दहशतवादविरोधी लढ्यात युएई आणि जपानचा भारतास पाठिंबा

22 May 2025 18:45:36
दहशतवादविरोधी लढ्यात युएई आणि जपानचा भारतास पाठिंबा

नवी दिल्ली, ऑपरेशन सिंदूरनंतर दहशतवादाविरुद्धच्या भारताच्या जागतिक स्तरावरील मोहिमेचा भाग म्हणून शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने अबुधाबी येथे युएईचे सहिष्णुता आणि सहअस्तित्व मंत्री शेख नाहयान मबारक अल नाहयान यांची तर जदयु खासदार संजय झा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जपानचे परराष्ट्र मंत्री ताकेशी इवाया यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही देशांनी भारताच्या सर्व प्रकारच्या दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी दृढ वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ऑपरेशन सिंदूर ग्लोबल आउटरीचसाठी खासदारांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने अबू धाबी येथील राष्ट्रीय मीडिया कार्यालयाचे महासंचालक जमाल मोहम्मद ओबैद अल काबी यांच्याशी झालेल्या भेटीत पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांचा भारत कसा बळी पडला आहे हे सांगितले. ते म्हणाले, पहलगाममधील हल्ल्यात निष्पाप लोक मारले गेले असे त्यांनी सांगितले. गेल्या अनेक वर्षांपासून भारतावर हल्ले होत आहेत - मुंबई दहशतवादी हल्ला, पठाणकोट हल्ला, पुलवामा हल्ला. त्यांना हे माहित होते. त्यांनी असा स्पष्ट संदेश दिला आहे की ते अशा दहशतवादी संघटना किंवा दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या देशासोबत कधीही उभे राहू शकत नाहीत; ते दहशतवादाविरुद्ध आहेत आणि सर्व देशांनी एकत्र येऊन दहशतवादाविरुद्ध लढणे महत्त्वाचे आहे. शिंदे म्हणाले की, युएई भारतासोबत उभा आहे आणि संरक्षण समितीचे अध्यक्ष अली रशीद अल नुआमी आणि सहिष्णुता मंत्री नाहयान यांच्याशी झालेल्या शिष्टमंडळाच्या भेटीतही त्याचा पुनरुच्चार करण्यात आल्याचे खासदार शिंदे म्हणाले.

भारतातील दुसऱ्या सर्वपक्षीय संसदीय शिष्टमंडळाने जपानचे परराष्ट्र मंत्री ताकेशी इवाया यांची भेट घेतली आणि सर्व प्रकारच्या दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी भारताची अढळ राष्ट्रीय सहमती आणि दृढ वचनबद्धता पुन्हा व्यक्त केली. प्रतिनिधी मंडळाचे नेते, जदयू खासदार संजय कुमार झा म्हणाले, आम्ही भारताची भूमिका जोरदारपणे मांडली. त्यांनी त्याचे कौतुक केले आणि दहशतवादाविरुद्ध कारवाई केली पाहिजे असे सांगितले. भारताने दाखवलेल्या संयमाचेही त्यांनी कौतुक केले. त्यांनी दहशतवादाविरुद्ध भारताच्या भूमिकेचे समर्थन केले. ते म्हणाले की दहशतवाद संपवला पाहिजे. त्यांनी असेही सांगितले की परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी त्यांना याबद्दल माहिती दिली होती. त्यांनी पहलगाम हल्ल्याबद्दल शोक व्यक्त केला आणि दहशतवाद्यांना शिक्षा झाली पाहिजे असे सांगितले.




Powered By Sangraha 9.0