पुणे : वैष्णवीला न्याय मिळावा ही सर्वांची नैतिक जबाबदारी असून न्यायाच्या प्रक्रियेत कोणतीही तडजोड होणार नाही, अशी प्रतिक्रिया महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. गुरुवार, २२ मे रोजी आदिती तटकरेंनी वैष्णवी हगवणे यांच्या पालकांची भेट घेतली.
त्यानंतर माध्यमांशी बोलताना मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, "वैष्णवी हगवणे यांचे आईवडील आणि त्यांचे बाळ ज्या परिस्थितीतून गेले ते अत्यंत वेदनादायी आहे. त्या भगिनीला न्याय देण्यासाठी जे काही करता येईल ते करण्याचा आम्ही प्रयत्न करू," असे त्या म्हणाल्या.
...तर 'त्या' पोलिसांवर कारवाई होईल!
"या प्रकरणी पोलिसांकडून काही हलगर्जीपणा झाला असल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा त्यांच्यावर योग्य ती कारवाई करतील. या घटनेतील तीन आरोपींना अटक करण्यात आली असून दोन आरोपी फरार आहेत. त्यांना शोधण्यासाठी सहा टीम नेमल्या आहेत. फरार आरोपींना पकडून तुरुंगात पाठवणे सध्या महत्वाचे आहे. दोन दिवसांपूर्वी ही घटना झाल्यानंतर सुरुवातीला ती आत्महत्या म्हणून पुढे आली. त्यानंतर शवविच्छेदन केल्यानंतर त्यातून हळूहळू एकेक बाबी उलगडत गेल्या. पण ते ९ महिन्यांचे बाळ वैष्णवी यांच्या कुटुबियांकडे सुपूर्द करणे जास्त महत्वाचे होते."
"मोठ्या सूनेने महिला आयोगाकडे तक्रार केली असेल आणि आयोगाच्या स्तरावर त्याकडे दुर्लक्ष झाले असल्यास त्यासंदर्भात योग्य ती कारवाई करण्यात येईल. कारण कदाचित सहा महिन्यांपूर्वी तक्रारीची दक्षता घेतली असती तर मोठ्या सुनेलाही न्याय मिळाला असता. यासंबंधी चौकशी करून हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. त्या कुटुंबाला न्याय देण्याच्या दृष्टीने पावलं उचलणे गरजेचे आहे. गमावलेल्या बहिणीला न्याय मिळून देणे ही आमची जबाबदारी आहे," असेही त्या म्हणाल्या.
त्या पुढे म्हणाल्या की, "या कठीण काळात कस्पटे कुटुंबाच्या पाठिशी मी आणि महाराष्ट्र शासन संपूर्ण ताकदीनं उभं आहे. वैष्णवीला न्याय मिळावा, ही आमची सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. ज्या व्यक्तींनी तिच्यावर अन्याय केला, त्यांना कडक शिक्षा व्हावी, यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत. न्यायाच्या प्रक्रियेत कोणतीही तडजोड होणार नाही. तसेच वैष्णवीचे बाळ सुखरुप असणं गरजेचं आहे, त्यासाठी बाळाची चांगल्या डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी घ्यावी. या संपूर्ण प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे या घटनेवर बारकाईने लक्ष असुन पिडीत कुटुंबियांना आम्ही नक्की न्याय मिळवून देऊ," असा विश्वासही मंत्री आदिती तटकरेंनी व्यक्त केला.