चेन्नई : (Veteran Nuclear Scientist M. R. Srinivasan passes away at 95) प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ आणि अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. एम. आर. श्रीनिवासन यांचे निधन झाले आहे. मंगळवारी २० मे रोजी त्यांनी वयाच्या ९५ व्या वर्षी तामिळनाडूतील उदगमंडलम येथे अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने भारताने एक असा शास्त्रज्ञ गमावला आहे ज्यांनी देशाला अणुऊर्जेमध्ये स्वयंपूर्ण बनवण्याचे स्वप्न साकार केले.
डॉ. श्रीनिवासन हे भारताच्या नागरी अणुऊर्जा कार्यक्रमाचे मुख्य शिल्पकार होते. त्यांनी भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाला जागतिक मान्यता मिळवून दिली. त्यांनी सप्टेंबर १९५५ मध्ये अणुऊर्जा विभागात (DAE) आपली कारकीर्द सुरू केली आणि पाच दशकांहून अधिक काळ या क्षेत्रात काम केले. १९५६ मध्ये कार्यान्वित झालेल्या भारतातील पहिल्या अणुभट्टी 'अप्सरा'च्या बांधकामात अणुभौतिकशास्त्रज्ञ डॉ. होमी भाभा यांच्यासोबत ते सहभागी होते. भारताच्या अणुप्रवासातील हे पहिले पाऊल होते.
१९५९ मध्ये त्यांना देशातील पहिल्या अणुऊर्जा केंद्राचे मुख्य अभियंता म्हणून नियुक्त करण्यात आले. १९६७ मध्ये त्यांनी मद्रास अणुऊर्जा केंद्राचे मुख्य प्रकल्प अभियंता म्हणून पदभार स्वीकारला. त्यांनी भारताच्या स्वावलंबी अणुऊर्जा क्षमतेचा पाया रचला.१९७४ मध्ये ते अणुऊर्जा विभागाच्या पॉवर प्रोजेक्ट्स डिव्हिजनचे संचालक झाले.
पुढे १९८७ मध्ये, डॉ. श्रीनिवासन यांनी अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि अणुऊर्जा विभागाचे सचिव म्हणून पदभार स्वीकारला. त्याच वर्षी त्यांनी न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एनपीसीआयएल) या संस्थेची स्थापना केली आणि तिचे पहिले अध्यक्ष बनले. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने १८ अणुऊर्जा प्रकल्प विकसित केले, त्यापैकी सात कार्यरत होते, सात बांधकामाधीन होते आणि चार नियोजित होते. त्यांच्या प्रयत्नांमुळे भारताने अणुऊर्जेच्या क्षेत्रात वेगाने प्रगती केली.
पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित
अणुविज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील त्यांच्या अनुकरणीय योगदानाबद्दल डॉ. श्रीनिवासन यांना भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण प्रदान करण्यात आला. त्यांचे दूरदर्शी नेतृत्व, तांत्रिक कौशल्य आणि राष्ट्रासाठी अथक सेवेचा वारसा भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील, असे त्यांची मुलगी शारदा श्रीनिवासन यांनी कुटुंबाच्या वतीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
डॉ. श्रीनिवासन यांच्या निधनाने भारताच्या अणुविज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्राच्या इतिहासातील एका युगाचा अंत झाला आहे. देशाच्या प्रगतीला आणि ऊर्जा सुरक्षेला चालना देणारा एक चिरस्थायी वारसा त्यांनी मागे सोडला आहे.