संजय राऊतांनी 'ती' सवय सोडून द्यावी! मंत्री संजय शिरसाटांचा सल्ला

02 May 2025 12:44:20
 
Sanjay Raut & Sanjay Shirsat
 
छत्रपती संभाजीनगर : आमच्या सरकारमध्ये कोण काय करते हे डोकावून पाहण्याची सवय संजय राऊतांनी सोडून द्यावी, असा खोचक सल्ला मंत्री संजय शिरसाट यांनी त्यांना दिला आहे. शुक्रवार, २ मे रोजी त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
 
मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, "संजय राऊतांना आणि त्यांच्या नेत्यांना प्रशासन काय आहे हे अजूनही कळलेले नाही. घरात बसून राज्य चालवण्याइतपत ते सोपे नाही. देश चालवणे म्हणजे सर्व बाबींवर बारकाईने लक्ष ठेवणे. आपल्यावर जगाचे लक्ष असते. त्यामुळे त्यावेळी पंतप्रधान, राष्ट्रपती आणि त्यांच्या कॅबिनेटला निर्णय घ्यायचा असतो. आपण अडीच वर्षे घरात बसून जशी सत्ता चालवली तसेच सगळीकडे चालते की, काय असे स्वप्न राऊतांना पडत असावेत. पण वस्तुस्तिथी तशी नसते. सैन्याला आदेश देण्यासाठी किंवा इतर राजकीय डावपेचांकरिता तशी परिपक्वता असावी लागते. आमच्या सरकारमध्ये ती परिपक्वता आहे. त्यामुळे जो काही निर्णय होईल तो सर्वांना बरोबर घेऊन केला जाईल. आमचे नेते महाराष्ट्रात ग्रामीण भागात आहेत लंडनला नाही. महाराष्ट्रात कुठेही बसून सत्ता चालवण्याची ताकद आमच्यात आहे. लंडनमध्ये बसून सरकार चालवण्याइतके मुर्ख आम्ही नाहीत. आमच्या सरकारमध्ये कोण काय करते हे डोकावून पाहण्याची सवय संजय राऊतांनी सोडून द्यावी," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  नवी मुंबईत उबाठा गटाला दणका! माजी नगरसेवक शिवसेनेत दाखल
 
सावत्र भावांनी लाडक्या बहिणींची चिंता करू नये!
 
लाडकी बहिण योजनेच्या हफ्त्याबाबत बोलताना ते पुढे म्हणाले की, "लाडक्या बहिणींना लवकरच हप्ता दिला जाईल. कुणाचाही हप्ता थांबवणार नाही. लाडक्या बहिणींची सर्वात जास्त काळजी आम्हाला आहे. त्यामुळे सावत्र भावांनी त्यांची चिंता करू नये."
 
...त्यात काहीही गैर नाही!
 
"मनसेकडून बाळासाहेब ठाकरेंबद्दल अपशब्द बोलण्याचा प्रश्नच येत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना मानणारे लाखों शिवसैनिक आहेत. त्यात मनसे, शिवसेना आणि इतर पक्षांचे लोकसुद्धा आहेत. त्यामुळे मनसेने बॅनरवर बाळासाहेबांचा फोटो लावण्यात काहीही गैर नाही. बाळासाहेब हे देशाचे नेते आहेत. त्यांना राजमान्यता आणि लोकमान्यता प्राप्त आहे. मनसे आणि उबाठा एकत्र येईल का, याबाबत शंका असली तरी लोकांच्या मनात बाळासाहेबांबद्दल प्रेम आहे हे निश्चित आहे," असेही मंत्री संजय शिरसाट म्हणाले.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0