला आहे. गेल्या दोन महिन्यांत मी मुंबईतील ४१ आणि महाराष्ट्रातील १० अशा एकूण ५१ पोलिस स्टेशनला भेट दिली. ३०० हून अधिक मशीदींवरील भोंग्यांची पाहणी केली. मुंबईत ८० टक्के मशीदींवरील भोंगे उतरवण्याचे काम सुरु झाले आहे. मुलूंड, भांडूप, घाटकोपर, कुर्ला, चूनाभट्टी यासह विद्याविहार ते मुलूंड शंभर टक्के भोंगेमुक्त झाले आहे. मशीदींवर १५ इंच बाय १० इंच बॉक्स स्पीकर लावण्याची परवानगी देता येते. पण मशीदींवरील भोंगे आणि लाऊडस्पीकर बेकायदा आहेत. एक महिन्याच्या आत इतिहासात पहिल्यांदा मुंबई भोंगेमुक्त होणार आहे."
'त्या' पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई होणार!
"भोंगेमुक्त महाराष्ट्र करण्याच्या कामात काही पोलिस अधिकारी अडथळे निर्माण करत असून बनवाबनवी करत आहेत. पण मुंबई उच्च न्यायालय, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि मुंबईच्या जनतेला धाब्यावर बसवून कुठला पोलिस अधिकारी मनमानी करत असेल आणि मशीदीवर भोंगे लावण्याची परवानगी देत असेल तर त्यांच्यावर कारवाई होणार," असेही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "महाराष्ट्रात बांग्लादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळा उघडकीस आला आहे. देवेंद्र फडणवीस सरकारने २ लाख २४ हजार अर्जांची चौकशी सुरु केली आहे. भारत सरकारच्या गृहमंत्रालयाला मी याविषयी तक्रार केली असून त्यांनी माझ्या तक्रारीची दखल घेतली आहे. महाराष्ट्रातील १० शहरांत चौकशीसाठी त्यांची टीम आली आहे. यात छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड, मालेगाव, अमरावती, अकोला इत्यादी शहरे आहेत. २०२४ च्या विधानसभा निवडणूकीच्या काळात २ लाख २४ हजार अर्ज आलेत. मात्र, २०२५ मध्ये २४ अर्जसुद्धा आलेले नाहीत," असेही किरीट सोमय्या यांनी सांगितले.