चित्रमय भोवतालाची गोष्ट!

23 May 2025 21:38:31

चित्रमय भोवतालाची गोष्ट!

चित्रकार श्रीकांत गडकरी यांच्या चित्रांचे प्रदर्शन मुंबईतील जहांगीर कला दालन येथे आयोजित करण्यात आले आहे. दि. 19 मे ते दि. 25 मे रोजीपर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू असलेल्या या प्रदर्शनात दर्शकांना आपल्या भोवतालाचे चित्रमय दर्शन अनुभवता येईल. 


चित्रकला ही एक दृश्य अभिव्यक्ती. विविध रंगांचा संगम, रेषा यांच्या माध्यमातून कागदावर जणू एका शिल्पाचीच निर्मिती होत असते. मानवाच्या अभिव्यक्तीचा पहिला सूरदेखील चित्रांमध्येच तर उमटला होता. त्या काळात दगडावर ओढलेल्या रेघोट्या म्हणजे संवादाचेच एक माध्यम होते. चित्रकला विकसित झाली आणि माणसाला अभिव्यक्तीसाठी नवीन सूर सापडला. पांढर्‍या शुभ्र कागदावर माणसाने आपल्या कल्पनेतून नवीन विश्व तर उभारलेच, पण त्याचसोबत आहे त्या जगाचासुद्धा या चित्रांनी नव्याने अन्वयार्थ उलगडला. खरं तर भौतिक वास्तव हे प्रत्येकासाठी एकसारखेच असते. परंतु, चित्रकाराला आहे त्या वास्तवामध्येच अनेक नवनवीन गोष्टी दिसतात. त्याच्या कलात्मक नजरेतून आहे त्या वास्तवाचे भिन्न रुप उदयास येते. श्रीकांत गडकरी यांच्या चित्रप्रदर्शनातूनसुद्धा याच गोष्टीची प्रचिती येते.

जहांगीर कला दालन येथे आयोजित करण्यात आलेल्या चित्रप्रदर्शनाचे नाव आहे ’NEIGHBOURHOOD TALES.’ श्रीकांत गडकरी यांनी आपल्या कुंचल्यातून साकारलेल्या चित्रांचे हे प्रदर्शन आपल्याच भोवतालाची एक नवीन ओळख आपल्याला करून देते. तुमच्या माझ्या अवतीभोवती रोज वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात, परंतु आपला भोवताल आपल्या रोजच्या जीवनाचा एक सवयीचा भाग झालेला असतो. त्यामुळे साहजिकच त्याकडे आपण फारसे लक्ष देत नाही किंवा साफ दुर्लक्ष करतो. पण, एक चित्रकार म्हणून श्रीकांत गडकरी यांनी नेमक्या याच सर्वसामान्य गोष्टी बारकाईने टिपल्या आहेत आणि त्यांच्याकडे बघण्याची नवी दृष्टीसुद्धा एका अर्थी आपल्याला प्रदान केली आहे. आपल्या अवतीभोवती असलेले आपले आयुष्य विविध रंगांनी नटलेले आहे, याचा आपल्याला बर्‍याचदा विसर पडतो. पण, श्रीकांत गडकरी यांच्या या चित्रदर्शनामुळे पुन्हा एकदा या रंगांची ओळख आपल्याला नव्याने होते.

मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या माजी प्राध्यापिका मनीषा पाटील श्रीकांत गडकरी यांच्या या चित्रप्रदर्शनावर भाष्य करताना म्हणाल्या की, “श्रीकांत गडकरी यांच्या चित्रांमध्ये वेगवेगळ्या सामाजिक स्तरांतील लोकांचे आपल्याला दर्शन घडते. श्रीकांत आपल्या कल्पनेतून आपल्या अवतीभोवती रोज वावरणार्‍या माणसांचे चित्रण करतात. वास्तवाचे दर्शन घडवणारं हे चित्रण जरी असलं, तरीसुद्धा श्रीकांत यांच्या वेगळेपणामुळे ही चित्रे स्वप्नवत वाटतात. रस्त्याच्या कडेला असलेला न्हावी असो किंवा मासे विकणारा कोळी भाजी घेऊन जाणारी बाई असो किंवा वासुदेव. या सगळ्यांसोबत आपले असलेले नाते या चित्रांमध्ये अधोरेखित होते. गडकरी यांच्या चित्रांचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे, या चित्रांमध्ये असलेले छोटे छोटे तपशील. प्राण्यांचा वावर असो किंवा अवतीभोवती विखुरलेल्या वस्तू, त्यांमुळे त्यांची चित्रे अधिकच उठावदार दिसतात.”

