ब्लॅकमेलिंग नव्हे, तर कामाने सामान्यांना दिलासा द्या - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

20 May 2025 16:28:14
 
CM fadanvis Advice to MLA on maharashtra legislative committees
 
मुंबई: - ( CM fadanvis Advice to MLA on maharashtra legislative committees ) “सरकारवर अंकुश ठेवत सामान्य माणसाला दिलासा देण्यासाठी विधिमंडळाच्या विविध समित्या असतात. मात्र, मध्यंतरीच्या काळात समित्यांचे अध्यक्ष आणि सदस्यांनी आपल्या अधिकारांचा दुरुपयोग केला. ब्लॅकमेलिंग केल्याने या समित्या बरखास्त करण्याची मागणी पुढे आली. त्यामुळे नव्याने निर्माण झालेल्या समित्यांवरील सदस्यांनी समित्यांचा दुरुपयोग होणार नाही, याची काळजी घ्यावी. आपल्या कामाने विधिमंडळाचे कामकाज समृद्ध करावे,” असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार, दि. 19 मे रोजी केले.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहातील 2024-25 या वर्षासाठीच्या महाराष्ट्र विधानमंडळाच्या सर्व समित्यांचे एकत्रित उद्घाटन पार पडले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषद उपसभापती नीलम गोर्‍हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मंत्री आशिष जयस्वाल आणि समितीचे इतर सदस्य उपस्थित होते.
 
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “उद्घाटन केलेल्या समित्यांचे कामकाज लवकरच सुरू करण्यात येईल. विधानमंडळाचे कामकाज हे खर्‍या अर्थाने विधानसभेच्या किंवा परिषदेच्या सभागृहात नाही, तर या समित्यांमध्ये चालते. सभागृहात बोलत असताना वेळेचे आणि विषयाचे बंधन असते, त्यामुळे एखाद्या विषयावर अतिशय सखोल अशी चर्चा आणि मंथन करून त्याची दिशा ठरवणे शक्य होत नाही. म्हणूनच संसदीय लोकशाहीमध्ये समित्यांची पद्धत सुरू झाली. या समित्या जेव्हा कामकाज करतात, तेव्हा त्यांना विधिमंडळ सभागृहाचाच दर्जा असतो.
 
समितीचे अहवाल विधिमंडळात प्रस्तुत होतात, त्यांच्या अहवालावर विभागांना कारवाई करावी लागते, हे अहवाल म्हणूनच प्रत्येक समिती विधानमंडळाचे सूक्ष्म रूप आहे. शासन-प्रशासन समजून घेण्यासाठी समित्यांपेक्षा उत्तम प्रकारची व्यवस्था नाही. यासोबतच प्रत्येक समितीची आपली भूमिका आहे, कोणतीही समिती लहान किंवा मोठी नाही,” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
 
विधिमंडळ समित्या म्हणजे प्रशासनावरील अंकुश
 
- “लोकलेखा समिती महत्त्वाची मानली जाते, ही समिती ’कॅग’च्या निरीक्षणावर संबंधित विभागाच्या सचिवांना बोलावून जाब विचारते. अंदाज समिती प्रत्येक विभागाने केलेल्या मागण्या आणि त्यांनी केलेला खर्च याचा लेखाजोखा ठेवते तसेच त्यावर प्रश्न विचारते. ‘पंचायत राज समिती’ पंचायत राज संस्थांवर लक्ष ठेवते. यासोबतच विनंती अर्जसमितीमार्फत मोठे परिवर्तन घडवणे शक्य असून या सर्व समित्या म्हणजे ’प्रशासनावरील अंकुश’ आहे,” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
 
- “विधिमंडळ समित्या लोकशाहीच्या आत्म्याचे प्रतिबिंब आहेत. एखाद्या महत्त्वाच्या प्रश्नावर समित्या अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतात. समित्यांना संविधानाने विशेष अधिकार दिले आहेत. तंत्रज्ञानाच्या मदतीने डिजिटल सभा कशा आयोजित करता येतील, समित्यांचे निष्कर्ष जनतेपर्यंत कसे पोहोचवता येतील, तसेच समित्यांच्या कामकाजात अधिक पारदर्शकता कशी आणता येईल, याकडे लक्ष देणे अत्यावश्यक आहे. संसदीय लोकशाहीत सत्ताधारी व विरोधी पक्ष यांनी समित्यांद्वारे एकत्र येऊन जनतेसाठी कार्य करणे आवश्यक आहे,” असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. यावेळी सभापती राम शिंदे, अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपसभापती नीलम गोर्‍हे यांचीही भाषणे झाली.
 
 
Powered By Sangraha 9.0