मुंबई : राज्यभरात सध्या वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यातील नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने मानसिक छळातून आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "अनेकजण मला लग्नाला बोलवतात. शक्य असेल तिथे मी जाण्याचा प्रयत्न करतो. एखाद्या लग्नाला मी गेलो आणि नंतर त्याने तिथल्या सुनेसोबत काही वेडेवाकडे केल्यास त्याच्याशी अजित पवारांचा काय सबंध आहे? ही घटना घडल्या घडल्या मी पिंपरी चिंचवडच्या पोलिस आयुक्तांना कारवाई करण्याचे आदेश दिले. वैष्णवी हगवणे या मुलीची सासू, नणंद आणि नवरा तुरुंगात आहे. सासरा पळाला. पण पळून पळून कुठे जातोय? त्याच्या मागावर सहा टीम सोडा पण त्याला मुसक्या बांधूनच आणा, असे सांगितले."
हे वाचलंत का? - ९ महिन्यांच्या बाळाचा तातडीने शोध घ्या! मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना आदेश; अखेर वैष्णवी हगवणे यांचं बाळ सापडलं
"परंतू, या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नसताना उगाच माझी बदनामी केली जात आहे. माझी चूक असेल तर मला फासावर लटकवा. त्या लग्नात मुलीचे वडील मला म्हणाले की, ही गाडीची चावी मला माझ्या जावयाला द्यायची आहे. तरीही ती चावी देताना मी विचारलं की, ही स्वखुशीने देत आहात की, बळजबरीने घेत आहात? एवढे कडक वागूनही माझी बदनामी करतात," असे अजित पवार म्हणाले.
...तर मला माफ करा!
"माझ्या माहितीप्रमाणे, बहुतेक त्या दोघांचे लव्ह मॅरेज आहे. त्याच्याशी माझा दुरान्वयेही संबंध नाही. मी फक्त त्यांच्या लग्नाला उपस्थित राहिलो. यापुढे आता कुणाच्या लग्नाला आलो नाही तर असे माझ्या मागे लागतात म्हणून आलो नाही असे समजा आणि लग्नाला न आल्याबद्दल मला माफ करा," असेही अजित पवार यावेळी म्हणाले.