दिल्ली विधानसभेत झळकणार स्वातंत्र्यवीर सावरकर

21 May 2025 22:02:49
दिल्ली विधानसभेत झळकणार स्वातंत्र्यवीर सावरकर

नवी दिल्ली,  मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारने दिल्ली विधानसभेत स्वातंत्र्यवीर सावरकरांचे भव्य तैलचित्र लावण्याचा निर्णय घेतला आहे.

दिल्लीमध्ये तब्बल 27 वर्षांनी भाजपचे सरकार आले आहे. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारने देशातील हिंदुत्व राजकारणाचे अर्ध्वयू असलेल्या महापुरुषांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी दिल्ली विधानसभेच्या सामान्य प्रयोजन समितीने विधानसभेच्या परिसरात महान राष्ट्रीय नेत्यांचे छायाचित्र लावण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे.

दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष विजेंदर गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली या समितीची बैठक झाली. दिल्ली विधानसभा परिसरामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर, महर्षी दयानंद सरस्वती आणि पंडित मदन मोहन मालवीय यांची छायाचित्रे लावण्याचा निर्णय एकमताने मंजूर करण्यात आला आहे. दिल्ली विधानसभेतर्फे त्याची माहिती देण्यात आली आहे.

हा प्रस्ताव समितीचे सदस्य अभय वर्मा यांनी मांडला. ते म्हणाले की, राष्ट्र उभारणी, सामाजिक जाणीव आणि शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणण्याचे हे तीन महापुरुष प्रणेते आहेत. विधानसभेच्या परिसरात त्यांचे फोटो लावणे भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्त्रोत ठरेल आणि देशभक्ती, सेवा आणि लोकशाही मूल्यांना प्रोत्साहन देईल.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या योगदानाचा गौरव

एकमताने मंजूर झालेल्या या ठरावात, विधानसभेच्या आवारात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे छायाचित्र लावण्याची विशेष शिफारस करण्यात आली आहे. स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान देशभर आदराने लक्षात ठेवले जाते आणि विधानसभेच्या भित्तीचित्र परंपरेत त्यांचा समावेश करणे सर्वात योग्य आणि अभिमानास्पद ठरेल, या वस्तुस्थितीचा समितीने पुनरुच्चार केला आहे.

Powered By Sangraha 9.0