बदलापुरकरांची पाणीचिंता मिटणार

24 May 2025 18:07:28
 
Badlapur residents water worries will be resolved
 
मुंबई: बदलापूर वासियांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या ‘कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या पाणीपुरवठा’ प्रकल्पाला अखेर मंजुरी मिळाली आहे. नगरविकास विभागाने शुक्रवार, दि. २३ मे रोजी याबाबतचा शासन निर्णय जारी केला. त्यानुसार एकूण २४५ कोटी ८२ लाख रुपये खर्चातून ही योजना पूर्ण केली आहे. परिणामी, बदलापुरकरांची पुढील ३० वर्षांची पाणीचिंता मिटणार आहे.
 
बदलापूर शहराची लोकसंख्या गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढल्यामुळे पाण्याची टंचाई भासत होती. बदलापुरला मुख्यतः उल्हास नदीवर असलेल्या बॅरेज बंधाऱ्यातून पाणी पुरवले जाते. मात्र, लोकसंख्यावाढ पाहता पाण्याची मागणी मोठी आहे. त्यामुळे नव्या पाणी योजनेची गरज होती. ही बाब लक्षात घेऊन नगरोत्थान महाभियान योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देण्यात आली आहे.
 
२४५ कोटी ८२ लाख ४४ हजार ३६३ रुपयांची ही पाणी योजना आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने या योजनेला तांत्रिक मान्यता दिली होती. त्यानंतर ऑक्टोबर २०२४ मध्ये राज्य सरकारने या योजनेला हिरवा कंदील दिला होता. मात्र ही योजना प्रशासकीय मान्यतेसाठी रखडली होती. अखेर शुक्रवारी या योजनेला मंजुरी मिळाली. या योजनेमुळे बदलापूर शहराला अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार आहे.
 
१२२ किमी जलवाहिन्या टाकणार
 
 
नव्याने मंजूर करण्यात आलेल्या योजनेत दोन उपसा विहिरी आणि उपसा केंद्रांचा समावेश आहे. शिवाय ६० दशलक्ष लिटर क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र, पाणी उचल आणि पुरवठा यंत्रणा, मुख्य जलस्त्रोत, १३ जलकुंभ उभारले जाणार आहेत. वालीवली येथे पाणी उपसा केंद्र उभारण्यात येईल. शहरभर सुमारे १२२ किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. राज्य सरकार आणि कुळगाव बदलापूर नगर पालिकेच्या माध्यमातून ही योजना पूर्ण केली जाणार आहे.
Powered By Sangraha 9.0