दहशतवादी गटांना मदत, पाकच्या दुष्कृत्यांची बिलावल भुट्टोंकडून जाहीर कबुली! म्हणाले, "हे काही आता गुपित..."

02 May 2025 15:11:34

bilawal bhutto accepts pakistan
 
नवी दिल्ली : (Bilawal Bhutto statement on Pakistan Terror Backing) पाकिस्तानकडून दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचा आरोप भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरांमधून करण्यात आलेला आहे. मात्र पाकिस्तानने कायमच या आरोपांचे खंडण करत कधीही ही बाब स्वीकारली नव्हती. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी स्काय न्यूज या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये गेल्या ३० वर्षांपासून पाकिस्तान दहशतवादाला पोसण्याचे काम करत असल्याची कबुली दिली होती. यानंतर आता पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो-झरदारी यांनीही ही बाब मान्य करत भूतकाळात हे वाईट कृत्य केल्याचे कबूल केले आहे.
 
हे वाचलंत का? -  युद्धाच्या भीतीने पाकिस्तानची झोप उडाली! २९ जिल्ह्यात बसवले सायरन, मोबाईल बंद ठेवण्याच्या सूचना
काय म्हणाले भुट्टो ?
 
बिलावल भुट्टो यांनीही स्काय न्यूजला नुकतीच मुलाखत दिली. यावेळी त्यांच्यासमोरही ख्वाजा आसिफ यांना विचारलेला प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावर उत्तर देताना भुट्टो म्हणाले की, "संरक्षणमंत्र्यांनी जे सांगितले तो पाकिस्तानचा भूतकाळ आहे. आणि हे काही आता गुपित राहिलेले नाही. पाकिस्तानने भूतकाळात दहशतवादी गटांना मदत पुरवली होती. पहिल्या अफगाण युद्धादरम्यान पाकिस्तानने मुजाहिदीनला पाठिंबा देऊन त्यांना निधी पुरवठा केला होता. पाकिस्तानचा यात सक्रिय सहभाग होता. पाश्चात्य देशांसह एकत्रित येऊन आणि त्यांच्या पाठिंब्याने आम्ही हे काम केले. पाकिस्तानात दहशतवादाच्या अनेक लाटा येत राहिल्या. यात आमचेही नुकसान झाले."
 
 
 
"....मात्र परिस्थिती बदलली आहे"
 
"पाकिस्तानने भूतकाळात दहशतवादाला पोसले असले तरी आता मात्र परिस्थिती बदलली आहे", असा दावाही भुट्टो यांनी केला. "आज आम्ही दहशतवादाच्या कोणत्याही कृत्यात सामील नाही. इतिहासात नक्कीच दुर्दैवाने आम्ही याचा भाग होतो. पण यातून आम्ही काही धडेही शिकलो", असे भुट्टो यांनी या मुलाखतीत सांगितले.
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0