राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला २८ तारखेपर्यंत पोलिस कोठडी! सुनावणीत काय घडलं?

23 May 2025 17:56:26
 
Rajendra Hagawane  & Sushil Hagawane Hagavne
 
पुणे : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या दोघांना २८ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. शुक्रवार, २३ मे रोजी पुण्याच्या शिवाजीनगर कोर्टात याप्रकरणाची सुनावणी पार पडली.
 
शुक्रवारी पहाटे राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यानंतर दुपारी त्या दोघांना शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी दोघांच्या तपासासाठी ७ दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली. दरम्यान, कोर्टाने त्यांना ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे येत्या २८ तारखेपर्यंत ते दोघेही पोलिसांच्या ताब्यात असतील.
 
 हे वाचलंत का? - "वैष्णवीने मला थोडं जरी सांगितलं असतं तर..."; काय म्हणाले अजितदादा?
 
वैष्णवी मृत्यू प्रकरणात आतापर्यंत १२ जणांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. ॲड. शिवम निंबाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, "आरोपींचा तपास करणे आणि त्यांच्याकडून काही मुद्देमाल जप्त करणे तसेच या प्रकरणात अजून कुणाचा सहभाग आहे याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी आरोपींची पोलिस कोठडी मागितली आहे. तसेच वैष्णवीला तिचा नवरा शशांक हगवणे याने पाईपने मारहाण केली असून हा पाईप पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. त्यामुळे या प्रकरणात १८८ (२) ही कलमवाढ करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाचा तपास सुरु असून तपासातून काय निष्पण्ण होते त्यानुसार आणखी कलमे लागू करण्यात येतील. वैष्णवीच्या बाळासंदर्भात या सुनावणीत काहीही बोलणे झालेले नाही. आरोपींकडे असलेली फॉर्च्युनर गाडी ताब्यात घेण्यात आली असून अजून काही हुंडा ताब्यात घेण्यात येणार आहे," असे त्यांनी सांगितले.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0