विक्रांत मस्येचा नवा लूक चर्चेत; श्री श्री रविशंकर यांच्या जीवनावर आधारित आंतरराष्ट्रीय चित्रपटात मुख्य भूमिका!

    02-May-2025
Total Views |
 
Vikrant Masye new Lead role in international film based on the life of Sri Sri Ravi Shankar
 
 
मुंबई: ( Vikrant Masye new Lead role in international film based on the life of Sri Sri Ravi Shankar ) १२ फेल’, ‘हसीन दिलरुबा’ यांसारख्या चित्रपटांमधून आपल्या सहजसुंदर अभिनयाची छाप सोडणारा विक्रांत मस्ये नुकताच वेव्स २०२५ – वर्ल्ड ऑडियो विजवल एंटरटेनमेंट समिट मध्ये एका आकर्षक अंदाजात दिसून आला. काळ्या सुटमधील त्याचा आत्मविश्वासपूर्ण वावर अनेकांचं लक्ष वेधून गेला. मात्र खऱ्या अर्थाने चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे त्याचा नवा हेअरस्टाईल सडपातळ केस मागे घेतलेले आणि लो पोनीटेलमध्ये बांधलेले, जे त्याला तरुण आणि आध्यात्मिक छटा देत होते. मिळालेल्या माहितीनुसार, विक्रांतचा हा लूक त्याच्या आगामी चित्रपटासाठी आहे, जो गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या जीवनावर आधारित एक आंतरराष्ट्रीय थ्रिलर असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत असून, निर्मिती महावीर जैन यांची आहे.
 
‘व्हाईट’ असे या चित्रपटाचे नाव असून, याचे चित्रीकरण जुलैपासून सुरू होणार आहे. यात विक्रांत मस्ये श्री श्री रविशंकर यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. त्यांच्या व्यक्तिरेखेतील बारकावे पकडण्यासाठी विक्रांत यांनी स्वतः गुरुदेवांची प्रत्यक्ष भेट घेतली असून, त्यांचे हावभाव, देहबोली आणि आत्मिक शांतता आत्मसात करण्याचा प्रयत्न करत आहेत. हा चित्रपट भारतासह कोलंबियामध्ये चित्रीत होणार असून, त्यासाठी लॉस एंजेलिसमधील आंतरराष्ट्रीय कलाकार व तंत्रज्ञांची टीम सहभागी होणार आहे. चित्रपटात प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानाने एका जगभर चाललेल्या संघर्षात शांततेचा प्रकाश कसा आणला, यावर केंद्रित कथा असेल.
 
‘व्हाईट’ हा चित्रपट हिंदी, इंग्रजी आणि स्पॅनिश भाषांमध्ये तयार होणार असून, भविष्यात तो अनेक आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये डब करून प्रदर्शित करण्याचे उद्दिष्ट आहे. महावीर जैन फिल्म्स, मार्फ्लिक्स पिक्चर्स आणि पीसक्राफ्ट पिक्चर्स या बॅनरखाली हा चित्रपट निर्माण होत असून, सुप्रसिद्ध अ‍ॅड फिल्ममेकर मोंटू बसी दिग्दर्शन करणार आहेत. या भूमिकेमुळे विक्रांत मस्येच्या कारकिर्दीत एक नवीन अध्याय उघडणार आहे, आणि प्रेक्षकही त्याच्या या आध्यात्मिक भूमिकेकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहेत.