नवी दिल्ली : दिल्लीहून श्रीनगरकडे जाणाऱ्या इंडिगो विमानाचा एक फोटो समाज माध्यमांवर व्हायरल होतोय. 6E2142 क्रमांकाचे हे विमान असून त्याच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाल्याचे फोटोमध्ये दिसतेय. वास्तविक दि. २१ मे रोजी दिल्लीहून श्रीनगर येथे रवाना होत असताना विमान अचानक आलेल्या खराब हवामानाच्या कचाट्यात सापडले. विमानात एकूण २२७ प्रवासी होते, विमानाच्या समोरील भागाचे नुकसान झाले असले तरी सर्व प्रवासी सुखरूप आहेत.
विमानाच्या पायलटने तात्काळ श्रीनगर एअर ट्रॅफिक कंट्रोलला आपत्कालीन परिस्थितीची माहिती दिली आणि सर्व सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करून विमानाचे सुरक्षित लँडिंग केले. संध्याकाळी ६:३० वाजता विमान श्रीनगर विमानतळावर सुखरूप उतरले. इंडिगोने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात सांगितले की, "फ्लाइट 6E2142 दिल्लीहून श्रीनगरकडे जात असताना अचानक वादळाचा सामना झाला. फ्लाइट आणि केबिन क्रूने निर्धारित प्रोटोकॉलचे पालन केले आणि विमान सुरक्षितपणे श्रीनगरमध्ये लॅंड केले." विमानाच्या समोरील भागास झालेल्या नुकसानामुळे त्याला 'एअरक्राफ्ट ऑन ग्राउंड' घोषित करण्यात आले आहे आणि सध्या त्याची तांत्रिक तपासणी व दुरुस्ती सुरू आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर प्रवाशांनी पायलट आणि क्रूच्या धैर्याचे कौतुक केले.