मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांना घरात घुसून मारण्याची धमकी देणाऱ्या युसूफ अन्सारीला तडीपार करण्यात आले आहे. युसूफ अन्सारीला १५ महिन्यांकरिता मुंबईतून तडीपार करण्याचे आदेश दिले आहे.
किरीट सोमय्या यांनी मशीदींवरील अनधिकृत भोंग्यासंदर्भात तक्रार दाखल केल्याने एप्रिल महिन्यात धमकी देण्यात आली होती. हजरत ख्वाजा गरीब नवाज कमिटीचे सचिव युसुफ अन्सारीने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत सोमय्यांच्या घरी येऊन आंदोलन करण्याची तसेच घरात घुसून मारण्याची धमकी दिली होती.
त्यानतंर ईशान्य मुंबईचे भाजपचे अध्यक्ष दिपक दळवी यांनी मुलूंड पोलिस आयुक्तांना पत्र लिहित युसूफ उमर अन्सारीवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार युसूफ अन्सारीला पोलिसांनी ताब्यातही घेतले. त्यानंतर आता गोवंडी भागातील शिवाजीनगरमध्ये राहणाऱ्या युसूफ अन्सारीला पोलिस उपायुक्त (DCP Zone 6) यांनी हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ अन्वये १५ महिन्याकरिता युसुफ अन्सारीला मुंबईतून हद्दपार करण्यात आले आहे.