नवी मुंबईत उबाठा गटाला दणका! माजी नगरसेवक शिवसेनेत दाखल

02 May 2025 11:47:18
 
Shivsena
 
नवी मुंबई : उबाठा गटाला लागलेली गळती दिवसेंदिवस वाढत असून आता नवी मुंबई महापालिकेतही त्यांना जोरदार धक्का बसला आहे. नवी मुंबई महापालिकेतील उबाठा गटाचे माजी नगरसेवक आणि पक्षाचे प्रतोद रतन मांडवे तसेच त्यांच्या पत्नी सुनीता रतन मांडवे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
 
गुरुवार, १ मे रोजी ठाण्यातील आनंदआश्रम येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी बेलापूर विधानसभा अधिकारी निखिल मांडवे, शाखाप्रमुख अनुभव बेळे, शाखा संघटक सौ.जयश्री बेळे, विधानसभा संघटक सुनील सानप, विभाग अधिकारी विशाल गुंजाळ, शाखा अधिकारी अमित जाधव यांनीसुद्धा शिवसेनेत प्रवेश केला.
 
यासोबतच राष्ट्रीय काँग्रेस प्रणित कामगार संघटना असलेल्या इंटकच्या विविध पदाधिकाऱ्यांनीही शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. यामध्ये प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब चव्हाण, मुंबई अध्यक्ष अमित भटनागर, पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष सौ. प्रभाताई कांबळे तसेच पुणे, नाशिक, अहिल्यानगर, नंदुरबार आणि धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आणि मुंबईतील विविध पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.
 
महापालिकांवर भगवा फडकणार!
 
याप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "या सर्वांच्या पक्षप्रवेशाने शिवसेनेची ताकद अधिक वाढली आहे. पक्षात दररोज होणारे पक्षप्रवेश शिवसेनेला अधिक बळकटी मिळवून देत आहेत. विधानसभा निवडणुकीने खरी शिवसेना कुणाची हा प्रश्न कायमचा निकाली काढल्याने आता पक्षात येणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. आमच्यावर उठसुठ टीका करणाऱ्यांवर आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. गेल्या अडीच वर्षात केलेल्या कामाच्या बळावर लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेनेकडे आकृष्ट होत असून त्यामुळेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महापालिकांवर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
 
 
Powered By Sangraha 9.0