राज्यात आज पावसाचा इशारा! मालवणसह तळकोकणात मुसळधार पावसाची बॅटिंग

21 May 2025 14:38:21
 
Rain warning Heavy rain expected in Malvan including konkan
 
मुंबई : ( Rain warning Heavy rain expected in Malvan including konkan ) महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली असून आज २१ मे रोजी कोकण आणि महाराष्ट्रातील काही जिल्हांना हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकणासह पुणे, कोल्हापुर, सातारा, बीड, संभाजीनगर या जिल्हांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
 
दरम्यान, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे येथील काही जिल्हांनासुद्धा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यभरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यातील विविध भागांमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्याने आज दिवसभर अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा जोर पहायला मिळत आहे. मंगळवारी कोकणात दिवसभर मुसळधार पाऊस सुरू असल्याने काही ठिकाणी वीजपुरवठाही खंडीत करण्यात आला होता.
 
पुढील काही दिवसांमध्ये अशाच प्रकारच्या मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे हवामान विभागाकडून राज्यातील नागरिकांना योग्य ती तयारी ठेवत सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विदर्भातील काही जिल्ह्यांत आज ढगाळ वातावरण असेल त्यामुळे तेथील उष्णतेत वाढ होण्याची शक्यता आहे. नागपूरसह यवतमाळ, गोंदिया, वाशिम, गोंदिया या जिल्ह्यांसाठी आज पावसाचा अलर्ट देण्यात आलेला नाही.
 
मालवणसह तळकोकणात जोरदार पाऊस
 
तळ कोकणातील मालवण, कुडाळ, कणकवली येथे मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली असून गेल्या २४ तासात सिंधुदुर्ग जिल्हात सरासरी ९६.५ मी मी पावसाची नोंद झाली आहे. मंगळवारी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसाने तळकोकणाला झोडपून काढलं. दरम्यान, हवामान खात्याकडून आज सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0