राष्ट्रद्रोहाचा रोग

23 May 2025 11:07:08

Congress leaders have spread many rumours about Operation Sindoor every question they had was answered by security forces press conference
 
चांगल्या कामात खोडा घालायची काँग्रेसची म्हणा जुनीच सवय. मग ते विकास प्रकल्प असोत किंवा जनसामान्यांसाठी घेतलेले सकारात्मक निर्णय, भाजपला विरोध करण्यासाठी काँग्रेसी नेमके कोणत्या थराला पोहोचतील, याचा काही नेम नाही. जम्मू-काश्मीरमधील पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकड्यांच्या कंबरड्यात लाथ घातली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वाखाली राबविलेल्या या मोहिमेचे जगभरातून कौतुक झाले खरे; पण त्यामुळे काँग्रेस नेत्यांना भलतीच पोटदुखी सुरू झाली. मोदी आणि भाजपच्या विरोधात इतके ‘नॅरेटिव्ह’ तयार करूनदेखील लोकांचा विश्वास बसत नसल्याने ते अस्वस्थ झाले. त्यातूनच सुरू झाले ते पाकड्यांचे लांगूलचालन!
 
आजवर काँग्रेसच्या नेत्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत अनेक अफवा पेरल्या, खोटेनाटे पसरवले. काहींनी तर पाकिस्तानने भारताची लढाऊ विमाने पाडल्याचा दावाही केला. त्यांच्या प्रत्येक सवालांना सुरक्षादलांच्या पत्रकार परिषदेतून उत्तरे मिळाली असली, तरी त्याने समाधान होईल ते काँग्रेसी कसले? काल काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांनी जावईशोध लावला. म्हणे, पाकिस्तानने पाच हजार चिनी ड्रोन पाठवले. त्या ड्रोनची किंमत प्रतिनग 15 हजार रुपये होती. आपल्याकडील क्षेपणास्त्राची किंमत 15 लाख रुपये आहे. 15 हजार रुपयांचा एक ड्रोन पाडण्यासाठी आपण 15 लाखांचे क्षेपणास्त्र डागले, असाही दावा त्यांनी केला. बरे, हा दावा कोणी करावा? काँग्रेसचा गटनेता होण्यासाठी राहुल गांधींसमोर लाळघोटे करणार्‍याने? मायभूमीसाठी छातीचा कोट करणार्‍या वीर जवानांना त्यामुळे काय वाटत असेल, याचा तरी यांनी विचार करावा.
 
उठसूठ भारतीय सैनिकांच्या शौर्यावर आणि युद्धनीतीवर सवाल उपस्थित करणार्‍या विरोधकांना, राष्ट्रद्रोहाचा रोग जडला की काय, असा संशय कधीकधी येतो. की यांनी पाकिस्तानकडून सुपारी घेतली? म्हणून त्यांची एवढी भलामण करतात? पाकिस्तानचे अधिकृत प्रवक्ते जितक्या सफाईदारपणे आपल्या देशाची भूमिका मांडत नसतील, तितक्या मोठ्या आवाजात हल्ली काँग्रेस आणि त्यांचे बगलबच्चे बोलू लागले आहेत. त्यामुळे ज्योती मल्होत्राप्रमाणे यांचेही ‘पाकिस्तान कनेक्शन’ शोधून काढायला हवे!
 
राजकीय गरज
 
करवतीची धार पुढे सरली तरी कापते आणि मागे सरली तरीही कापते. उद्धव ठाकरेंच्या पक्षाची सध्याची गत त्याहून निराळी नाही. म्हणूनच बहुदा ते राज ठाकरेंना गोंजारण्याची तयारी करीत असावेत. अनिल परब यांचे परवाचे विधान त्याचे ताजे उदाहरण. “आम्ही मनसेबरोबर युतीसाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आता राज ठाकरेंनी ठरवायचे आहे की, कोणाशी युती करावी आणि कोणाशी नाही. त्यांनी महाराष्ट्राचा विचार करून निर्णय घ्यावा,” असे आवाहन परबांनी केले. पण, त्याला मनसेकडून ना ‘टाळी’ मिळाली, ना प्रतिसाद. बरे, मनसेशी जवळीक साधण्याचा ‘उबाठा’चा हा पहिला प्रयत्न नव्हे. याआधी स्वतः उद्धव, आदित्य आणि संजय राऊतांनी हात पुढे करून पाहिला. परंतु, एकदाही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.
राज ठाकरे किंवा त्यांचे एकनिष्ठ नेते-कार्यकर्ते यांना का प्रतिसाद देतील? अखंड शिवसेना असताना तीनवेळा सोबत येण्याची चर्चा अंतिम टप्प्यात आली. पण, केवळ राजकीय स्वार्थापोटी उद्धव ठाकरेंनी बोलणी तोडली. याउलट राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचा कायम दुस्वास, हेटाळणी केली. कहर म्हणजे, 2017च्या निवडणुकीवेळी मनसेशी युतीची सर्व प्रक्रिया अंतिम झाली. दोन्हीकडून ‘एबी फॉर्म’चे वाटप थांबवण्यात आले. बाळ नांदगावकर स्वत: दादरवरून ‘मातोश्री’त पोहोचले. पण, उद्धव ठाकरे पहिल्या मजल्यावरुन तळमजल्यावर काही आले नाहीत. युती तुटली. हा अपमान मनसैनिक कसे विसरतील? मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी मनसेच्या जवळपास 17 हजारांहून अधिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. त्याबद्दल त्यांनी ना कधी खंत व्यक्त केली, ना माफी मागितली. एवढेच काय तर मुंबई महानगरपालिकेतील मनसेचे सातपैकी सहा नगरसेवकही उद्धव ठाकरेंनी फोडले होतेच की...
 
मग राज ठाकरेंच्या मनात त्याबद्दल अजूनही सल नसेल हे कशावरुन? मुंबई महागनरपालिका गमावली, तर राजकारणातून कायमचे हद्दपार होऊ, या भीतीपोटीच उद्धव ठाकरेंकडून सलगी सुरू झाली आहे, हे ओळखून बहुधा राज यांनी तूर्त मौन धारण केले असावे. पण, ते जेव्हा बोलतील, तेव्हा उद्धव यांना प्रत्युत्तर देण्यास जागा नसेल, हे निश्चित!
 
 
Powered By Sangraha 9.0