’THE DVEIL LIES IN THE DETAILS ’ अशी एक इंग्रजीत म्हण आहे. याअर्थी विचार करायचा झाल्यास, चित्रांमध्ये असलेला तपशील वाखाणण्याजोगा आहे. चित्र रेखाटताना चित्रकार किती सूक्ष्मपणे विचार करतो, हे यानिमित्ताने आपल्याला बघायला मिळते. चित्रांच्या माध्यमातून काही विशिष्ट भावनांचा संवाद बघणार्‍यांसोबतही आपसुकच घडत असतो. या संवादामध्ये हेच तपशील अत्यंत मोलाची भूमिका बजावतात.

श्रीकांत गडकरी यांच्या चित्रांच्या माध्यमातून आपल्याला एका प्रकारे इतिहासाचे दर्शनसुद्धा घडते. त्यांनी चितारलेल्या फुगेवाल्याच्या चित्राबद्दल सांगताना ते म्हणतात की, “ज्याप्रकारे मी इथे या फुगेवाल्याचा पेहराव रेखाटला आहे, त्याचबरोबर मागे भिंतीवर कोरलेली काही शिल्पेसुद्धा दाखवली आहेत. आपल्याकडे पूर्वी वेगवेगळ्या प्रकारची पवित्र मानली गेलेली चिन्हे कोरण्याची प्रथा होती. एखाद्या शुभ कार्यासाठी किंवा सकारात्मक ऊर्जेसाठी ही चिन्हे कोरली जात. हादेखील आपल्या इतिहासाचा बर्‍याच अंशी दुर्लक्षित होणारा प्रांत आहे.” आपण ज्यावेळेस त्यांच्या ‘हारा’ या चित्राकडे बघतो, तेव्हासुद्धा भिंतीवर मासा आणि कमळ यांचं कोरलेलं शिल्प याच गोष्टीची साक्ष देत असते. आपल्या संस्कृतीप्रमाणे इतिहाससुद्धा कुठे ना कुठे आपल्या रोजच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग असतो, हे यानिमित्ताने आपल्याला पुन्हा एकदा लक्षात येते. इतिहासाचा आपल्या जीवनात असलेला वावर क्रमाने चित्रांमध्ये उमटलेला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

गडकरी यांच्या चित्रांचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे, त्यांची असलेली आकृतीबंध निर्मिती. एखादे चित्र उठावदार दिसायचे असेल, तर त्यासाठी त्या चित्राचा आणि कल्पनेचा समग्र विचार करणेही तितकेच गरजेचे आहे. श्रीकांत गडकरी यांनी आपल्या चित्रांमध्ये हा विचार अत्यंत सक्षमपणे केला आहे आणि म्हणूनच तो त्यांच्या चित्रांमध्ये खोलात उमटलेला दिसतो. योग्य त्या रंगसंगतीचा वापर करत श्रीकांत गडकरी यांची चित्रे अत्यंत प्रभावीपणे आपल्यासमोर येतात. त्यांची चित्रे म्हणजे आपल्या भोवतालाचा एक कोलाज आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

श्रीकांत गडकरी यांनी एक सिद्धहस्त चित्रकार म्हणून स्वतःची वेगळी ओळख जपली आहे. ‘ललित कला अकादमी’पासून ते अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर पार पडलेल्या चित्रप्रदर्शनात त्यांनी आपल्या कुंचल्याची जादू दाखवून दिली आहे. वेगवेगळ्या पुरस्कारांनी त्यांचा सन्मान झाला असून, अनेक मान्यवरांनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे. याव्यतिरिक्त मागची 26 वर्षे कलाक्षेत्रातील शिक्षणासाठी ते काम करत आहेत. वेगवेगळ्या शिबिरांच्या माध्यमातून पुढची पिढी घडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. चित्रकलेच्या या विश्वावर भाष्य करताना ते म्हणतात की, “भारतालासुद्धा चित्रकलेचा समृद्ध वारसा लाभला आहे. राजा रविवर्मा यांच्या जिवंत तसबिरी आजसुद्धा कित्येक ठिकाणी अभ्यासल्या जातात. परंतु, दुर्दैवाने पाश्चिमात्य विचारांचा प्रभाव असल्यामुळे आपण कधीकधी आपल्याच कलाकृतींना गौण ठरवत असतो. वास्तविक, ज्या वेळेस आपली कला सातासमुद्रापार जाते, तेव्हा तिचा गौरव होतोच होतो. त्यामुळे आपण आपल्या कलेचा, आपल्या संस्कृतीचा उचित सन्मान करायाला हवा.”

एकूणच काय तर श्रीकांत गडकरी यांच्या चित्रप्रदर्शनामुळे आपल्याला आपल्या भोवतालाचे पुन्हा एकदा नव्याने दर्शन घडेल, यामध्ये शंकाच नाही!
Powered By Sangraha 9.0