मुंबई : ( Chhagan Bhujbal takes oath as cabinet minister ) राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा महायुतीच्या मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. मंगळवार, दि. २० मे रोजी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ दिली.
शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह महायुती सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपस्थित होते. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागी छगन भुजबळ यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचा कारभार दिला जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, शपथविधी सोहळ्याआधी राजभवनाच्या प्रवेशद्वारावर माध्यमांशी संवाद साधताना भुजबळ म्हणाले, "मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांचे आभार मानतो. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचेही आभार मानतो. सगळे आठ दिवसांपूर्वीच ठरले आहे. त्यानंतर आता शपथविधी होतो आहे. ज्याचा शेवट चांगला, ते सगळं चांगले", अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
भुजबळ यांची राजकीय कारकीर्द
- छगन भुजबळ यांनी १९६० च्या दशकात शिवसेनेतून राजकीय कारकीर्द सुरू केली. राजकारणात येण्यापूर्वी ते मुंबईतील भायखळा मार्केटमध्ये भाजी विकायचे. त्यांच्या आईचा लहानसा गाळा होता.
- १९७३ मध्ये त्यांनी पहिल्यांदा शिवसेनेकडून नगरसेवकपदासाठी निवडणूक लढवली, त्यात ते विजयी झाले. १९७३ ते १९८४ या काळात ते मुंबई महापालिकेत विरोधी पक्षनेते होते. त्यानंतर १९८५ मध्ये महापौर झाले.
- १९८५ व १९९० अशा दोन वेळा मुंबईतील माझगाव विधानसभा मतदारसंघातून ते विधानसभेत निवडून गेले. नोव्हेंबर १९९१ मध्ये महसूलमंत्री, गृहनिर्माण आणि झोपडपट्टी सुधारणा या खात्याचे १९९५ पर्यंत मंत्री, तसेच एप्रिल १९९६ मध्ये विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अशी त्यांची कारकीर्द राहिली.
- राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाल्यानंतर १८ ऑक्टोबर १९९९ रोजी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शिवाय गृह आणि पर्यटन ही दोन खाती सांभाळली. एप्रिल-२००२ मध्ये विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली. एप्रिल २००२ ते २३ डिसेंबर २००३ या कालावधीत उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री या दोन मंत्रालयांचा कारभार त्यांनी सांभाळला.
- २००४ मध्ये येवला मतदारसंघातून विधानसभेवर निवड झाली. नोव्हेंबर २००४ ते ३ डिसेंबर २००८ या कालावधीत सार्वजनिक बांधकाममंत्री, तर २००८ रोजी महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री झाले. २००९ मध्ये दुसऱ्यांदा, तर २०१४ मध्ये तिसऱ्यांदा व २०१९ मध्ये सलग चौथ्यांदा येवला विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले.
- महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये दि. ८ नोव्हेंबर २०१९ पासून राज्याच्या अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली. तसेच महायुती सरकारमध्ये सामील झाल्यानंतर भुजबळ यांच्यावर २ जुलै २०२३ रोजी पुन्हा राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा ते कॅबिनेट मंत्री झाले आहेत.