अखेर राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला बेड्या! 'अशी' झाली अटक

23 May 2025 11:45:24
 
Rajendra Hagawane  & Sushil Hagawane Hagavne
 
मुंबई : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या दोघांना अखेर ७ दिवसांनंतर अटक करण्यात आली आहे. शुक्रवार, २३ मे रोजी पहाटेच्या सुमारास बावधन पोलिसांनी त्या दोघांना स्वारगेट परिसरातून ताब्यात घेतले आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. या प्रकरणाने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यूनंतर तिची सासू लता हगवणे, नणंद करीश्मा हगवणे आणि नवरा शशांक हगवणे यांना पोलिसांनी अटक केली होती. परंतू, तिचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे फरार होते.
 
राजेंद्र आणि सुशील हगवणे या दोघांच्या शोधासाठी पोलिसांची सहा पथके तैनात करण्यात आली होती. अखेर आता त्या दोघांनाही ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. स्वारगेट परिसरातून बावधन पोलिसांनी त्या दोघांना अटक केली आहे.
 
अटकेपूर्वी केलं हॉटेलमध्ये जेवण!
 
दरम्यान, अटकेपूर्वी राजेंद्र आणि सुशील हे दोघे मावळ तालुक्यातील तळेगाव परिसरात असल्याचे आढळून आले. एका हॉटेलमध्ये जेवतानाचा त्यांचा एक सीसीटीव्ही व्हिडीओही व्हायरल झाला आहे. यात तळेगाव दाभाडे येथील हॉटेलमध्ये ते मित्रांसोबत जेवण करताना दिसतात. यावरूनच पोलिसांनी त्यांचा मागोवा घेत अटक केली आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0