पाकच्या बलुचिस्तानमध्ये शाळेच्या बसवर झालेल्या आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात चार विद्यार्थ्यांचा मृत्यू, ३८ जण जखमी

21 May 2025 16:05:49
Four children killed, 38 injured after suicide car bomb hits school bus in Pakistan
 
नवी दिल्ली : (Suicide Car Bomb hits school bus in Pakistan) पाकिस्तानच्या नैऋत्येला असणाऱ्या बलुचिस्तान प्रांतातील खुजदार जिल्ह्यात बुधवारी २१ मे रोजी शाळेच्या बसवर आत्मघातकी कार बॉम्बरकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून तब्बल ३८ जण जखमी झाल्याची माहिती आहे. 
 
स्थानिक उपायुक्त यासिर इक्बाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, बस मुलांना शाळेत घेऊन जात असताना धडकली. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सुरक्षा दलांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि रुग्णवाहिकांनी जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
 
आतापर्यंत कोणत्याही गटाने जबाबदारी स्वीकारलेली नाही, परंतु संशय वांशिक बलुच फुटीरतावादी संघटनांवर, विशेषतः बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (BLA) असण्याची शक्यता आहे, त्यांच्याकडूनच सातत्याने स्थानिक आणि लष्कराला लक्ष्य केले जात आहे. २०१९ मध्ये अमेरिकेने बलुचिस्तान लिबरेशन आर्मीला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले होते.
 
पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आणि मुलांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. "निष्पाप मुलांना जाणूनबुजून लक्ष्य करून क्रूर कृत्य करणारी जनावरं कोणत्याही दयेला पात्र नाहीत.", अश्या शब्दात त्यांनी निषेध व्यक्त केला आहे.
 
बलुचिस्तान हे बऱ्याच काळापासून फुटीरतावादी हिंसाचार आणि दहशतवादी घटनांचे केंद्रस्थान आहे. खुजदारमध्ये झालेला हल्ला हा या भागात एका आठवड्यातील दुसरा मोठा हल्ला आहे, ज्यामुळे या प्रदेशाच्या सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे. सध्या सुरू असलेल्या हिंसाचारामुळे सामान्य नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.
 
Powered By Sangraha 9.0