हर हर महादेव! बाबा केदारनाथ धामचे दरवाजे भाविकांसाठी उघडले

02 May 2025 18:16:38

Kedarnath Door Open Ceremony

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Kedarnath Door Open Ceremony)
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या उत्तराखंड येथील बाबा केदारनाथचे दरवाजे पारंपारिक हिंदू परंपरेनुसार शुक्रवार, दि. २ मे रोजी भाविकांसाठी उघडण्यात आले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी उपस्थित होते. संपूर्ण परिसर हर हर महादेव आणि जय बाबा केदारनाथच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. कर्नाटकातील वीरशैव लिंगायत समुदायाचे प्रमुख रावल भीमाशंकर हे मंदिरात पोहोचणारे पहिले होते. गढवाल रायफल्सच्या बँडने धार्मिक संगीत वादनाने कार्यक्रमाची शोभा आणखी वाढल्याचे दिसून आले.

हे वाचलंत का? : कर्नाटकात बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची निर्घृण हत्या

दरवाजे उघडताच, भाविकांना मंदिराच्या आत शाश्वत ज्योत तेवताना दिसली. यानंतर रुद्राभिषेक, शिवाष्टक, शिव तांडव स्तोत्र आणि केदाराष्टक या मंत्रांचा जप करण्यात आला. मंदिर ५४ प्रकारच्या १०८ क्विंटल फुलांनी सजवले होते. यामध्ये नेपाळ, थायलंड आणि श्रीलंका सारख्या विविध देशांमधून आणलेली गुलाब आणि झेंडूची फुले समाविष्ट आहेत. पहिल्या दिवशी सुमारे १०,००० लोक दर्शनासाठी आले होते. गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी टोकन पद्धतीने दर्शन दिले जात आहे. दि. ३० एप्रिलपासून (अक्षय तृतीया) चार धाम यात्रेला सुरुवात झाली. गंगोत्री आणि यमुनोत्री धामचेही दरवाजे उघडले आहेत. बद्रीनाथ धामचे दरवाजे ४ मे रोजी उघडले जातील.


Kedarnath Door Open Ceremony
  
भाविकांच्या सुरक्षेची पुरेपूर काळजी
चार धाम यात्रेत कोणालाही कोणतीही अडचण येऊ नये असा सरकारचा प्रयत्न असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सांगितले. ते म्हणाले, "अक्षय तृतीयेच्या निमित्ताने ३० एप्रिल रोजी चार धाम यात्रा सुरू झाली आहे. लवकरच भगवान बद्रीनाथ धामचेही दरवाजे उघडले जातील आणि यात्रा पूर्ण वेगाने सुरू होईल. भाविकांचा प्रवास सुरक्षित राहावा आणि त्यांना प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न केले आहेत, तसेच यासाठी योग्य व्यवस्थासुद्धा केली आहे.

Powered By Sangraha 9.0