पाकविरोधात आणखी एक मोठे पाऊल! 'या' स्टेडियममधील ‘वॉल ऑफ ग्लोरी’ वरून हटवले पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे फोटो

20 May 2025 12:21:13
 
jaipur
 
 
जयपूर : (Jaipur's Sawai Mansingh Stadium removed Photos of Pakistani Cricketers) पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर वाढलेला भारत-पाकिस्तान मधील तणाव आता हळूहळू निवळत आहे. मात्र या तणावाचा थेट परिणाम भारतीय क्रिडाविश्वावर झाल्याचे दिसून आले. या संवेदनशील काळात दोन्ही देशांकडून आपापल्या क्रिकेट लीग्स पुढे ढकलण्यात आल्या होत्या. तर या पार्श्वभूमीवर आता राजस्थान क्रिकेट असोसिएशनकडून (आरसीए) आणखी एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. जयपूरमधील सवाई मान सिंग स्टेडियममधील 'वॉल ऑफ ग्लोरी' वरून पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे फोटो काढून टाकण्याचा कठोर निर्णय घेतला आहे.
 
नेमकी कारवाई काय ?
 
‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर अनेक पाकिस्तानी खेळाडूंनी भारताविरुद्ध गरळ ओकण्याचे काम केले होते. त्यामुळे आता जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियममधील ‘वॉल ऑफ ग्लोरी’ वरून सर्व पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे फोटो काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. येथे खेळलेल्या परदेशी खेळाडूंचे फोटो या स्टेडियममधील भिंतीवर लावण्यात आले होते. या भिंतीला ‘वॉल ऑफ ग्लोरी’ म्हणून ओळखले जाते. हे स्टेडियम १९६९ मध्ये स्थापन झाले आणि त्याच्या गौरवशाली इतिहासाचा विचार करता, कोणत्याही क्रिकेटपटूचा फोटो 'वॉल ऑफ ग्लोरी' वर असणे ही खूप सन्मानाची गोष्ट आहे. .पण आता राजस्थान क्रिकेट असोसिएशनने सर्व पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे फोटो काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
 
हिंदू क्रिकेटपटूचाही फोटो हटवला
 
पाकिस्तान संघाने या जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर एक कसोटी आणि ४ एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये एकूण २५ पाकिस्तानी क्रिकेटपटू खेळले आहेत. यामध्ये हिंदू क्रिकेटपटू असणारा पाकिस्तानचा माजी फिरकी गोलंदाज दानिश कनेरियाचेही नाव समाविष्ट आहे. कनेरियाने पाकिस्तानसाठी ६१ कसोटी आणि १८ एकदिवसीय सामने खेळले, तो लेग-स्पिनर होता ज्याने कसोटीत २६१ बळी घेतले. त्याने भारताविरुद्ध ११ कसोटी सामन्यात ४४ विकेट्स घेतल्या. कनेरिया यांनी यापूर्वीही पाकिस्तानी क्रिकेट संघात हिंदू असल्याने भेदभावाला सामोरे जावे लागत असल्याचे भाष्य केले होते. कनेरिया यांनी आरोप केला होता की माजी कर्णधार शाहिद आफ्रिदींने त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास सांगितले होते. दानिश कनेरिया हे कायमच पाकिस्तानी सरकार आणि मोठ्या राजकीय नेत्यांविरुद्ध आवाज उठवताना दिसतात. अनेकदा सोशल मीडियावर लोक त्यांना पाकिस्तानविरोधी आणि भारताचे हितचिंतक म्हणून संबोधतात.
 
यापूर्वीही अशी कारवाई झाली होती
 
'वॉल ऑफ ग्लोरी' वरून पाकिस्तानी खेळाडूंची नावे काढून टाकण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०१९ मध्ये पुलवामा हल्ल्यानंतरही असाच निर्णय घेण्यात आला होता. राजस्थान क्रिकेट असोसिएशनने एक अधिकृत निवेदन जारी करून म्हटले आहे की, "येथे खेळलेल्या सर्व आंतरराष्ट्रीय खेळाडूंची नावे स्टेडियममध्ये लावण्यात आली आहेत. यावरून पाकिस्तानी खेळाडूंचे फोटो काढून टाकण्यात आले आहेत."
 
 
Powered By Sangraha 9.0